भाग – 3
लोढा शेठला सिक्युरिटी एकनाथचा मुलगा दिनूचा वाढदिवस जोरदार साजरा करायचा होता. सोसायटीत राहणाऱ्या प्रत्येकाने दोन हजार जरी जमा केले तरी, दिनूचा वाढदिवस जोरदार साजरा करता येणार होता आणि सोसायटीतला कुणी नाही म्हणेल असंही त्यांना वाटत नव्हतं; कारण सगळेच पैसेवाले होते आणि महत्त्वाचं म्हणजे दिनू होताच तसा. सदोदित उत्साहाने फसफसलेला. हाक मारली की, कुणाच्याही मदतीला धावून जाणारा. कोणतंही काम सांगा दिनूने ते केलं नाही, असं नाही. बरं या कामाचा कुणी मोबदला देईल, अशीही अपेक्षाही नाही. पण लोढा शेठच्या या प्रस्तावाला सोसायटीत फारसा कुणी दुजोरा दिला नाही. मीटिंगमध्ये 48पैकी 12 सदस्य आले होते. त्यातील सहाजणांचा विरोध होता.
एक दिवस एक गडबड झाली. संध्याकाळच्या वेळेस जोशींचा मुलगा आपली महागडी बाइक सोसायटीच्या बाहेर लावून घरात गेला. त्याच सुमारास एक बाइक चोर तिथं आला. सिक्युरिटीच्या केबिनमध्ये तेव्हा राम नावाच्या सिक्युरिटी गार्डसोबत दिनूही बसला होता. त्याने बाईक स्टार्ट झाल्याचा आवाज ऐकला आणि तो ताडकन उठला, सेकंदात तो गेटच्या बाहेर आला. बाईकवर दुसरा माणूस पाहून सगळा मामला त्याच्या लक्षात येऊन तो त्या बाइकस्वारावर जोरात ओरडला. बाइक आपल्या हातात लागणार नाही, हे पाहून त्याने एक झेप घेऊन तिची मागची बाजू पकडली आणि तिला तो खेचू लागला. सुदैवानं समोरून येणाऱ्या दोन बाइकस्वारांचं लक्ष या प्रकाराकडे गेलं. एकाने आपली बाइक सरळ बाइकचोराच्या समोर उभी केली. दुसऱ्याने चपळाईने खाली उतरून बाईकचोराच्या बाइकची चावीच हस्तगत केली.
दोनतीन दिवसांनी अजून एक घटना सोसायटीत घडली. सुलक्षणेबाईंची गावातच रहाणारी मुलगी माहेरी आईवडिलांना भेटायला आली होती. संध्याकाळी ती आपल्या घरी निघून गेली. रात्री दहा वाजता तिचा सुलक्षणे बाईंना फोन आला.
“आई एक गडबड झालीये. माझं एक कानातलं सापडतच नाहीये. मी तुझ्याकडे आले तेव्हा दोन्ही कानात होते. आता मात्र डाव्या कानातच आहे…” ती रडकुंडीला येऊन बोलत होती.
सुलक्षणेबाईंनी दोन तास घरात शोधाशोध केली, पण काही तपास लागेना. सकाळी उठल्या उठल्या त्यांनी सिक्युरिटीला फोन केला. झालेल्या घटनेची माहिती देऊन सोसायटीच्या आवारात शोध घ्यायला सांगितलं. दुपारी चार वाजता त्यांच्या दाराची बेल वाजली. त्यांनी दार उघडलं. बाहेर दिनू उभा…
“काय रे दिनू?”
दिनूने त्यांच्यासमोर हात उघडला. त्या हातावर ते डायमंडचं कानातलं होतं.
“हेच आहे का ते हरवलेलं?”
सुलक्षणेबाईंचे डोळे विस्फारले. हो! तेच तर होतं ते. त्यांच्या लाडक्या लेकीने कौतुकाने त्यांना दाखवलेलं.
” हो. हेच आहे ते! कुठं सापडलं हे?” त्यांनी विचारलं.
