मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण…
संत तुकाराम महाराज यांच्या या अभंगात त्यांनी किती छान विचार मांडले आहेत. मन हे असे कोडे आहे की, दिसत तर नाही, पण सगळे काही सामावून घेते, सगळे काही घडवून आणते. मन प्रसन्न असेल तर कामं इतक्या चांगल्या पद्धतीने होतात की आश्चर्य वाटावे!
सकाळी जर छान गाणे ऐकले की, मन दिवसभर छान, प्रसन्न रहाते. समोर छानसे छोटेसे फूल जरी बिघतले तरी ते खूश होते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मानणारे, आनंद मानणारे हे मन कठीण परिस्थिती पण तेवढ्याच ताकदीने हाताळते. मन खंबीर असले की, कोणत्याच प्रकारे कोलमडून न जाता आपण उत्तर शोधू शकतो.
तर असे हे मन!
कोणाचे मन ओळखणे, कोणाचे मन वळविणे, मन जपणे, मनात घर करणे या सर्व गोष्टी शक्य होतात, जेव्हा आपले स्वत:चे मन प्रसन्न असेल तेव्हा! मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करण्याचीच गरज असते. मग बघा कशा सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात ते!
हेही वाचा – आश्वस्त करणारी मिठी
कधी कधी हेच सकारात्मक मन आपल्याला एखाद्या वाईट स्थितीतून बाहेर पडायचा मार्ग सुचवतं, तेव्हा हे मन आपलं गुरू असतं. कधी कधी जीवनातील एखाद्या छोट्याशा पराभवामुळे खचलेल्या मनाचं सांत्वन करतेवेळी हेच मन आपलं शिष्य असतं. कधी हे मन आपलं सेवक म्हणून काम करतं, तर कधी आपल्यावर अधिकार गाजवतं. मनाची प्रसन्नता आपल्या प्रगतीस तर मनाची निराशा आपल्या अधोगतीस कारणीभूत ठरत असते.
मन खंबीर असेल तर परिस्थिती पूणर्पणे विरोधात असली, तरी यश प्राप्त करता येते; पण हे सगळं जवळ असून, निव्वळ मन असहाय असेल, तर आपण पराभूत होऊ शकतो. असे तुकोबारायांनी या अभंगातून सांगितले आहे. तेव्हा या मनाला कसे वळवायचे हे प्रत्येकाने ठरवायचे.
मनामध्ये आपण राग साठवतो… दुःख साठवतो… अपमान साठवतो… आणि मग हा दुःखाचा साठा हळूहळू दु:खाचा डोंगर बनवतो… आणि मग हा डोंगर सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत येण्यास अडसर बनतो. त्यापेक्षा निसर्गातील दुसरी गोष्ट म्हणजे पाणी. या पाण्याचंही बघा, वाहतं पाणी स्वच्छ, ताजं, जिवंत असतं… आणि जे साठतं, ते डबकं होतं.
मनही तसंच आहे. मनाला प्रवाही ठेवणं खूप महत्त्वाचं आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी किती छान लिहिले आहे…
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना । मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥
चला तर या आपल्या मनाला जपू या, त्याला सकारात्मक विचारांनी घडवू या.


