भाग – 26
त्या रात्री, ट्रेनिंगनंतर थकून आराध्या बसलेली होती. शर्वाय तिच्या शेजारी येऊन बसतो.
“तुझ्या डोळ्यांत मी ते वादळ पाहिलंय, आराध्या… आणि ते वादळ जेव्हा योग्य दिशेने वाहतं, तेव्हा इतिहास घडतो.”
तेवढ्यात, शर्वायच्या फोनवर एक मेसेज झळकला —
“माधव काहीतरी हालचाल करत आहे. निशाला आराध्याच्या मागे लावलं आहे.”
शर्वायचे डोळ्यांत क्षणभर कठोर भाव उमटतात.
तो स्वतःशी म्हणतो, “खरा डाव आता सुरू होतोय…”
त्याच्या हातात एक जुना, पोतडीत गुंडाळलेला फोटो होता… “आराध्या, तुझ्या डोक्यात अनेक प्रश्न असतील… मी कोण आहे, का मदत करतोय आणि तुला हे सगळं का शिकवतोय? तुला उत्तरं मिळणं गरजेचं आहे.”
तो फोटो त्याने आराध्याच्या हातात दिला. तिने पाहिलं — एक जुन्या काळातला फोटो, त्यात सुमित्रा आजी होत्या, त्या तरुण दिसत आहेत, त्यांच्यासोबत एक लहान मुलगा अगदी, शर्वाय.
“मी तुझ्या सुमित्रा आजींचा नातू आहे… पण मी काही काळाकरिता परदेशी गेलो… त्यानंतर माझी ओळख, माझं अस्तित्व काही काळ गुप्त ठेवावं लागलं. घरातल्या काही मंडळींवर विश्वास ठेवणं धोकादायक ठरलं होतं.”
आराध्या स्तब्ध झाली. “म्हणजे तू… तू आमचाच…?”
शर्वायने हसून मान डोलावली… “हो, आणि तुझी भेट होणं योगायोग नव्हे, नियती होती.”
0000
आराध्याला शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर कठोर प्रशिक्षण द्यावं लागत होतं. एका टेस्टमध्ये, तिला एका अंधाऱ्या खोलीत एक गूढ पॅटर्न ओळखायचा होता..
हेही वाचा – माधव म्हणतो, शर्वायचं आराध्याशी प्रेमळ वागणं तात्पुरतं आहे!
जीवघेण्या आवाजांतून, निर्माण केलेल्या कोलाहलतून तो शोधायचा होता. तिचं मन डळमळलं… पण तिला शर्वायचे शब्द आठवले —
“वादळातही स्थिर राहिलीस, तर दिशा तुला सापडेल.”
तिने डोळे मिटले, श्वास नियंत्रित केला… मन एकाग्र केलं अन् काही सेकंदातच तिला तो पॅटर्न सापडला.
0000
माधव आणि निशा एका गुप्त अंधाऱ्या खोलगट तळघरात उतरले. तिथे एक काळ्या रंगाचा कॉम्प्युटर सुरू होता. त्याच्यावर आराध्याच्या ट्रेनिंग सेंटरची ब्लूप्रिंट आणि त्याच्या आत चाललेलं गुप्त निरीक्षण सुरू होतं.
“ती आमच्याच जाळ्यात येतेय… तिच्याकडील तो बॉक्स, तिची आठवण आणि त्या डायरीतील नोंदी… सगळं आपल्याच हाती येणार,” तो निशाला म्हणाला.
निशा आता फसव्या सौजन्याने आराध्याच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. तिने तिच्यासोबत ‘मैत्री’चे नवे रूप घेऊन एक प्लॅन आखला — आराध्याला एका गुप्त ठिकाणी घेऊन जाण्याचा.
शर्वायला त्यांच्या हालचालींची कल्पना होती. त्याने आधीच दत्ता आणि त्याच्या टीमला आराध्याच्या संरक्षणासाठी सज्ज ठेवलं होतं. त्याने आराध्याच्या लॉकेटमध्ये एक मायक्रो-ट्रॅकर आणि सुरक्षेचा सिग्नल डिव्हाइस बसवला होता.
