दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 25 मे 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 04 ज्येष्ठ शके 1948; तिथि : दशमी 29:10; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 28:08;
- योग : वज्र 27:14; करण : तैतिल 16:46;
- सूर्य : वृषभ; चंद्र : सिंह 09:06; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:08;
- पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
गंगावतार
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
संशोधक, इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर
टीम अवांतर
मराठ्यांच्या इतिहासाचे भाष्यकार, संशोधक, इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा जन्म राजापूर तालुक्यातील (जि. रत्नागिरी) कशेळी येथे 25 मे 1895 रोजी झाला. ‘मुसलमानी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवरील प्रभाव’ हा प्रबंध त्यांनी एम.ए.साठी मुंबई विद्यापीठास सादर केला परंतु परीक्षकांशी मतभेद झाल्यामुळे त्यांना पदवी मिळू शकली नाही. पुढे हा इंग्रजी प्रबंध पुस्तकरूपात प्रकाशित झाला.
मुंबईच्या मराठा मंदिर या संस्थेने त्यांच्याकडे शिवचरित्र लिहिण्याचे काम सोपविले होते. अखेरपर्यंत ते या कामात व्यग्र होते, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे शिवचरित्र पूर्ण होऊ शकले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर या संस्थेने त्यांनी लिहून ठेवलेली संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना (काही भाग), लेख, टिपणे, चरित्राचा आराखडा, ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे, कौटुंबिक माहिती इत्यादी साहित्य, ‘श्री शिवछत्रपति : संकल्पित शिव-चरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने’ या शीर्षकाखाली प्रसिद्घ केले. या ग्रंथावरून शेजवलकरांचा प्रदीर्घ व्यासंग, स्वतंत्र प्रज्ञा आणि निर्भीड ऐतिहासिक दृष्टिकोन यांचे प्रत्यंतर येते. हे अपूर्ण शिवचरित्र पुढील पिढीस एक अत्यंत विश्वसनीय असा संदर्भगंथ ठरले आहे. या ग्रंथासाठी शेजवलकरांना ‘साहित्य अकादमी पुरस्कारा’चा (मरणोत्तर) बहुमान मिळाला.
हेही वाचा – पार्किंगसाठी पुणेकरांच्या अशाही क्लृप्त्या!
या ग्रंथलेखनाबरोबरच त्यांनी वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, गौरवग्रंथ आदींमधून पुष्कळ लेखन केले. तसेच भारत इतिहास संशोधक मंडळातही शोधनिबंध वाचले. यांपैकी काही लेख, ‘त्र्यंबक शंकर शेजवलकर : निवडक लेखसंग्रह’ या नावाने ह. वि. मोटे यांनी प्रसिद्घ केले आहेत. याशिवाय, त्यांचे ‘पानिपत’ आणि ‘शिवचरित्र… साधने’ हे दोन ग्रंथ वाचकप्रिय ठरले.
मराठ्यांचा सर्वांगीण इतिहास हा त्यांचा अभ्यासविषय होता. पेशवाईच्या कालखंडात शिवाजी महाराजांच्या धोरणापासून जी फारकत घेतली गेली, तिच्यावर बोट ठेवून आणि मराठ्यांच्या अवनतीसाठी पेशव्यांना जबाबदार धरून त्यांनी कठोर चिकित्सा केली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या फ्रेंच राज्यक्रांतीच्या तत्त्वत्रयीमुळे शेजवलकर प्रभावित झाले होते. या तत्वांच्या निकषांवर त्यांनी वेळोवेळी केलेली ऐतिहासिक चिकित्सा अभ्यसनीय आहे. इतिहासाचार्य राजवाडे यांच्याप्रमाणे फटकळ आणि आग्रही तसेच प्रखर बुद्घिमत्तेचे आणि चतुरस्र विद्वान म्हणून शेजवलकर ओळखले जातात. ते निव्वळ संकलक, संशोधक नव्हते, तर इतिहासाचे प्रतिभावंत भाष्यकार आणि समाजचिंतक होते. आधुनिक मराठी इतिहास लेखन परंपरेत तात्विक, बहुशाखीय आणि स्वयंभू मर्मदृष्टी लाभलेल्या न्यायमूर्ती म. गो. रानडे आणि वि. का. राजवाडे यांच्यासारख्या मोजक्या इतिहासकारांमध्ये शेजवलकर यांची गणना केली जाते. 28 नोव्हेंबर 1963 रोजी त्यांचे निधन झाले.
आजचे राशीभविष्य
मेष : आजचा दिवस व्यवसाय आणि संपत्ती वाढीसाठी सकारात्मक असल्याचे दिसते. उत्पन्नातील वाढ आनंद घेऊन येईल. बऱ्याच काळापासून गुंतवलेल्या रकमेचा परतावा मिळू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवल्याने आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. संततीच्या यशामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. वडिलांचे बोलणे तुम्हाला कठोर वाटू शकते, पण त्यामागील काळजी आणि प्रेम समजून घेण्याचा प्रयत्न करा.
वृषभ – आज नवीन संधी आणि आर्थिक प्रगतीची सुरुवात होईल. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी एक मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. तथापि, वरिष्ठांसोबत किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे, पण सहकारी तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील. घरात नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली जाईल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ अपेक्षेपेक्षा चांगले मिळेल. कौटुंबिक पातळीवर आनंदाचे वातावरण असेल.
