विनायकचे मंदाशी लग्न झाले आणि मंदा परबांची सून म्हणून आमच्या गावात आली. खरंतर, विनायक नीलाशी लग्न करणार, असा सर्वांचा अंदाज होता; कारण कुठल्या कुठल्या जत्रेत दोघे फिरताना दिसत होती. नीला विनायकच्या दुकानात बऱ्याच वेळा दिसे आणि कारण नसताना त्याच्याशी हसत बोलत असे. त्यामुळे माझ्यासकट सर्वाना वाटतं होते, विनायक नीलाशी लग्न करेल, पण अचानक एक दिवस बातमी आली, विनायकचे लग्न ठरले… पण नीलाशी नाही तर तालुक्याच्या गावातील कुणा दुसरीबरोबर!
माझी पत्नी पण आश्चर्यचकित झाली. तिला ही बातमी समजली तेंव्हा ती मला म्हणाली, “काय चल्ला तुमच्या मित्राचा? एका मुलीक फिरवल्यानं आणि दुसऱ्याबरोबर पाट धरता?”
“आसता बाये एखाद्याचा नशीब… तेंका होयो तितके बायलो गावातत!”
मग मला कळले विनायकच्या आई-बाबांना नीला पसंत नव्हती. त्याचे बाबा मला रस्त्यात भेटले तेव्हा म्हणाले, “नीला म्हणजे चालू पोर ता… कोणाचेय गाडीवर बसून जाईत… मी विन्याक सांगलंय… त्या पोराक माझ्या घरात हाडू नको!”
मी गप्प झालो. शेवटी विनायकचे मंदाशी लग्न झाले. मंदा दिसायला यथातथाच होती, पण गुणी होती. तिला घरातील कामे उत्तम येत. ती घरात आली अन् परबांचे घर आणि परिसर स्वच्छ दिसू लागला. तिला अनेक पदार्थ येत, त्यामुळे विनायकचे आई-बाबा खूश होते; शिवाय, हे सर्व ती खालच्या मानेने करी. पण विनायकचे लग्न झाले तरी, नीलाचे कारण नसताना विनायकच्या दुकानात जाणे आणि चेष्टामस्करी करणे कमी झाले नव्हते. एक दिवस माझी पत्नी मला म्हणाली,
“तुमच्या मित्राच्या दुकानात गेल्लात हल्ली?”
“जातंय मधी मधी…”
“त्या नीलाचो मुक्काम अजून आसता म्हणे दुकानात?”
“मी पण बघितलंय. पण आपण काय करू शकतो दुसऱ्याच्या खासगी आयुष्यात?”
“पण आता घरात बाईल आसा ना? पूर्वीचे दिवस वेगळे… आता सांभाळून वागा…”
मी गप्प राहिलो.
गणपतीच्या दिवसांत परबाकडे सत्यनारायण होता म्हणून माझी पत्नी त्यांच्या घरी मदतीला गेलेली. रात्री घरी आल्यावर मला म्हणाली,
“मंदा गप्प गप्प होती. त्यांच्याकडे काम करणारी काशी म्हणत होती – मंदाक अंदाज इलोवा… कोणीतरी चिठ्ठी लिहून विनायक आणि नीलाची भानगड आसा, अशी बातमी दिलिया… त्या दिवसापासून मंदा गप्प गप्प आसा. मंदान आपल्या आईवडिलांका बोलावून आणल्यानं… तेनी जावयाक जाब विचारलो. पण विन्यात काय बदल नाय. विन्याच्या आईबाबांनीपण विन्याची खरडपट्टी काढली, पण…”
शेवटी मी विन्याचा मित्र म्हणून त्याच्याशी बोलायला गेलो.
“विन्या, पूर्वीचे दिवस वेगळे पण आता घरात मंदा आसा… तेच्याशी लग्न करून तेका घरात आणलंस… आता त्या नीलाचो नाद सोड, त्या नीलापायी तुजो दुकानात लक्ष नाय आणि संसारात पण नाय. लहान गावात असले गोष्टी प्रत्येकाक कळतत आणि ते तुझ्या बायकोक पण कळले बहुतेक…”
“पण मी बाबांका सांगाललंय, माका मंदाशी लग्न करूचा नाय, तरीपण माझ्या गळ्यात घातल्यानी…”
“पण त्यात त्या मंदाचो काय दोष? तेच्या गळ्यात माळ घातलास ना? असो, दोन दगडावर पाय ठेवून मोठ्या संकटाक आमंत्रण देतंस, या लक्षात ठेव.”
