डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या ‘मंदिर कसे पहावे’ या पुस्तकाची प्रथम आवृत्ती 2019मध्ये प्रसिद्ध झाली आणि आजवर पाच आवृत्या निघाल्या आहेत. भारताच्या इतिहासात रस असल्यामुळे हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर मी लगेच ते वाचलं होतं. आजही अधूनमधून वाचत राहते.
मंदिर कसे पहावे? हा कसला विषय! मंदिरात जायचं, गाभार्यातल्या देवाचं दर्शन घ्यायचं, प्रसाद घ्यायचा की झालं… असं वाटलं असेल. पण मंदिर पहाणे, हे अभ्यास करण्यासारखे आहे. कसे? ते हे पुस्तक वाचून समजते. मंदिर का पहावे, याचे उत्तरही मिळते.
अगदी लहानसं 94 पानांचं हे पुस्तक असलं तरी, एका बैठकीत वाचून होत नाही! कारण प्रत्येक पान विचार करायला उद्युक्त करते. इतकेच नाही तर या आधी पाहिलेली किंवा बरेचदा पाहिलेली मंदिरे आपण ‘पाहिली’ तरी का? मूर्ती तरी नीट पाहिली का? अशी शंका मनात येते. आपण विचार करू लागतो आणि अर्थातच, उत्तर नकारार्थी मिळते. आपण अंतर्मुख होतो. लेखकाने अभंगांची जोड देऊन हा गहन विषय सोपा करून सांगितला आहे.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर गर्भगृहाचे चित्र आहे. शंकराची पिंडी असलेले गर्भगृह आणि प्रवेशद्वार दाखवले आहे. प्रवेशद्वारावर कोरलेल्या अनेक लहानसहान आकृती लक्ष वेधून घेतात. इथूनच पहिला प्रश्न मनात उमटतो, मी गर्भगृहाचे प्रवेशद्वार इतके जवळून, निरखून पाहिले का? त्यात खरंच इतके सगळे पाहण्यासारखे असते? मुखपृष्ठ नीट पाहूनच पुस्तक वाचायला सुरवात करायला हवी.
हेही वाचा – Bookshelf : अर्थपूर्ण जगण्याचा दृष्टीकोन देणारे Man’s search for meaning
पुस्तकाची अनुक्रमणिका पाहिली की, लेखकाने हा विषय मुद्देसूद मांडला असल्याचे लक्षात येते. प्रास्ताविक आणि मनोगत सुद्धा नीट वाचायला हवे. माणसाच्या आयुष्यातले मंदिराचे स्थान, यावर विचार व्यक्त करून शेवटी लेखक म्हणतात, ‘येथून पुढे देवदर्शनाला जाणारे, हे पुस्तक हाती घेऊन मंदिर दर्शन घेतील आणि त्यामुळे त्यांना कृतकृत्य वाटेल.’ मी हे पुस्तक वाचल्यावर मंदिर पाहण्याची दृष्टी बदलली.
हजार वर्षांपासून मंदिरांची निर्मिती होत आहे. ते अध्यात्माचे केंद्र आहेच; पण त्या काळी सामाजिक घडामोडींचेही केंद्र होते. मंदिरात अध्यात्मापासून रोजच्या जीवनापर्यंत सर्व काही पाहायला मिळते. स्थापत्य, शिल्पकला आणि चित्रकलेतून जीवनाचे तत्वज्ञान दिलेले आहे.
मंदिराच्या वास्तूचा विकास कसा होत गेला आणि आजच्या भव्य वास्तूची निर्मिती कशी झाली, हे सांगताना मंदिर वास्तूच्या वेगवेगळ्या भागांचे वर्णन लेखक करतात. ‘देह देवाचे मंदिर’ असे म्हणत मंदिराच्या विविध भागांना शरीराच्या विविध भागांशी अनुरूप असलेली नावे सांगतात. अगदी पायापासून कळसापर्यंत. प्रत्येक भागाचे वर्णन करताना महत्व सांगतात आणि आपल्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे सापडत जातात. उदा. गाभारा लहानसा का असतो? गाभाऱ्यात अंधार का असतो? मंदिरावर एवढी शिल्प का कोरलेली असतात? उंबरठ्यावर पाय का ठेवायचा नसतो? सर्वात प्राचीन मंदिर कोणते? असे अनेक प्रश्न… उत्तरे सापडतात, पण उत्सुकता वाढत जाते, नवे प्रश्न उमटत राहतात.