मिथुन – सरकारी कामात काही अडथळे येऊ शकतात, पण काळजी करण्याची गरज नाही, हे अडथळे वेळीच दूर होतील. मालमत्तेसंबंधीचा एक मोठा निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो. फारशा परिचित नसलेल्या व्यक्तींकडून वैयक्तिक बाबींवर सल्ला घेणे हानिकारक ठरू शकते. आई-वडिलांसोबत वेळ घालवल्याने मनाला शांती मिळेल. धार्मिक वातावरण आणि भक्तीपूर्ण उपक्रमांमधून खूप आनंद मिळेल.
कर्क – कामाच्या ठिकाणी काही आव्हाने येतील, पण तुमचा संयम त्यांचा सामना करण्यास मदत करेल. जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. संततीच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या योजना आखल्या जाऊ शकतात. जोडीदारासोबत घालवलेला वेळ नात्यातील गोडवा आणि जिव्हाळा वाढवेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या.
सिंह – विजयाची भावना अनुभवायला मिळेल. संपत्ती आणि सुखसोयींमध्ये वाढ होईल. एखादा कायदेशीर निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो, ज्यामुळे दिलासा मिळेल. मालमत्तेच्या व्यवहारात गुंतलेल्यांसाठी दिवस अत्यंत फायदेशीर ठरू शकतो. काहीतरी मोठे आणि वेगळे करण्याची तीव्र इच्छा होईल. इतरांच्या वैयक्तिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणे टाळा, कारण यामुळे अनावश्यक संघर्ष निर्माण होऊ शकतो.
कन्या – आज व्यवसायात काही उलथापालथ होऊ शकते. एखाद्या सहकाऱ्याच्या शब्दांमुळे तुम्हाला दुःख होऊ शकते, पण रागावण्याऐवजी संयमाने, शहाणपणाने वागा. वडिलांनी दिलेली जबाबदारी तुमच्या भविष्यासाठी निर्णायक ठरू शकते. कौटुंबिक बाबींमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. कठोर परिश्रमामुळे अखेरीस तुम्हाला यश मिळेल. परदेशात काम करणाऱ्यांनी, फसवणूक होणार नाही, याबाबत विशेष सावधगिरी बाळगावी लागेल.
तुळ – दिवस थोडा आव्हानात्मक असू शकतो. एखाद्या कामात अपेक्षित यश न मिळाल्यास निराशा येऊ शकते. जोखमीच्या गुंतवणुकीमुळे नुकसान होऊ शकते, म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या. कामाच्या ठिकाणी बदल करण्याची गरज भासू शकते. संततीच्या आरोग्याबद्दल चिंता वाढू शकते. एखाद्या अनोळखी व्यक्तीवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणे नुकसानकारक ठरू शकते. वाहनातील बिघाडामुळे अनपेक्षित खर्चही होऊ शकतो.
वृश्चिक – एखादी बातमी मनाला आनंदीत करेल. काहीतरी नवीन करून पाहण्याची प्रेरणा मिळेल. आत्मविश्वास वाढेल. भूतकाळातील चुकांमधून शिकणे खूप महत्त्वाचे ठरेल. स्वतःच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका. आयुष्यातील सध्याच्या वैवाहिक समस्या हळूहळू सुटतील. व्यवसायातील बदलांसाठी हा अनुकूल काळ आहे.
हेही वाचा – अगतिक मातृत्व
धनु – आज तुमचे मन कोणत्यातरी अज्ञात चिंतेमुळे अस्वस्थ असू शकते. संततीशी संबंधित एखादी गोष्ट त्रास देऊ शकते. कोणताही निर्णय घाईघाईत घेतल्यास नुकसान होऊ शकते, त्यामुळे संयम ही तुमची सर्वात मोठी शक्ती ठरेल. विद्यार्थ्यांना मानसिक तणावातून दिलासा मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याचे स्वप्नही साकार होऊ शकते. प्रवासादरम्यान मिळालेली कोणतीही माहिती भविष्यात फायदेशीर ठरेल.
मकर – दिवस सुखसोयी आणि नवीन संधींनी भरलेला असेल. जे नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. कामाच्या निमित्ताने प्रवास होण्याची शक्यता आहे. कायदेशीर बाबींबाबत चिंता निर्माण होऊ शकते, त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. एका विशेष पाहुण्याच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण असेल.
कुंभ – आज तुमचे मन थोडे गोंधळलेले असू शकते. आत्मविश्वासही कमी झाल्यासारखे वाटू शकते. एखाद्या कामासाठी मन पूर्णपणे तयार नसल्यास, घाईने निर्णय घेणे टाळा. आईच्या आरोग्याबाबतची चिंता वाढू शकतो. हळूहळू, तुमची जीवनशैली सुधारेल. एखादे प्रलंबित काम पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. संततीच्या शिक्षणाबाबत आणि भविष्याबाबत एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.
मीन – धावपळ आणि जबाबदाऱ्यांनी भरलेला दिवस असेल. छोट्या-छोट्या गोष्टींवरून रागावल्याने नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शांत राहा. व्यवसायासंबंधीची चिंता कायम राहू शकते, परंतु अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्यामुळे गोष्टी सोप्या होतील. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात असलेल्या व्यक्ती आपली प्रतिमा अधिक मजबूत करतील. त्यांना उच्च पद किंवा सन्मान मिळण्याची शक्यता आहे.