त्याने स्वतःही एका वेगळ्या रूपात आराध्याजवळ राहण्याचा निर्णय घेतला — कधी ड्रायव्हर, कधी सिक्युरिटी, तर कधी सहाय्यक म्हणून. त्याचं उद्दीष्ट एकच — आराध्याला या अंधारातून बाहेर काढणं आणि तिच्यात दडलेली खरी शक्ती ओळखायला लावणं.
रात्री उशिरा, निशाने अचानक आराध्याला सांगितलं, “माझ्या ओळखीतली एक खास व्यक्ती तुला भेटायला इच्छुक आहे — खूप मोठ्या कंपनीत आहे. तू त्या व्यक्तीला भेटलीस तर तुझं करिअर झपाट्याने पुढे जाईल.”
आराध्या गोंधळली. पण निशा पहिल्यांदाच इतक्या आत्मीयतेने बोलत होती. त्यामुळे थोड्या संकोचानंतर ती तयार झाली.
शहराच्या एका टोकाला जाण्यासाठी त्यांनी टॅक्सी घेतली. थोडा सुनसान वाटणारा रस्ता होता. आराध्याला थोडं विचित्र वाटत होतं… पण तिने मनातल्या शंकेला दूर केलं.
“निशा सोबत आहे,” तिने स्वतःला समजावलं.
टॅक्सी एका जुनाट गोदामासमोर थांबली. निशा उतरली आणि आराध्यालाही उतरायला सांगितलं.
“इथे? ही तर कुठली तरी वेअरहाऊससारखी जागा वाटते!” आराध्या म्हणाली.
“हो, पण तो माणूस कुणालाही इथेच भेटतो — गुप्तता पाळायची असते त्याला…” निशाने खोटं हसत सांगितलं.
आराध्या धास्तावली, पण तिच्या गळ्यात असलेल्या लॉकेटवर हात जाताच, शर्वायच्या मोबाईलवर एक अलर्ट धडकतो — “SUBJECT UNDER THREAT.”
शर्वाय, दत्ता आणि त्यांची टीम लगेच हलते. त्यांच्या SUV वेगात त्या लोकेशनकडे धावू लागल्या.
त्या दरम्यान आराध्याला त्या गोदामात नेलं गेलं. एक अंधारलेला कोपरा… आणि तिथे एक आवाज घुमतो…
“शेवटी सापडलीस… तुझ्या अंगी असलेल्या गोष्टींचा तुझ्या इतकाच मला अंदाज आहे.”
तो माणूस जसा पुढे आला तसा. त्याच्या नजरेत क्रूरता अन् बोलण्यात आत्मविश्वास दिसत होता.
तेवढ्यात गोदामात मोठा आवाज झाला… गोदामाचं दार उडून आत धूर पसरला आणि धुरातून टॉप गिअरमध्ये गाडी घेऊन शर्वाय प्रवेश करता झाला.
“आराध्या, मागे हट!” तो मोठ्याने ओरडला.
आराध्या पटकन बाजूला सरकली… दत्ता आणि टीमने मधेच हस्तक्षेप केला.
शर्वाय त्या माणसाच्याच्या समोर उभा राहिला…. दोघांची नजरानजर झाली.
“आपल्या कौटुंबिक इर्षेपोटी एका मुलीचा असा वापर करशील आणि मी शांत बसेन असं वाटतंय तुला?” शर्वाय चिडून म्हणाला.
तो माणूस मागे हटला, त्याच्या हातात काहीतरी सिग्नल डिव्हाइस होतं…
“हे संपलेलं नाही शर्वाय. गेम तर आत्ताच सुरू होतोय.”
तेवढ्यात पोलीस सायरन ऐकू येतो. त्या माणसाने निशाला खूण केली तशी निशा तिथून धावत निघाली. तो माणूसही तिथून सटकला.