मंदिरात देवाचे दर्शन घेण्यापूर्वी स्वतःची तयारी करावी लागते. सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता या चार मुक्ती आहेत. मंदिर पाहताना आधी बाहेरून प्रदक्षिणा घालावी, मग गाभाऱ्यातल्या देवाचे दर्शन घ्यावे. बाहेरच्या भिंतींवर अनेक शिल्प असतात, तीही पाहायला हवीत. प्रदक्षिणा मार्गावर छत असते किंवा खुला असतो. बाहेरच्या भिंतींवर महाकाव्य, पुराणे, कथा याचबरोबर सुरसुंदरींच्या सुंदर मूर्ती असतात. खजुराहो सारख्या मंदिरांत कामविषयक शिल्प आहेत. मंदिरात ही शिल्प का आहेत? याचेही उत्तर मिळते.
मंदिरांची शिखरे साधारणपणे द्राविड, नागर आणि वेसर प्रकारची असतात. त्यातही वेगवेगळ्या प्रदेशातली वेगवेगळी असतात. जसे महाराष्ट्रातली भूमिज मंदिरे. प्रत्येक प्रकारचे शिखर आणि त्यावरून मंदिराची शैली कशी ओळखायची, याचे विस्तृत वर्णन या पुस्तकात केले आहे. पाहायलाच हवी अशी मंदिरे – उदा. अंबरनाथचे शिव मंदिर, कोपेश्वर खिद्रापूर, मार्कंडेश्वर, गोंदेश्वर, दैत्यसूदन यांची माहिती दिली आहे.
लेखक म्हणतात, ‘देवळात जायचे ते केवळ चक्षूने देवतेला पाहण्यासाठी नाही तर, गाभाऱ्यात मूर्तीरूपाने प्रतिष्ठापित असलेल्या तत्वाचा साक्षात्कार व्हावा म्हणून.’
हेही वाचा – Bookshelf : एक होता कार्व्हर… विलक्षण कहाणी जिद्दीची, माणुसकीची आणि देशप्रेमाची!
आपण आयुष्यात पहिल्यांदा मंदिरात कधी गेलो तो अपवाद सोडला, तर कोणालाही आठवणार नाही. बाळ सव्वा महिन्याचे झाले की, त्याला मंदिरात न्यायची पद्धत आहे. ते पहिले दर्शन! त्यानंतर वेळोवेळी मंदिरात जायचे प्रसंग येतात. आस्तिक व्यक्ती देवदर्शनाला जातातच, पण हे पुस्तक वाचल्यावर नास्तिक सुद्धा जाऊ लागतील. देवदर्शन घेणार नाहीत, पण भारतीय संस्कृतीची ओळख करून घेतील.
आपण मागासलेले होतो, असे सांगितले गेले आहे; पण मंदिर पाहण्याची दृष्टी मिळाल्यावर हे विधान खोटे ठरते. इतकेच नाही तर, ज्यांनी असे म्हटले आहे, त्यांना मंदिर, ओघाने आपली संस्कृती समजलीच नाही, असे म्हणता येईल!
आता भारतीय ज्ञानप्रणाली हा विषय शाळा-कॉलेजमध्ये आला आहे. मंदिर स्थापत्य हा त्यातलाच एक विषय आहे. नवीन पिढी नव्या नजरेने मंदिर पाहणार आहे. हे पुस्तक वाचून पुन्हा एकदा नेहमी जात असलेल्यांनी मंदिरात जाऊन देवाचे नव्या दृष्टीने दर्शन घ्यायला हवे.


