भाग – 13
गुंता वाढत चाललाय जुईली… विसर… हे विसर. गुंतव स्वतःला कशात तरी जुईली… तुला आवडतंय ते कर. चल ब्रश आणि कॅनव्हास उचल… घे हवे ते रंग, हवे तसे, हवे तेवढे… उतरव तुझ्या कॅनव्हासवर… उठ जुईली.. उठ…
जुईलीने घड्याळात बघितलं. रात्रीचे दोन वाजलेले. हे आतून कुणीतरी जुईलीला हाका देत होतं. अगदी आतून, तळाशी…! एवढा वेळ या कुशीवरून त्या कुशीवर होत जुईलीने कितीतरी उमाळे गिळले. कितींदा रडूनही घेतलं. नाही, नव्हे… ही जुईली नव्हेच. निखळ हसणारी, इतरांना हसवणारी… सतत कशा ना कशात गुंतलेली… ती ही जुईली नव्हेच… कोण आहेस तू? उठ जुईली, आता बस झाली स्वतःशी स्वतःची बेईमानी, कळतंय ना तुला? हे काय चाललंय, काय वागतेयस, काय होतेयस हळूहळू? सतत एक आवाज जुईलीला ऐकू येत होता… कळत होतं, पण वळत नव्हतं…
हेही वाचा – आले जल गेले जल झाले जल आरपार…
जुईलीने नाइट लॅम्प ऑन केला. उठून बसली आणि पाण्याची बॉटल तोंडाला लावली. हे खरंच तिचं तिलाही कळतच नव्हतं. काय चाललंय, कसं चाललंय! ती बेडवरून उठून खिडकीपाशी आली. पडदा बाजूला करून तिने बाहेर बघितलं. रात्र गडद काळ्यात बुडत चालली होती. काळा रंग… रात्रीच्या कॅनव्हासवर जणू कुणी ओतून दिला होता आणि उगीच रागारागाने सगळीकडे फासून टाकला होता… रस्त्यावरचे दिवे, चांदण्या या गरज नसताना स्वतःची जागा त्यात तयार करत होत्या. असू दे, होता की काळा रंग! काळा रंग अजून गडद होतं गेला असता, म्हणजे मग काहीच दिसलं नसतं… वाढलेलं गवत, बिल्डिंगखाली पार्क केलेल्या गाड्या, पलीकडच्या बिल्डिंगमधला केबिनबाहेर डुलक्या काढणारा सिक्युरिटी, पलीकडच्या बिल्डिंगजवळ आजूबाजूला हिंडणारी कुत्री आणि रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांमध्ये लागलेली भुंकायची चुरस, मधेच एखादी गाडी किंवा एखादा ट्रक रस्त्यावरून येणारा जाणारा… कुणी नसलं तरी चाललं असतं या कॅनव्हासवर! काहीतरी नवीन काढता आलं असतं. आपल्याला हवं हवं तसं…
जुईली तिथून उठली आणि तिने पेपर बोर्डला लावला. कानात इअरफोन घातले. ब्रशचा जुडगा घेऊन तिने रंगांकडे हात घातला. कपाटातले रंग घेऊन ती खिडकीशेजारी बोर्ड मांडून बसली. पांढऱ्या रंगाच्या कागदावर तिने काळा रंग ओतला. ब्रशच्या फटकाऱ्याने तिने तो सगळीकडे पसरवला. एखाद्या भुकेल्या जीवासारखे तिचे हात कागदावर भराभर चालत होते. या काळोखात आता तिने चांदण्या पसरवल्या. एक खिडकी त्यात उघडली गेली. ही खिडकी तिच्या गावातल्या घरातली. मातीच्या भिंतीची… शेणाने सारवलेल्या जमिनीचा वास सोबत घेऊन आलेली. त्या खिडकीत पाय बाहेर टाकून बसली एक मुलगी… खोल ताऱ्यांना बघत… तिच्या पायाशी चांदण्या… एक-दोन नाही… कित्तीतरी चांदण्या!
हेही वाचा – घुसमट… मेसेजला श्रीकडून रिप्लायच नाही!
“पडशील, नीट बस…” आई मागून ओरडतना ऐकू येत होतं.
“जरा जरी तोल गेला तर पडशील हा जुयू…” बाबा ओरडले.
“जुई घट्ट रहा स्वतःच्या जागेवर. खंबीर रहा…” आतून आवाज आला… पुन्हा आतला तळातला आवाज…
अशावेळी संदीप तिला मांडीवर घेऊन थोपटत शांत गात होता…
मन होई मेघवेडं ओल्या राती
मेघ गाई मेघधून कुणासाठी…


