भाग – 16
जुईलीच्या चेहऱ्यावरचं हसू रेवतीला एक आंतरिक समाधान देऊन गेलं. किती दिवसांनी जुईली अशी मोकळी झाली होती! जुईलीने हर्षेजचा एक घोट घेतला आणि रेवतीला कोपरखळी मारली…
“अगं वेडे! आता मी जर ‘आयडिया बुरा तो नहीं है’ म्हटलं, तर तू लगेचच प्लॅनिंग सुरू करणार हे मला माहीत होतं.”
रेवतीने आपली कॅडबरी बाजूला ठेवली. “तर मग! आता वेळ नाही घालवायचा जुये. बघ, दिवाळीच्या सुट्ट्या परवापासून सुरू होतायत. म्हणजे, आपल्याकडे कमीत कमी पंधरा दिवस आहेत. आता आपण प्लॅन करूया!”
रेवती उत्साहाने बोलत होती. तिने हात जुईलीच्या खांद्यावर अलगद ठेवला.
“बघ, पुणे म्हटलं की मोठी ट्रॅव्हल आहे. फ्लाइटने जायचं, की ट्रेनने?”
“ट्रेन… ट्रेन बरी. फ्लाइट नको. मी या आधी कधी गेले नाही बाई फ्लाइटने. आधीच मला जाम नर्व्हस वाटतंय, त्यात आणि हे नको,” जुईली म्हणाली.
“उत्तम! मग ‘गोवा एक्स्प्रेस’ कधी असते आणि किती वेळ लागतो हे बघूया. आज आहे शुक्रवार. आपण पुढच्या सोमवारी रात्री निघूया. म्हणजे मंगळवारी सकाळी तिकडे,” रेवतीने क्षणात एक तात्पुरतं वेळापत्रक तयार केलं.
जुईली आता रेवतीच्या उत्साहात सामील झाली. “म्हणजे मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. आपण शुक्रवारी परतू शकतो.”
“डन! म्हणजे आपल्याकडे श्रीला भेटायला पूर्ण तीन दिवस आहेत! मंगळवारी सकाळी पुणे गाठायचं. पहिला दिवस फक्त ‘गुपचूप’ टेहळणी. तो कुठे असतो, काय करतो, हे फक्त लांबून बघायचं,” रेवतीने डोळा मिचकावला.
हेही वाचा – सदाफुली… पण विरहात मलूल झालेली!
जुईली हसली… “अगं, मी काय गुप्तहेर आहे का?”
“प्रेमात सगळं चालतं! दुसरा दिवस… बुधवार! तो असेल आपला अॅक्शन डे! त्याला थेट गाठायचं… भेटायचं… बोलायचं… आणि थेट जाब विचारायचा!” रेवतीचा आवाज आता अधिक दृढ झाला होता.
जुईली गंभीर झाली, “…आणि जर तो भेटलाच नाही किंवा त्याने काही कठोर उत्तर दिलं तर?”
रेवती जुईलीच्या अगदी जवळ सरकली. तिने तिच्या केसांवरून हात फिरवला आणि म्हणाली, “जुये, आपण फक्त प्रयत्न करणार आहोत. तू त्याला संधी तरी दे, नाहीतर निदान स्वतःला तरी दे. एकदा प्रयत्न करून बघ. अपयश आलं तर निदान ही रुखरुख राहणार नाही की, ‘मी प्रयत्न केला असता तर…’.”
जुईलीचे डोळे भरून आले. ती म्हणाली, “रेवू, तू खऱ्या अर्थाने माझी जिगरा दोस्त आहेस बघ!”
रेवतीने लगेच विषय बदलला. “बरं, आता महत्त्वाचं! त्याला भेटायचं कुठे? त्याचे ऑफिस? फ्लॅट? किंवा तो जिथे नेहमी जातो, ती जागा?”
जुईलीने थोडा विचार केला… “त्याचं ऑफिस मला माहीत आहे. पण तिथे जाऊन भेटणं थोडं ‘फॉर्मल’ होईल. मला त्याला त्याच्या ‘स्पेस’मध्ये भेटायचं आहे.”
“मग कुठे गाठायचं याला?” रेवतीने विचारलं.
“तो ना, सकाळी 9 ते 10 पर्यंत एका कॅफेत बसतो, पुस्तक वाचत. रोज…”
“मग हीच जागा बेस्ट ना गं…”
हेही वाचा – रेवतीने सांगितला उपाय… जुईलीच्या चेहऱ्यावर फुलले हसू
“येस्स… पण यार मला जाम भीती वाटतेय गं!”
“मैं हूं ना… तू घाबरू नकोस आता अज्जिबात… आपण फक्त बॅग भरायची आणि जायचं! आणि सर्वात आधी मी ट्रेनचं तिकीट कन्फर्म करते!”
जुईलीने हसत हसत रेवतीला टाळी दिली. जुईलीचं आज पक्कं ठरलं होतं, पण त्यात हुरहूरही होती… कसं होईल, काय होईल… साहजिकच होतं… पण केलं तर पाहिजेच होतं!
आता जुईलीच्या डोक्यात सलीलचं एकच गाणं सुरू होतं…
मुहूर्त माझा तोच ज्या क्षणी हो इच्छा
वेळ पाहूनी खेळ मांडणे नामंजूर
जपत किनारा शिड सोडणे नामंजूर
अन् वाऱ्याची वाट पहाणे नामंजूर

