सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
हे बापुडी लोकसृष्टी । मोटकीये विपाइली दिठी । आणि दुःखकालिंदीचां तटीं । झाड होऊनि ठेली ॥347॥ तुज महामृत्यूचां सागरीं । हे त्रैलोक्यजीविताची तरी । शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे ॥348॥ एथ कोपोनि जरी वैकुंठें । ऐसें हन म्हणिपैल अवचटें । जें तुज लोकांचें काइ वाटे । तूं ध्यानसुख हें भोगीं ॥349॥ वरी जी लोकांचें कीर साधारण । वायां आड सूतसें वोडण । केवीं सहसा म्हणें प्राण । माझेचि कांपती ॥350॥ ज्या मज संहाररुद्र वासिपे । ज्या मजभेणें मृत्यु लपे । तो मी अहाळबाहळी कांपें । ऐसें तुवां केलें ॥351॥ परि नवल बापा हे महामारी । इया नाम विश्वरूप जरी । हे भ्यासुरपणें हारी । भयासि आणी ॥352॥
नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम् । दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥24॥
ठेलीं महाकाळेंसि हटेंतटें । तैसीं कितीएकें मुखें रागिटें । इहीं वाढोनियां धाकुटें । आकाश केलें ॥353॥ गगनाचेनि वाडपणें नाकळे । त्रिभुवनींचियाही वारिया न वेंटाळे । ययाचेनि वाफा आगी जळे । कैसें धडाडीत असे ॥354॥ तेवींचि एकसारिखें एक नोहे । एथ वर्णावर्णाचा भेदु आहे । हो कां जें प्रळयीं सावावो लाहे । वन्हि ययाचा ॥355॥
हेही वाचा – Dnyaneshwari : हे तुझेनि आंगिकें तेजें । जाळूनि सर्व कर्मांचीं बीजें
अर्थ
त्या बिचार्या त्रैलोक्यावर जेव्हा थोडीशी नजर टाकली तेव्हा ते दु:खरूप कालिंदीच्या (यमुनेच्या) किनार्यावर झाड बनून राहिले आहे (असे दिसले). ॥347॥ तू जो महामृत्युरूप समुद्र, त्यात ही त्रैलोक्याच्या जीविताची नौका शोकरूप प्रतिकूल वार्याने उत्पन्न झालेल्या लाटांमुळे झोके खात आहे. ॥348॥ ‘तुला या लोकांचे काय वाटते? तू माझ्या या ध्यानाचे सुख भोग म्हणजे झाले!’ अहो श्रीकृष्णा, असे जरी आपण आता एकाएकी रागावून बोललात तरी- ॥349॥ पण महाराज, माझ्याच जीवास भीतीने कंप सुटला आहे, असे मी एकदम कसे म्हणावे? म्हणून जगाचे सर्वसाधारण दु:ख उगीच आडपडद्यासारखे खरोखर मधे केले आहे. ॥350॥ ज्या मला प्रलयकाळचा रुद्र (देखील) भितो, ज्या माझ्या भयाने मृत्यू लपून रहातो, असा जो मी, तो या ठिकाणी भयाने फार कापत आहे, असे तू केले आहेस. ॥351॥ परंतु हे पाहा, ही महामारीच आहे आणि यालाच जर विश्वरूप म्हणावयाचे, तर बापा, हे एक आश्चर्यच आहे. ही महामारी आपल्या विक्राळ स्वरूपाने (साक्षात) भयासही माघार घ्यावयास लावते. ॥352॥
हे विष्णो, गगनाला स्पर्श करणाऱ्या, अनेक रंगांनी युक्त, जबडा पसरलेल्या, दीप्तिमान आणि विशाल नेत्र असलेल्या, अशा तुला पाहून ज्याचा अंतरात्मा व्याकूळ झाला आहे, असा मी धैर्य धरू शकत नाही आणि शांती देखील धरू शकत नाही. ॥24॥
महाकाळाबरोबर ज्यांनी पैजेने बरोबरीचा सामना बांधला आहे, अशी कित्येक रागीट मुखे असून त्यांनी आपल्या विस्ताराने आकाश लहान केले आहे. ॥353॥ आकाशाच्या मोठेपणास जी आकळली जात नाहीत आणि त्रिभुवनातील वार्यानेही जी, (मुखे) वेष्टिली जात नाहीत, त्या मुखांच्या वाफेने अग्नी जळतो, या मुखांतून अग्नीचे लोळ कसे बाहेर येत आहेत! ॥354॥ त्याप्रमाणे एकसारखे एक मुख नसून यांच्यात रंगारंगांचा भेद आहे. फार काय सांगावे! अशा या मुखांचे प्रळयकाळचा अग्नीसुद्धा सहाय्य घेतो. ॥355॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जी लोचना भाग्य उदेलें, जीवा सुखाचें सुयाणें पाहलें


