सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय बारावा
नवद्वारांचां चौचकीं । बाणूनि संयतीची आडवंकी । उघडली खिडकी । ककारांतींची ॥52॥ प्राणशक्तिचामुंडे । प्रहारूनि संकल्पमेंढे । मनोमहिषाचेनि मुंडें । दिधलीं बळी ॥53॥ चंद्रसूर्यां बुझावणी । करूनि अनाहताची सुडावणी । सतरावियेचें पाणी । जिंतिलें वेगें ॥54॥ मग मध्यमामध्यविवरें । तेणें कोरिवें दादरें । ठाकिलें चवरें । ब्रह्मरंध्रींचे ॥55॥ वरी मकारांत सोपान । ते सांडोनिया गहन । काखे सूनियां गगन । भरले ब्रह्मीं ॥56॥ ऐसेनि जे समबुद्धी । गिळावया सोऽहंसिद्धी । आंगविताति निरवधी । योगदुर्गें ॥57॥ आपुलिया साटोवाटी । शून्य घेती उठाउठी । तेही मातेंचि किरीटी । पावती गा ॥58॥ वांचूनि योगाचेनि बळें । अधिक कांहीं मिळे । ऐसें नाहीं आगळें । कष्टचि तया ॥59॥
क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् । अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥5॥
जिहीं सकळभूतांचां हितीं । निरालंबीं अव्यक्तीं । पसरलिया आसक्ती । भक्तीवीण ॥60॥ तयां महेन्द्रादि पदें । करिताति वाटवधें । आणि ऋद्धिसिद्धींचीं द्वंद्वें । पाडोनि ठाती ॥61॥ कामक्रोधांचे विलग । उठावती अनेग । आणि शून्येंसीं आंग । जुंझवावें कीं ॥62॥ ताहाने ताहानचि पियावी । भुकेलिया भूकचि खावी । अहोरात्र वावीं । मवावा वारा ॥63॥ उन्निद्रेयाचें पहुडणें । निरोधाचें वेल्हावणें । झाडासि साजणें । चाळावें गा ॥64॥ शीत वेढावें । उष्ण पांघुरावें । वृष्टीचिया असावें । घराआंतु ॥65॥
हेही वाचा – Dnyaneshwari : इया किरीटीचिया बोला । तो जगद्बंधु संतोषला
अर्थ
शरीरातील नऊही द्वारांच्या कवाडांवर संयमाचा अडसर घालून सुषुम्ना नाडीचे मुख उघडले. ॥52॥ प्राणशक्तिरूपी चामुंडा देवीला संकल्परूपी मेंढे मारून आणि मनोरूपी महिषाचे मस्तक, हे बळी दिले. ॥53॥ इडा आणि पिंगेला नाड्यांचा सुषुम्नेत प्रवेश करून अनाहत शब्दाचा गजर खुला केला आणि चंद्रामृत त्वरेने जिंकून घेतले. ॥54॥ मग सुषुम्ना नाडीच्या मधील कोरीव अशा विवररूपी दादरावरून ब्रह्मरंध्राचे शिखर प्राप्त करून घेतले. ॥55॥ शिवाय आज्ञाचक्ररूप अथवा ॐकाराची तिसरी मात्रा जो मकार, त्या मकाररूपी जिन्याचा बिकट शेवट जे चढून जातात आणि मूर्ध्नि आकाशाला बगलेत मारून ब्रह्माशी ऐक्याला पावतात. ॥56॥ अशा प्रकारे सर्वत्र सारखी बुद्धी ठेवलेले जे असतात, ते ‘मी ब्रह्म’ अशी भावना प्राप्त करून घेण्याकरिता योगरूपी अमर्याद किल्ले स्वाधीन करून घेतात. ॥57॥ आपल्याला मोबदल्यात देऊन निराकार ब्रह्म त्वरित घेतात, तेही अर्जुना मलाच पावतात. ॥58॥ एरवी योगाचरणाच्या जोरावर विशेष काही लाभ होतो, असे मुळीच नाही. उलट जास्त श्रम मात्र त्यांच्या पदरात पडतात, दुसरे काही नाही. ॥59॥
अव्यक्त ब्रह्माच्या ठिकाणी ज्यांचे चित्त आसक्त आहे, त्यांना अधिक क्लेश पडतो. कारण देहधार्यांना अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग कष्टाने साध्य होतो.॥5॥
सगुणाच्या भक्तीस डवलून निराश्रय, निर्गुण आणि सर्व प्राण्यांचे मूर्तिमंत हितच, असे जे ब्रह्म त्या ब्रह्माची प्राप्ती होण्याकरिता ज्या योग्याने त्या ठिकाणी आसक्ती धरलेली असते, ॥60॥ त्यास (त्या योग्यास) इंद्रपदादी पदे वाटमारेपणा करतात आणि ऋद्धिसिद्धींपासून उत्पन्न होणारी सुखदु:खे त्या योग्यांच्या ब्रह्मप्राप्तीच्या आड पडून रहातात. ॥61॥ कामक्रोधांचे अनेक उपद्रव उद्भवतात आणि निराकाराबरोबरच शरीर लढवावे लागते. ॥62॥ तहानेने तहानच प्यावी, भूक लागली असता भूकच खावी आणि रात्रंदिवस वावांनी वारा मोजावा ॥63॥ जेथे जागणे हेच निजणे, इंद्रियांचा निरोध करणे, हेच विषयांचे प्रशस्त भोगणे आणि अरे, झाडाशी मैत्री करून बोलावे लागते. ॥64॥ थंडी नेसावी, ऊन पांघरावे आणि पावसाच्या घरात असावे. ॥65॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जें चळे ना ढळे, सरे ना मैळे


