मध्यंतरी आयबीएससाठी भेटलेला पेशंट फॉलोअपसाठी ओपीडीत आला होता.
“आधीपेक्षा किती फरक पडला?” – मी.
पेशंट : 50 टक्के
मी : औषधं आहेत की संपलीत?
पेशंट : ते काय झालं, औषधं घेतली आणि गावी जावं लागलं.
चौथ्या दिवशी लगेच परतलो पण औषध तिथंच राहिली.
“औषधं गावी राहिली ठीक आहे, पण जगातून संपली तर नाहीत ना? इथं आल्यावर नवी घ्यायची की?” या माझ्या तर्कावर पेशंटकडं काही एक उत्तर नव्हतं…
“पन्नास टक्के औषधं न घेताही 50% फरक पडला होता म्हणजे कोर्स पूर्ण केला असता तर अधिक बरं वाटलं असतं की नाही?”
संशोधक शोध लावतात, डॉक्टर निदान करतात, एकूणच उपचारांची आता सहज उपलब्धता आहे, यामुळं लोकांनी आजारांनाही ‘गृहित’ धरलंय! या पार्श्वभूमीवर मला स्टिव्हन टाऊनची एक गोष्ट आवर्जून आठवते…
हेही वाचा – ‘त्या’ प्रयोगाने मृत्यू अन् जीवनातली शास्त्रीय खिडकी झाली किलकिली
साल असावं 1922 आणि ऋतू होता हिवाळा. कॅनडाच्या ओंटॅरियो प्रांतावर बर्फाची पांढरी चादर पसरली होती… संपूर्ण जगात नुकताच ‘इन्सुलिन’ नामक एक चमत्कार घडला होता; डायबिटिस म्हणजे मृत्युदंड असताना आता अचानक आशेची किरणं दिसू लागली होती, पण ही किरणं एव्हाना सर्वांपर्यंत पोहोचली नव्हती…
ओंटॅरियोच्या उत्तरेस एक छोटंसं लाकडी वस्तीचं गाव होतं ‘स्टिव्हन्स टाऊन’. विज्ञानाचे चमत्कार तिथं अद्यापही दंतकथाच होते… एक डॉक्टर, औषधांचा साठा अपुरा आणि बर्फ पडायला लागला की, गाव जणू जगापासून तुटून जात असे!
याच गावात राहत होता 12 वर्षांचा सॅम्युअल ऊर्फ सॅम… अतिशय चतुर, हसरा आणि पळण्यात अख्ख्या गावात अव्वल… हिवाळ्याच्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत सॅम अचानक अशक्त पडू लागला; त्याला खूप भूक लागायची, पण वजन मात्र झपाट्यानं कमी होत होतं… सारखी तहान लागत होती, घसा कोरडा पडत होता आणि मधनंच लघवीला व्हायचं…
गावातल्या एकमेव डॉक्टरने तपासून सांगितलं, ”याला डायबिटिस आहे आणि तूर्तास आपल्याकडं उपचार नाहीत..”
सॅमची आई हादरली. तिला माहीत होतं, त्या काळात डायबिटिस म्हणजे ‘हळूहळू संपणारा जीव’ अर्थात सायलेंट किलर…
कॅनडातच टोरोंटोमध्ये बँटिंग आणि बेस्ट यांनी इन्सुलिन तयार केलं आणि जगाची वैद्यकीय दिशा बदलली. शहरात रुग्ण वाचायला लागले, त्यांचं वजन वाढू लागलं… मृत्यूला आळा बसू लागला!
पण स्टिव्हन्स टाऊनपर्यंत तो चमत्कार पोहोचायला अजून काही आठवडे बाकी होते… इकडं सॅमची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती. डायबेटिक केटो-अॅसिडोसिसची लक्षणं दिसू लागली, दम लागणं, गोड वासाचा श्वासोच्छ्वास, भ्रम-भास…
डॉक्टरने त्याच्या आईचा हात धरून म्हटलं, ”इन्सुलिन आत्ताच हवं… नाही तर हातातली वेळ निसटून जाईल.”
हेही वाचा – मानसशास्त्रज्ञ ते जाहिरात क्षेत्रातील जादूगार!
त्या काळात बर्फाच्या वादळामुळं गावातले सगळे रस्ते बंद होते. गावात पोस्टल वॅगन, गाडी, बोट काहीच येऊ शकत नव्हतं… सॅमनं त्या रात्री आईचा हात घट्ट धरला. डोळ्यांत पाणी, भीती आणि एका बालमनाचा विश्वास…
“आई, उद्या मी बरा होणार आहे ना?”
आई काहीच बोलू शकत नव्हती, ती हतबल होती… तिच्या हातात काहीच नव्हतं. सकाळी सूर्य डोंगरामागून बाहेर आला, वादळ बऱ्यापैकी थंडावलं, रस्ते खुले झाले. वाहतूक सुरू झाली… गावात गडबड सुरू झाली. पोस्टमनची घोडागाडी धडधडत गावात पोहोचली, थकलेल्या पोस्टमनच्या हातात छोटासा थंडगार लोखंडी डबा होता आणि त्यात होत्या गावात पहिल्यांदाच आलेल्या इन्सुलिनच्या लहान बाटल्या…
पोस्टमननं गावात येताच सगळ्यात आधी डॉक्टरच्या हातात हा डबा सोपवला, पण त्यांच्या हातातून तो डबा खालीच पडला… जीवन देणारं औषध आलं होतं, पण ज्याच्यासाठी सर्वांत गरजेचं होतं तो ‘सॅम’ भल्या पहाटेच हे जग सोडून कायमचा निघून गेला होता..


