रविवारी, नेहेमीप्रमाणे डोंबिवलीत फडके रोडला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघालो. रविवार सकाळची ही प्रदक्षिणा फार उत्साहवर्धक असते माझ्यासाठी. कधी शेपू मिळतो, कधी मॉडर्न कॅफेचा डोसा, तर कधी धनलक्ष्मीचा अप्पम! हवं ते पिशवीत किंवा पोटात पाडून घेण्यासाठी चौकस नजर हवी फक्त. कधी अवचित एखादा वासूदेवही भेटतो, पिसांची टोपी घालून चिपळ्या वाजवणारा. दुर्लक्षित, पण चैतन्यदायी…
जाता जाता, ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिरात डोकं टेकवलं… काही क्षण बसलं की, आठवड्याचा सगळा शीण पळून जातो कुठल्या कुठे आणि नवी ऊर्जा, नवा वारा भरला जातो शिडात. तर, याच फडके रोडवर परवा एक हातगाडी दिसली, पेरूची. इतर कोणतीही फळं नाहीत, फक्त पेरू एके पेरू! फिकट हिरवे, पिवळे, रसरशीत पेरू… शाळेत असताना वाचलेल्या, पेरूच्या कवितेची आठवण करून देणारे…
पोपटाला पेरू आवडतो म्हणतात. मी काही पोपट नाही, पण तरीही जीव ओवाळून टाकतो मी पेरूवर. आवडतं मला हे राजेशाही नसलं, तरी आपलंसं वाटणारं, साधंसं फळ. हातगाडीवरची ती लयलूट पाहून खुळावलो मी. माझ्यासारख्या बऱ्याच खुळ्यांचा गराडा पडला होता गाडीभोवती. पन्नास रुपये किलो. मोहक गंध पसरलेला होता पिकलेल्या पेरूंचा, परिसरात. प्रत्येक येणाऱ्याला, तो एक फोड कापून, त्यावर तिखट मिठाची हलकीशी शिंपण करून अगदी अगत्याने देत होता. “खा लो साहब, और मांगोगे!!” हे पालुपद होतंच सोबत.
खरोखर, हिंदीत या फळाला ‘अमरुद’ का म्हणत असावेत याची प्रचिती त्या फोडी खाऊन येत होती. अमृतच जणू, अवतरलेलं फडके रोडवर! अगदी स्वस्तात मस्त मेजवानी, चवीची.
हेही वाचा – केल्याने होत आहे रे!
चांगले एक किलो रसाळ पेरू घेऊन घरी पोहोचलो, आनंदात. ते सोनं अलगद काढून ठेवलं फळांच्या दुरडीत आणि बघतच बसलो ते अप्रूप. चांगले पाच सहा रसरशीत पेरू नजरेसमोर होते माझ्या. एक पेरू उचलला त्यातला, धुतला स्वच्छ आणि मग अलगद सुरी चालवून त्याच्या फोडी केल्या. नीट रचल्या ताटलीत त्या सुबक फोडी आणि वर तिखट-मिठाची सुखद पखरण केली.
अहाहा, काय तो नजारा. एका फोडीचा अलगद चावा घेतला आणि पेरूची चव रुणझुणली नुसती. सुखाची परिसीमा. सावकाश रवंथ करून ती भन्नाट चव अनुभवली समरसून आणि अकस्मात घात झाला!!
एक चुकार बी, सुळकन् जाऊन दाढेच्या खोबणीत अडकली. ज्याची भीती होती, तेच झालं होतं. पेरू गेला पोटात पण ती बी राहिली तिथेच ठाण मांडून, छळायला मला. आता सारखी जीभ जायला लागली तिथे, त्या बीचं अस्तित्व चाचपून बघायला. होतीच तिथे बेटी, जिभेच्या आक्रमणाला तोंड देत. अगदी अस्वस्थ करणारी जाणीव देत. खळखळून चूळ भरली, दोन-तीन वेळा, पण परत एकदा जिभेने ती तिथेच असल्याची जाणीव करून दिली. अढळपद मिळालेल्या ध्रुवासारखी ती अढळ आणि माझा जीव मात्र कासावीस…
पेरू खाल्ल्याचं समाधान त्या शिंच्या बीमुळे पार मातीमोल झालं होतं. ती तिथे असल्याची जाणीवच नको करणारी. आता तिचं तिथून उच्चाटन केल्याशिवाय जीवाला शांतता लाभणार नव्हती. बायको माझी ती अस्वस्थता बघून हसत होती गालातल्या गालात आणि त्यामुळे मी आणखीच बेजार होत होतो. ‘पेरू नको, पण बी आवर’ अशी अवस्था नुसती जिवाची.
