पराग दामले
कुटुंब एकत्र असेल तर, बऱ्याच गोष्टी खपून जातात… कोणीतरी सावरायला असतंच… किंवा नेमकं कोणी केलं, याचा पत्ता लागत नाही… पण जेव्हा घरात दोनच माणसं असतात, तेव्हा खरी गम्मत येते… संवाद होतात ते हलक्या फुलक्या आरोपांचे…
ती – ऑफिसमधून येताना अर्धा किलो टोमॅटो घेऊन ये… आठवणीने आण, मला उद्या टोमॅटोचं सार करायचं आहे.
तो – हो नक्की आणतो, 500%…
संध्याकाळी गृहप्रवेश होतो…
ती – चहा ठेवलाय तो घे, टोमॅटो आणले का?
तो – (आतल्या आत जीभ चावत) आज कोणाकडेच नव्हते… एका भाजीवाल्याकडे होते, पण कच्चे होते, म्हणून नाही आणले… आणि दुसऱ्याकडे खूपच महाग होते, 30 रुपये पाव…
ती – तू काय कोरेगाव पार्कच्या भाजीवाल्याकडे गेला होतास का? 30 रुपये किलो असतील आपल्या भाजीवाल्याकडे…
तो – जाऊदे गं, मी उद्या बघतोच त्या माणसाला… इतके महाग देतो, मी काय पौंडावरून आलो वाटलं का?
ती – असुदेत कळलं मला… ही ओव्हर ॲक्टिंग होतेय…
या प्रसंगात तो टोमॅटो आणायला विसरला आहे हे संसारी बाईला कळायला पाच सेकंद पुरतात… त्याच्या चेहेऱ्यावर ते दिसत असतं…
0000
ती – बरं ऐक, बँकेतून पासबुक भरून आण…
तो – आणतो की, हा गेलो आणि हा आलो.
वाटेत बिल्डिंगमधला मित्र भेटतो, दोघे कोपऱ्यावर चहा पितात, पळत बँकेत जातो, तोपर्यंत बँक बंद होते… हात हलवत घरी येतो..
ती – मिळालं का पासबुक?
तो – हे बँकवाले ना कठीण आहेत, प्रिंटर दुरुस्त करायला नको का? उगाच लायनीत उभा राहिलो, नंबर आला तेव्हा सांगितलं ‘प्रिंटर बंद आहे, पाटी वाचा’, कामं करायला नकोत यांना!
ती – एक काम धड करत नाही, पोस्टाचा चेक पास झाला की, नाही हवं होतं…
तो – काळजी करू नकोस, शनिवारी परत जाईन, उसमें क्या है… (संकट टळलं, प्रिंटर मदतीला धावून आला)
हेही वाचा – धोंडा माझा भला…
0000
ती – हा बाथरूमचा दिवा तसाच नंदादीप…
तो – शेवटी कोण गेलं होतं? तूच झोपायच्या आधी रात्री गेली होतीस…
ती – मी गेले होते हे बरोबर, पण मी दिवा बंद करायला विसरणं शक्य नाही, तूच रात्री उठून काहीतरी करत होतास…
(त्याच्या डोक्यात प्रकाश पडला, रात्री उठून बाथरूमचा दिवा लावला होता खरा…)
तो – छे गं, मी पाणी प्यायलो, किचनमधला दिवा विसरलो असेन तर चूक माझी… बाथरूमला मी गेलोच नाही…
0000
ती – पोळी, भाजी टेबलवर ठेवली आहे, भाजी मायक्रोवेव्हला गरम कर… उरलेली छोट्या भांड्यात काढून फ्रीजमध्ये ठेव….
तो – जा ग तू बिनधास्त, मी आहे सगळं बघायला….
संध्याकाळी ती घरी येते….
ती – भाजी गरम केलीस का?
तो – हो, केली तर, अशी कशी गार खाईन….
ती – मग बाउल कुठे आहे?
उलटतपासणी होतेय, हे लक्षात आलं, स्वारीच्या…
तो – अगं, तो बाउल मी हातासरशी घासून, पुसून जागेवर ठेवला… तो बघ ट्रॉलीत…
ती – वा, आज सूर्य वायव्येस उजाडला की मला शेंड्या…
तो – अगं…
ती – अगं नाही, तुगं नाही… मी बाउल आधीच मायक्रोवेव्हमध्ये ठेवलाय… थापा मारायच्या तर गृहपाठ नीट करत जा… कळलं का?
तो – अगं तो नाही, दुसरा बाउल वापरला…
ती – कळलं मला, उकडतंय म्हणून तू भाजी गरम केलीच नाहीस, तशीच खाल्ली…
तो – ….
0000
ती – बारीक गॅसवर दूध तापवायला ठेवलंय… नीट लक्ष देऊन बंद कर आणि शॉर्टकट नकोय, नीट तापव म्हणजे साय धरेल… मॅचकडे लक्ष नकोय, लवकर वर यावं म्हणून गॅस मोठा करशील आणि तिकडून हललास तर… आणि जर उतू गेलं तर बघ…
तो – (मनात, उतू गेलेलं दिसतंच) हो हो, नीट तापवतो… तू तुझं काम कर…
शब्दवाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले… घडू नये ते घडले…
ती – अरे वा, गॅस वेळेवर बंद केला वाटतं…
तो – हो मग, इथून हललो नाही, एकटक बघत होतो…
ती – मग दूध इतकं कमी का वाटतंय… पातेल्याच्या कडा दुधकट वाटतात… बहुतेक आपण बासुंदी करायच्या विचारात होतात…
तो – हट्, आता तू काहीही आरोप करायला लागली…
ती – आपण दुधाबद्दल बोलत असलो तरी मी दुधखुळी नाहीये… ओट्यावरचं फडकं ओलं दिसतंय, हे काय त्याला साय लागली आहे… याचा अर्थ तू गॅस मोठा केला… तिकडे सिद्धू ओरडला, तू पळत हॉलमध्ये गेलास… इकडे दूध उतू गेलं… मग तू शेगडी आणि ओटा पाण्याने धुतला, त्या फडक्याने पुसलास… खरंय की नाही?
तो – अगं, त्यातला पहिला भाग खरा आहे, पण आपल्या वास्तूला थोडं दूध अर्पण करावं असं म्हणतात…
ती – बास, मनाचे श्लोक नकोत! पुड्या सोडू नको… एक काम धड करत नाहीस… मी आहे म्हणून चालवून घेते, एखादी असती तर…
तो – म्हणजे तू आणि अजून एक??? वा, मज्जा…
त्याक्षणी काहीतरी आपटल्याचा आवाज आला….
हेही वाचा – सुख म्हणजे नक्की काय असतं?
0000
सौ. करमचंद, सौ. शेरलॉक होम्स, सौ. ब्योमकेश बक्षी, यांचा भारतभर वास असतो…
त्यामुळे फार पुड्या सोडू नयेत, संक्रांत नसताना पतंग उडवू नयेत…
अशाच प्रेमळ संवादातून घर आनंदी राहतं… मुलगा किंवा मुलगी घराबाहेर असताना, दोन डोकी एकमेकांना आपटत, गाडा सुरू राहतो…
एखाद्या संध्याकाळी आठवणीने डोळे भरून येतात, तेव्हा हे प्रसंग त्या अश्रूंची फुलं करतात…