हेही वाचा – एक स्त्री म्हणून माझं काय चुकलं?
दसऱ्याच्या सुमारास नीला गावातून नाहीशी झाली. तिचे आईवडील तिला शोधत होते. त्यांनी त्त्यांचे सर्व नातेवाईक, ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली… पण तिचा पत्ता लागला नाही. मग लोकांत कुजबूज सुरू झाली… विन्यानं नीलाक म्हापश्यात ठेवल्यानं आणि शनिवारी-रविवारी आपण तिकडे जाता. आता विन्याचे दुकानात पण लक्ष नव्हते, त्याच्या दुकानात अनेक वस्तू मिळतं नव्हत्या… दुकानातील कपाटे खाली दिसू लागली.
पंधरा दिवसानंतर माझी बायको मला सांगू लागली, “मंदा दिवाळीक माहेरी गेला, ता परत येऊकच नाय…”
मला वाईट वाटतं होते, एका नीलापायी परबांच्या घरात दुःख आले होते. विन्याचे आईबाबा साधी माणसे होती. त्यांना विन्याचे वागणे आवडत नव्हते, पण विन्यापुढे त्त्यांचेही काही चालत नव्हते… त्यात विन्याचे दुकानाकडे दुर्लक्ष करणे, त्यांना त्रास देत होते.
दिवाळीनंतर मंदाच्या वडिलांनी तिला सासरच्या घरी पोहोचवले. घरी आल्यापासून मंदा गप्प गप्पच होती. विन्याला मंदा घरात असली काय नसली काय, फरक पडत नव्हता. दुपारी घरी जेवण मिळत होते. मग मला कळले मंदा नवऱ्याबरोबर भांडत होती, त्या नीलाचा नाद सोडण्यास सांगत होती. आपल्या जीवाचे बरे-वाईट करण्याची धमकी देत होती. पण विन्या कुणाला भीक घालत नव्हता. शनिवार-रविवार नीलाकडे पळत होता.
…आणि एके दिवशी मी तालुक्याच्या गावात जायचे म्हणून सकाळी लवकर स्कूटरला किक् मारत होतो… एवढ्यात परबांच्या घराकडून आरडाओरड ऐकू आली… मोठमोठ्याने रडणे ऐकू आले… माझी बायको पटकन घरातून बाहेर आली आणि मी स्कूटर परबांच्या घराकडे जोरात घेतली… मी आणि पत्नी पटकन घरात शिरलो… विन्याची आई मोठमोठ्याने ओरडत होती… बाबा थरथरत उभे होते… मंदाने विष घेतलेले दिसत होते… तोंडाला फेस आला होता. माझी बायको पटकन पुढे झाली… मी आणि तिने मंदाला उचलून बाहेर रिक्षात घेतले, रिक्षा सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने धावू लागली.
हॉस्पिटलमध्ये पोचण्याआधी मंदाने मान टाकली होती. डॉक्टरनी तिच्या मृत्यूची खात्री केली… मग शवविच्छेदन… पोलीस तक्रार… विन्याला अटक… केस सुरू झाली.
मंदाच्या आत्महत्येमुळे परबांच्या घरावर अवकळा आली. मंदाच्या वडिलांनी विनायक तिला त्रास देत असल्याने आणि त्याच्या बाहेरख्याली वागण्याने कंटाळून मंदाने विष घेतले, असा जबाब दिला. विन्या चार महिने जेलमध्ये राहिला आणि मग जामीनावर सुटला. त्याच्या दुकानाचे बारा वाजलेच होते…
विन्याचे आईबाबा या घरात राहायला घाबरू लागले. तरूण सूनेने घरात जीव दिला होता. तिचा आत्मा या घरात घुटमळतो आहे, असा त्यांचा समज झाला होता. विन्या आता नीलाकडे रहात होता. विन्याच्या आईला वाईट वाईट स्वप्ने पडू लागली, त्यात तिची सून रडताना दिसू लागली. विन्याच्या बाबांना कुणीतरी रडताना ऐकू येऊ लागले… त्या दोघांची झोप उडाली. शेवटी दोघांनी ते घर सोडले आणि ते त्यांच्या कुटुंबाच्या जुन्या घरी राहू लागले.