काहीतरी तर करायलाच हवं होतं. शोधाशोध करून, हॉटेलमधून निघाल्यावर बडीशेपेचा बकाणा भरताना अलगद उचलून खिशात ठेवलेल्या लाकडी दंत कोरण्या मिळवल्या आणि आरशासमोर उभा राहून विचित्र आ, ऊ करत त्या बीचा ठावठिकाणा शोधून तिथपर्यंत पोहोचायचा आटोकाट प्रयत्न मी करू लागलो. ती चलाख बी, बाहेर यायच्या ऐवजी आणखीनच आत शिरली, मला हवालदिल करून! नुसता कुटाणा झाला होता. कुठून त्या पेरूच्या फंदात पडलो, असं झालं होतं मला. पण आता पश्चात्ताप करून उपयोग काय होता?
जळी, स्थळी, काष्ठी आणि पाषाणी ती बीच मला दिसू लागली, जाणवू लागली. दे माय धरणी ठाय, असे हाल. बायको म्हणाली, “मी प्रयत्न करते. राहा उभा समोर आ वासून.”
यशोदेला कृष्णाच्या ‘आ’ वासलेल्या मुखात सगळं विश्व सामावलेलं दिसलं होतं. आमच्या बायकोला ती बी दिसली असती, तरी मी कृतार्थ झालो असतो. एका हातात मोबाइलचा दिवा आणि दुसऱ्या हातात टोकेरी काडी घेऊन ती त्या बीरूपी विश्वाला गवसणी घालायचा प्रयत्न करू लागली… दुसऱ्या माणसाला पाठ खाजवायला सांगितल्यावर, ‘तिथे नाही, जरा वर, जरा खाली, डावीकडे, उजवीकडे…’ असं करूनही कंड येत असलेली जागा जशी गवसत नाहीच, त्या प्रमाणे बी लपलेल्या फटीऐवजी, ती काडी भलत्याच दाढेत शिरत होती. आम्ही दोघेही जीवाचा आटापिटा करून त्या निष्ठुर बीला धक्का द्यायच्या प्रयत्नात होतो.
हेही वाचा – बल्लव! म्हातारी मेल्याचं दुःख नाही…
प्रयत्नांची शर्थ झाल्यावर ती पण नाद सोडणार इतक्यात, काडी इच्छित स्थळी पोहोचली आणि ती बी, पांढरा बावटा फडकावून, लपलेल्या ठिकाणाहून बाहेर पडली, अकस्मात! दाढेच्या गुहेतून ती जिभेवर आली आणि एका क्षणात मी तिला थुंकून मोकळा झालो. जीभ परत विवक्षित ठिकाणी नेऊन जागा मोकळी झाल्याची खात्री केली आणि मगच नि:श्वास सोडला…
एवढे पेरू उरले होते, त्यांचं काय करावं असा यक्ष प्रश्न आता पडला. ही म्हणाली, “मस्त दह्यातली कोशिंबीर करते जेवताना.” कर्म माझं! परत तोच भेडसावणारा प्रश्न. मी धुडकावून लावली ही कल्पना आणि मग तिने शक्कल लढवून पेरूच्या फोडी किंचित पाणी घालून मिक्सरमध्ये फिरवल्या अगदी काही वेळ. गर चाळणीवर घेऊन, गाळून, बिया लीलया वेगळ्या केल्या आणि थोडं पाणी मिसळून, तिखट मीठ घालून, पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून, ग्लास भर guava juice तयार करून गार करत ठेवला.
बियांची दहशत घेतलेला मी, ही नामी शक्कल पाहून बेहद्द खुश होऊन, बी अडकायची भीती टाळून, परत एकदा पेरूचा आस्वाद घेण्यास सज्ज झालो. सुगरण आणि डोकेबाज बायको असण्याचे हे असे छुपे फायदे तर असतातच! एक मात्र नक्की झालं, आता जर पेरूचा आस्वाद त्याच्या मूळ स्वरूपात घ्यायचा असेल तर दातांच्या डॉक्टरकडे जाऊन दातांमधल्या फटी बुजवणं क्रमप्राप्त आहे. ते करावं, का पेरू खाणंच बंद करावं, या चक्रव्यूहात सापडलाय आता अभिमन्यू!!