“गेटच्या बाहेर… रस्त्यावर. सगळे सोसायटीच्या आत शोधत होते. पण गाडीत बसताना स्कार्फ ताईंनी स्कार्फ काढल्याचं मी पाहिलं होतं. म्हणून मला शंका आली की, ते बाहेरच पडलं असेल आणि खरंच ते तिथंच सापडलं!” दिनू हसऱ्या चेहऱ्याने सांगत होता. सुलक्षणेबाईंनी ते आपल्या पर्समध्ये टाकलं. पर्समधूनच त्यांनी शंभरची नोट काढली आणि त्याच्यासमोर धरली…
“हे घे तुझं बक्षीस आणि थँक्यू व्हेरी मच. खरंच खूप गुणी मुलगा आहेस तू…”
हेही वाचा – दिनूचा वाढदिवस अन् लोढा शेठचा निश्चय
“नाही… नको…” असं म्हणून दिनू वळला आणि निघून गेला. तो गेल्यावर सुलक्षणेबाईंनी मोबाइल उचलून लेकीला फोन लावला.
“अगं, ज्योती सापडलं बरं का कानातलं!”
ज्योती आनंदाने ओरडली, “कुणाला आणि कुठे सापडलं आई?”
सुलक्षणेबाईंनी दिनूचं नाव आणि कुठे सापडल्याचं सांगितलं.
“हां, दिनू खरंच स्मार्ट पोरगा आहे. बरं तू त्याला काही बक्षीस दिलं की नाही?”
“मी त्याला शंभर रुपये देत होते, त्याने घेतले नाहीत…”
“काय आई! अगं, सव्वा लाखाचं इयरिंग आहे ते आणि तू फक्त शंभर रुपये देत होतीस? कमीतकमी हजार रुपये तर द्यायचेस. मी दिले असते तुला…”
“जाऊ दे गं! या लोकांना फार डोक्यावर चढवू नये”
“कमाल करतेस तू आई. सापडलं नसतं तर सव्वा लाख पाण्यातच गेले असते ना?”
सुलक्षणेबाई काही बोलल्या नाहीत.
दोन दिवसांनी पवार आपल्या कुटुंबासहित जयपूरला लग्नाला गेले. जाताना एकनाथला घरी राहिलेल्या आपल्या आईकडे लक्ष द्यायला सांगून गेले. पासष्ट वर्षांची त्यांची आई प्रवासाची दगदग सहन होणार नाही म्हणून घरीच राहिली. पवार सकाळी गेले आणि रात्री त्यांच्या आईच्या छातीत वेदना होऊ लागल्या. जीव घाबराघुबरा होऊ लागला.
त्रास जास्त वाढला तशी त्यांना दिनूची आठवण आली. त्यांनी एकनाथच्या रुममध्ये फोन करून दिनूला पाठवायला सांगितलं. दिनू त्यांच्या फ्लॅटमध्ये गेला. आजींनी त्याला कपाटातली औषधं द्यायला सांगितली. ॲसिडिटीने अस्वस्थ वाटत असेल म्हणून पाण्यात इनो टाकून द्यायला सांगितलं. दिनूने त्यांनी जे जे सांगितलं, ते केलं. पण बऱ्याचदा ऐकून आणि वर्तमानपत्रात वाचून ही लक्षणं हार्ट अटॅकचीसुद्धा असू शकतात, हे त्याला माहीत होतं. त्याला इमर्जंसी नंबर्स तोंडपाठ होते. आजी ‘नाही नाही’ म्हणत असताना त्याने आजीच्या मोबाइलवरून सोसायटीच्या डॉक्टरला फोन लावला. तो फोन उचलेना म्हणून त्याने सरळ ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरला फोन लावला. सुदैवानं त्यानं तो उचलला. दिनूने त्याला लगेच सोसायटीत यायला सांगितलं. पाचच मिनिटांनी सोसायटीच्या डॉक्टरचा फोन आला. दिनूने त्यालाही लगेच यायला सांगितलं. जवळच रहात असल्याने तोही लगेच आला. आजीचे बी.पी. वाढले होते. थोड्याच वेळात ॲम्ब्युलन्स आली. दिनू आजीसोबत एखादी बाई असावी याकरिता आईला उठवून सोबत घेऊन गेला. आजीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून उपचार सुरू झाले.
बातमी कळताच सकाळी लोढा शेठ हॉस्पिटलमध्ये आले. तिथे दिनूला पाहून त्यांचा जीव कळवळला. पोरगा रात्रभर जागा होता. मग त्यांनी पवारांना फोन लावून सगळी कल्पना दिली. पवारांचं संध्याकाळच्या गाडीचं रिझर्वेशन होतं. दिवसभरात इतर गाड्यांत जागा मिळाली नाही तर, ते संध्याकाळीच निघणार होते. त्यांनी लोढा शेठला दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत आईची काळजी घ्यायला सांगितलं.