मग जिकडेतिकडे बातमी पसरली… कुणाला केस सोडलेली मंदा दिसू लागली, कुणाकुणाला विहिरीवर कपडे धुणारी मंदा दिसू लागली… त्या वाडीतील लोकांनी त्या विहिरीवर जाणे सोडले.
गेले कित्येक वर्षे हा बंगला बंद आहे. मध्यंतरी विन्याचे वडील वारले… मग दोन वर्षांनी त्याची आई वारली. म्हापशाला रहात असलेली नीला मग गावात आली, त्या बंगल्यात विन्यासह राहू लागली… तिची मुलगी पाच वर्षांची होती.
नीला या बंगल्यात राहू लागली खरी, पण तिची मुलगी सतत आजारी पडू लागली. तिचे शाळेत लक्ष लागेना… नीलाला पण वाटू लागले, मंदाचा आत्मा या घरात वावरतो आहे… तो कुणाला सुख देणारं नाही. तिने विन्याला सांगून जागा बदलली.
आता लोकांची खात्रीच झाली – या घरात मंदाचा अतृप्त आत्मा कुणाला टिकू देत नाही… त्यामुळे लोक या घराला म्हणू लागले… भुताचा बंगला.
भुताच्या बंगल्याच्या आजूबाजूला झाडी वाढली. गेट गंजून गेले. विहिरीवरील पाण्याला शेवाळं चिकटलं. कुणी सुद्धा त्या बाजूला जाईना. त्या बंगल्याच्या समोर बसस्टॉप होता… त्याचे पण नाव पडले – ‘भुताचा बंगला स्टॉप’!
जागा विनायकच्या नावे होती. विनायक आता म्हातारा झाला होता, नीला पण म्हातारी. त्यांची लेक शहरात होती. विनायकला पैशाची निकड होती… म्हणून तो ही जागा आणि बंगला विकायला निघाला. पण कोण जागा विकत घेईना. तो मला सांगायला लागला… “या बंगल्यासाठी गिऱ्हाईक बघ.”
मी त्याला म्हटले, “ही जागा भुताची म्हणून प्रसिद्ध झालीया… आपल्या भागातलो कोण विकत घेऊचो नाय. कोणी बाहेरचो आलो तर बघूया.”
पुढील दहा वर्षे तो बंगला तसाच होता… हळूहळू जीर्ण होत चाललेला.
बाबूभाई पटेल यांची शहरात हार्डवेअर दुकानें होती. त्यांचे या भागावर लक्ष होते. त्यांच्या मेहुण्यासाठी किरण पटेल यांना जागा हवी होती. जमिनीच्या एका एजंटने त्यांना ही जागा दाखवली. बाबूभाईना जागा आवडली. पण अनेकांनी त्याना हा ‘भूतबंगला’ असल्याचे सांगितले. इथे रात्रीची भूते येतात, असे पण सांगितले. बाबूभाई हसले… त्यांच्या लक्षात आले, ही जागा कोण घेणार नाही, मालकाकडे किंमत पाडून मागायला हवे.
बाबूभाई विनायकला भेटले. विनायक खूश झाला कारण पहिल्यांदाच कुणी गिऱ्हाईक आले होते. विनायकने किंमत सांगितली, त्याच्या निम्याने बाबूभाईंनी जागा मागितली आणि पदरात पाडून घेतली. विनायक खूश कारण त्या जागेचे थोडेतरी पैसे मिळाले होते!
बाबूभाईंनी जेसीबी मागविले आणि संपूर्ण बंगला पाडला. तिथे बिल्डिंग उभी केली. खाली दुकान, त्याच्या बाजूला गोडावून आणि वरती राहायला मोठा फ्लॅट.
हेही वाचा – …अन् यमुनाकाकीच्या लक्षात आले, ‘शेवटी आहे कोण?’
बाबूभाईंचा मेहुणा किरण पटेल याने हार्डवेअर दुकान सुरू केले. भरपूर माल ठेवला. परिसरातील सुतार, वेल्डर, बांधकाम कामगार सर्वांशी गोड बोलून धंदा बसवीला. दुकानावरती घरी बायको, मुले राहायला आली. नातेवाईक येत-जात राहिले. गाड्या आल्या, ट्रक्स आले… पटेलच्या धंद्याला बरकत आली.
पण गावातील जुने लोक अजून पटेलकडे ‘मंदाचे भूत दिसते का?’ याचीच चौकशी करत राहिले.


