सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनंजयः । प्रणम्य शिरसा देवं कृताञ्जलिरभाषत ॥14॥
तेथ एक विश्व एक आपण । ऐसें अळुमाळ होतें जें दुजेपण । तेंही आटोनि गेलें अंतःकरण । विरालें सहसा ॥245॥ आंतुला महानंदा चेइरें जाहलें । बाहेरि गात्रांचें बळ हारपोनि गेलें । आपाद पां गुंतलें । पुलकांचलें ॥246॥ वार्षिये प्रथमदशे । वोहळलया शैलाचें सर्वांग जैसें । विरूढे कोमलांकुरीं तैसे । रोमांच आले ॥247॥ शिवतला चंद्रकरीं । सोमकांतु द्रावो धरी । तैसिया स्वेदकणिका शरीरीं । दाटलिया ॥248॥ माजीं सापडलेनि अलिकुळें । जळावरी कमळकळिका जेवीं आंदोळे । तेवीं आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें । बाहेरि कांपे ॥249॥ कर्पूर केळीचीं गर्भपुटें । उकलतां कापुराचेनि कोंदाटें । पुलिका गळती तेवीं थेंबुटें । नेत्रोनि पडती ॥250॥ ऐसा सात्त्विकांही आठां भावां । परस्परें वर्ततसे हेवा । तेथ ब्रह्मानंदाची जीवा । राणीव फावली ॥251॥ उदयलेनि सुधाकरें । जैसा भरलाचि समुद्र भरे । तैसा वेळोवेळां उर्मीभरें । उचंबळत असे ॥252॥ तैसाचि तया सुखानुभवापाठीं । केला द्वैताचा सांभाळु दिठी । मग उससौनि किरीटी । वास पाहिली ॥253॥ तेथ बैसला होता जिया सवा । तियाचिकडे मस्तक खालविला देवा । जोडूनि करसंपुट बरवा । बोलतु असे ॥254॥
अर्जुन उवाच :- पश्यामि देवांस्तव देव देहे सर्वांस्तथा भूतविशेषसंघान् ॥ ब्रह्माणमीशं कमलासनस्थमृषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान् ॥15॥
म्हणे जयाजयाजी स्वामी । नवल कृपा केली तुम्हीं । जें हें विश्वरूप कीं आम्ही । प्राकृत देखों ॥255॥ परि साचचि भलें केलें गोसाविया । मज परितोषु जाहला साविया । जी देखिलासि जो इया । सृष्टीसी तूं आश्रयो ॥256॥
हेही वाचा – Dnyaneshwari : अनावरें मुखें समोर देखे, तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके
अर्थ
तेव्हा तो आश्चर्ययुक्त आणि रोमांचयुक्त झालेला अर्जुन देवासमोर मस्तक नमवून, हात जोडून म्हणाला. ॥14॥
त्यावेळी आपण विश्वाला पहाणारा एक निराळा आणि विश्व (पाहाण्याचा विषय) एक निराळे असे थोडेसे द्वैत होते, तेही नाहीसे झाले आणि अंत:करण एकदम (त्या विश्वरूपात) विरघळून गेले. ॥245॥ अंत:करणात ब्रह्मानंद जागृत झाला. (त्यामुळे) बाहेर इंद्रिये ढिली पडली आणि मस्तकापासून पायांपर्यंत सर्व शरीरावर रोमांच उभे राहिले. ॥246॥ पावसाळ्याच्या आरंभी पर्वताच्या अंगावरून पाणी वाहून गेल्यावर, त्या पर्वतावर जसे कोवळे गवताचे अंकूर उत्पन्न होतात, तसे (अर्जुनाच्या सर्व शरीरावर) रोमांच आले. ॥247॥ चंद्रकिरणांनी सपर्श केलेला चंद्रकांतमणी जसा पाझरतो, त्याप्रमाणे त्याच्या (अर्जुनाच्या) सर्व अंगावर घामाचे दाट बिंदू आले. ॥248॥ कमळाच्या कळीमध्ये भुंग्याचा समुदाय सापडल्यामुळे ती कळी जशी पाण्यावर इकडून तिकडे आदळते, त्याप्रमाणे अंत:करणातील सुखाच्या लाटांच्या वेगाने बाहेर त्याचे सर्व अंग कापत होते. ॥249॥ कापराच्या विपुलतेने, कापुरकेळीच्या गाभ्याची सोपटे उकलून त्यातून जसे एकामागून एक असे कापराचे कण गळतात, त्याप्रमाणे त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू गळत होते. ॥250॥ याप्रमाणे अष्टसात्विक भावात देखील एकमेकांत चढाओढ लागली होती, त्या स्थितीत (अर्जुनाच्या) जीवाला ब्रह्मानंदाचे राज्य प्राप्त झाले. ॥251॥ भरलेल्या समुद्रास चंद्रोदयाने जशा भरत्यांवर भरत्या येतात, त्याप्रमाणे आनंदाच्या लहरीच्या वेगाने त्याचे अंत:करण वेळोवेळी उचंबळत होते. ॥252॥ तसे त्या सुखाच्या अनुभवानंतर कृपादृष्टीने श्रीकृष्णाने द्वैताचा सांभाळ केला (म्हणजे देव आणि भक्त असे वेगळेपण ठेवले). म्हणून मग अर्जुनाने दीर्घ श्वासोच्छ्वास सोडून श्रीकृष्णाकडे पाहिले. ॥253॥ आपण ज्या बाजूकडे तोंड करून बसला होता, त्याच बाजूला अर्जुनाने आपले मस्तक लववून देवास नमस्कार केला आणि आपले दोन्ही हात जोडून चांगल्या रीतीने बोलावयास लागला. ॥254॥
अर्जुन उवाच – हे देवा, तुझ्या देहामध्ये (सर्व) देव, त्याचप्रमाणे (स्थावरजंगमादी) भूतविशेषांचे सर्व समुदाय, कमलामध्ये असलेला ब्रह्मदेव, शंकर (आणि विष्णू), सर्व ऋषी आणिव दिव्य नाग मी पाहात आहे. ॥15॥
अर्जुन म्हणाला, हे प्रभो, तुमचा जयजयकार असो. आम्ही सामान्य असूनही हे विश्वरूप पाहाण्यास समर्थ झालो, ही तुम्ही अद्भूतच कृपाच केली. ॥255॥ पण महाराज, आपण खरोखर चांगले केलेत. तू या सर्व सृष्टीला आश्रय आहेस, असे पाहिले आणि सहजच मला सामाधान वाटले. ॥256॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : ऐसें महात्म्यया हरीचें सहज, फांकतसे सर्वांगीचें तेज