शर्वाय आराध्याकडे धावला… “तू ठीक आहेस का?”
आराध्या घाबरून थरथरत होती… पण शर्वायला पाहून तिला एक विश्वास वाटला.
“तुम्ही पुन्हा वेळेवर आलात… पुन्हा एकदा…”
शर्वायने तिच्या खांद्यावर हात ठेवला.
“ही फक्त सुरुवात आहे आराध्या. खरं वादळ अजून यायचं बाकी आहे.”
शर्वायने आराध्याला गाडीत बसवलं आणि ती शांत होईपर्यंत तिच्याजवळ थांबला. त्याने तिला पाणी दिलं… धीर दिला, आणि म्हणाला,
“तू खूप धाडसी आहेस, पण आता हे खेळ वेगळ्या पातळीवर जात आहेत. तुझी सुरक्षितता ही माझी जबाबदारी आहे.”
आराध्या अजूनही घाबरलेली होती, पण शर्वायच्या शब्दांमध्ये असलेला विश्वास आणि त्याचे नजर पाहून ती थोडी स्थिर झाली…
0000
दुसऱ्या दिवशी शर्वायने दत्ताला विशेष सूचना दिली.– “आराध्याचं ट्रेनिंग आता माझ्या कॉर्पोरेट हेड ऑफिसमध्ये होईल.”
“तसंच तिच्या राहण्याची सोय देखील इथे एखाद्या हॉस्टेलमध्ये कर आणि सोबतीला एक जण आपलं असेल, जे तिच्यावर लक्ष ठेवेल. पण कुणालाही संशय यायला नको. सोय देखील उत्तम व्हायला हवी.”
त्याचवेळी, माधव आणि निशा पुन्हा एकदा एकत्र भेटत होते.
माधव म्हणतो:.. “ती आपल्याकडून निसटली… पण तो बॉक्स अजून तिच्याजवळच आहे. तो बॉक्स जर मिळावायचा असेल तर, आता आराध्याला आपल्याकडे वळवावं लागणार आहे – विश्वास संपादन करून, तो बॉक्स ती आपल्याला देईल, अस पाहावं लागेल.”
0000
ऑफिसमध्ये आराध्याचं नव्याने ट्रेनिंग सुरू होतं. पण तिच्याभोवती एक प्रकारचा दबाव जाणवत होता. काही जण तिच्याकडे पाहून कुजबुजतात, काहीजण तिला न्याहाळतात…
“ती सरांच्या ओळखीची आहे म्हणे…”
“कोण आहे ही नेमकी? तिला सगळ्यांच्यापासून वेगळी वागणूक, वेगळं ठेवणं का होतंय?”
“शांत राहा, तिच्याभोवती सुरक्षा जास्त का आहे, विचार केलास का?”
आराध्या हे सगळं ऐकत होती, पण ती दुर्लक्ष करत कामात लक्ष घालते. तिच्या साध्या, सभ्य कपड्यांमध्येही ती वेगळेपणाने उठून दिसत होती —
साधा पांढऱ्या रंगाचा कुर्ता, निळा दुपट्टा, नीट बांधलेले केस. तिच्या डोळ्यांत अजूनही अनुभवलेली भीती असते… पण त्याचवेळी नव्या ताकदीची झलकही आता दिसू लागली आहे…
शर्वायचा नवा प्लॅन सुरू होतो —
आतल्या माणसाला शोधणं. त्याच्या कॉर्पोरेट सिस्टममध्येच कुणीतरी माहिती लीक करत होतं. तो आराध्याला न सांगता, तिच्यावर नजर ठेवण्याचा आणि तिला सावध ठेवण्याचा निर्णय घेतो.
ट्रेनिंगदरम्यान आराध्याला एक फाइल सापडली… जी आजवर कोणाच्याही हाती लागली नव्हती आणि पूर्वकल्पना नसताना तिच्या हाती ती सहज लागली होती… आणि इथेच सुरुवात झाली एक नवा गूढ धागा वीणायला…