सात दिवसांनी पवारांची आई एंजिओप्लास्टी करून घरी परतली. भेटायला येणाऱ्या सर्वांना ती दिनूने तिची किती काळजी घेतली, याबद्दल भरभरून सांगत होती. तोंड फाटेस्तोवर त्याचं कौतुक करत होती.
“अरे सुभाष, त्या दिनूला काहीतरी बक्षीस दे रे… फार गुणाचं पोरगं आहे. सख्ख्या आजीसारखी माझी काळजी घेत होता तो!”
आईने असं म्हटल्यावर पवारांच्या कपाळावर आठ्या उमटल्या.
“आई मी त्याला पाचशे रुपये दिले होते. त्याने घेतले नाहीत. फार मातला आहे तो. आता काय त्याला लाख रुपये द्यायचे? नाही घेत तर गेला उडत…”
“अरे, लाख रुपये नाही म्हणत मी. कमीतकमी पाच हजार तर द्यायचे. दोन दिवस त्याने आणि त्याच्या आईने तुझी आणि सुनबाईची कमतरता भासू दिली नाही.”
पवार काही बोलले नाहीत. फक्त नाराजीने त्यांनी होकारार्थी मान हलवली. अर्थात, ते एवढे पैसे दिनूला देणार नव्हतेच.
एक दिवस एकनाथने लोढा शेठना फोन केला,
“शेठजी मला एका कंपनीत नोकरी मिळतेय. वीस हजार पगार देणार आहेत. मी त्यांना पुढच्या महिन्यात येण्याचं कबूल केलंय. सिक्युरिटी एजन्सीला सांगून तुम्ही एखादा सिक्युरिटी गार्ड मागून घ्या.”
लोढा शेठ काळजीत पडले. नवीन सिक्युरिटी गार्ड तर त्यांना केव्हाही मिळाला असता, पण एकनाथसारखा केअरटेकर मिळणं मुश्कील होतं. त्यातून दिनूसारखा सर्वांना मदत करणारा पोरगा मिळणं तर त्याहून कठीण होतं. त्यांनी हा विषय सोसायटीच्या मीटिंगमध्ये मांडायचं ठरवलं. दिनूच्या वाढदिवसाला आता सात दिवस उरले होते आणि त्याचा वाढदिवस साजरा करायचा विषय आता बंदच झाला होता. “कुणी नाही केला तरी मी दिनूचा वाढदिवस साजरा करेन,” हे तावातावाने म्हटलेलं वाक्य आता लोढा शेठला सलत होतं. सोसायटीचे सदस्य मीटिंगमध्ये हा विषय काढून त्यांची टिंगलटवाळी करणार होतेच. त्यांना काय उत्तर द्यायचं याचाही विचार करणं भाग होतं. पण आता एकट्याने साजरा करायची शेठजींची इच्छा मरून गेली होती. शेवटी एका सिक्युरिटी गार्डच्या मुलासाठी एवढे पैसे खर्च करणं त्यांच्या व्यवहारात बसत नव्हतं. पण त्यांनी ठरवलं. दिनूला घरी बोलावून त्याला शर्ट-पँटचं कापड देऊन टाकायचं. त्यासोबत एखादं कॅडबरी चाँकलेट नाहीतर मिठाईचा बॉक्स…
16 ऑक्टोबर… आज दिनूचा वाढदिवस. संध्याकाळची वेळ. क्लबहाऊसला रोषणाई केलेली… हॉलमध्ये खूप गर्दी जमली होती… नव्हे झाडून सगळी सोसायटी हजर होती. सजवलेल्या स्टेजच्या मागच्या भिंतीवर “हॅपी बर्थडे दिनू”चा बॅनर झळकत होता. ठेवणीतली शानदार शेरवानी घातलेला दिनू प्रसन्न चेहऱ्याने स्टेजवर उभा होता. त्याच्या बाजूला त्याचे आईवडील, सोसायटीचे अध्यक्ष पाटीलसाहेब आणि लोढा शेठ उभे होते. समोरच्या गर्दीकडे आणि टेबलवर ठेवलेल्या भल्या मोठ्या केककडे पाहून दिनूचा वाढदिवस खरंच साजरा होतोय, यावर लोढा शेठचा विश्वास बसत नव्हता. पाच-सहा दिवसांपूर्वी झालेल्या मीटिंगमध्ये त्यांनी एकनाथला दुसरी नोकरी मिळाल्याचं तसेच एकनाथ आणि त्याचं कुटुंब सोसायटी सोडून जात असल्याचं सांगितलं… आणि चमत्कार घडला. एकनाथचा पगार वीस हजार करण्यापासून ते दिनूचा वाढदिवस साजरा करण्यापर्यंतचे सगळे मुद्दे धडाधड मंजूर होत गेले. लोकांना दिनू आणि त्याच्या कुटुंबाची किंमत अखेर कळली होती आणि आज तो दिवस उजाडला होता ज्याची ते मनापासून वाट बघत होते.
दिनूने केक कापायला सुरुवात केली आणि “हॅपी बर्थडे टू यू दिनू”चा जोरदार जल्लोष झाला. लोढा शेठनी दिनूला उचलून घेतलं, तसे सगळे स्टेजवर धावत आले. दिनूच्या तोंडात केक भरवण्याची जणू स्पर्धा लागली. केक भरवून झाल्यावर जो तो दिनूशी हात मिळवून, त्याला जवळ घेऊन शुभेच्छा देऊ लागला. मग त्याला गिफ्ट देण्यासाठी भली मोठी रांग लागली. कुणी एक हजार, कुणी दोन हजाराची पाकीटं तर कुणी कपडे देत होतं. जोशी आले, त्यांनी आठ हजाराचा मोबाईल त्याला गिफ्ट दिला. सुलक्षणेबाई आल्या, त्यांनी पाच हजाराची सोन्याची चेन त्याला दिली. मग पवार त्यांच्या आईसोबत आले तेव्हा त्यांच्या हातात होती एक नवी कोरी सायकल, जिची किंमत होती बारा हजार!
सगळ्यांचे गिफ्ट्स देणं झाल्यावर लोढा शेठ बोलायला उभे राहिले…
“मित्रांनो खूप खूप धन्यवाद. आपण सगळ्यांनी मिळून आपल्या लाडक्या दिनूचा वाढदिवस साजरा केला. सगळ्यांनी त्याला स्वखुशीने गिफ्ट्स दिलेत. आता माझं गिफ्ट मी जाहीर करतो. दिनूच्या डिग्रीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मी अध्यक्ष असलेल्या “हेल्प” या फाऊंडेशनने स्वीकारली आहे…”
हेही वाचा – दिनूचा वाढदिवस अन् सोसायटीतल्यांची बोटचेपी भूमिका
टाळ्यांचा कडकडाट झाला. मग अध्यक्ष बोलायला उभे राहिले,
“सगळ्यांनी इतके गिफ्ट दिनूला दिले आहेत की, मी त्याला काय द्यावं हेच मला समजेनासं झालंय. जितकं दिनूचं कौतुक होतंय, त्यापेक्षा जास्त कौतुक त्याच्या आई-वडिलांचं व्हायला पाहिजे. कारण त्यांनी केलेल्या चांगल्या संस्कारामुळेच दिनू आपल्या सगळ्यांच्या मदतीला धावून जातो, तोही कसलीही अपेक्षा न ठेवता! अशा निरपेक्ष भावनेने कुणालाही मदत करण्याचे संस्कार आपणही आपल्या मुलांवर केले पाहिजेत. अशा सुसंस्कारी मुलाला घडवल्याबद्दल माझं गिफ्ट मी दिनूच्या ऐवजी त्याच्या आई-वडिलांना देणार आहे. त्यांची मोठी मुलगी आता लग्नाची झालीये. तिच्या लग्नाच्या खर्चाची सर्व जबाबदारी मी उचलणार आहे.”
टाळ्यांचा परत एकदा कडकडाट झाला.
लोढा शेठनी माईक हातात घेतला.
“कुणाला दिनूबद्दल दोन शब्द बोलायचे असतील तर त्यांनी स्टेजवर यावं.”
दिनूच्या वाढदिवसाला विरोध करणारे पवार स्टेजवर आले. दिनूच्या वाढदिवसाला आपण विरोध केला होता, त्याबद्दल सर्वांची माफी मागून त्यांनी दिनूची प्रशंसा सुरू केली. मग एकेक जण येऊ लागला. दिनूने केलेल्या मदतीचे अनुभव सांगताना बऱ्याच जणांना गहिवरून येत होतं. सगळ्यांच्या तोंडून आपलं कौतुक ऐकून दिनू अवघडून बसला होता. त्याच्याच बाजूला बसलेल्या एकनाथच्या आणि त्याच्या बायकोच्या डोळ्यातून मात्र आनंदाश्रूंच्या धारा वाहात होत्या.


