Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    वास्तव अन् आभासी जगामधली धूसर रेषा!

    April 27, 2026

    सोन्याचा हिशेब ऐकून जजही चक्रावले!

    April 27, 2026

    शाळेचा डबा अन् गुंडाळी पोळी

    April 27, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, April 28
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सोन्याचा हिशेब ऐकून जजही चक्रावले!
    ललित

    सोन्याचा हिशेब ऐकून जजही चक्रावले!

    ॲड. कृष्णा पाटीलBy ॲड. कृष्णा पाटीलApril 27, 2026No Comments10 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीवाचन, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, सोन्याचा हिशेब, एक कोटीचे सोने, 20 हजारांत एक कोटीचे सोने, एक कोटीचा हिशेब, जमिनीची वाटणी, जमिनीच्या वाटणीत अन्याय, बंटी शेठ विरुद्ध संपूर्ण कुटुंब
    फोटो सौजन्य - गूगल जेमिनी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    दिवस उगवायला ते घराबाहेर पडणार होते. तसं कालच ठरलं होतं. परंतु सकाळचे नऊ-साडेनऊ झाले तरी काही हालचाल नव्हती. बाहेर रखरखीत ऊन पडलं होतं. खरं म्हणजे बंटी शेठचा घरातनं पाय निघत नव्हता. न राहून ड्रायव्हरने दोन वेळा हॉर्न वाजवला. दारात गाडी येऊन बराच वेळ झाला होता. तरीही बंटी शेठ घरातून हालत नव्हते. रंगू पुढे झाली आणि झटक्याने म्हणाली, “कोर्ट बंद झाल्यावर वकिलांकडे जायाचं आहे का? आठ दिवस झालं चाललंय… आज जाऊ, उद्या जाऊ… आज तरी जायाचं हाय का न्हाय?”

    बंटी शेठ पटकन उठले. त्यांनी पान खायची पिशवी बरोबर घेतली. चपचपीत तेल लावलेल्या केसावर कसा तरी कंगवा फिरवला. अंगणात उभ्या असलेल्या पांढऱ्या शुभ्र चार चाकी गाडीत जाऊन ते गपचूप बसले. रंगूने दरवाजाला कुलूप घातले आणि गेट बंद करून तीही गाडीत बसली.

    घरापासून पंचवीस किलोमीटरवर वकिलांचे ऑफिस होते. काळाकुट्ट डांबरी रस्ता सरळसोट होता. रस्त्याला वाकडं वळण नव्हतं. गाडीने बऱ्यापैकी वेग घेतला होता. तसे तर तावडे वकील लांबून पाहुणेच होते. त्यांच्या कानावर काही गोष्टी अगोदरच घातल्या होत्या. परंतु, ते म्हणत होते प्रत्यक्ष भेटायला या. आपण अगोदर कागदपत्रे पाहू. मग पुढचा निर्णय घेऊ. बघता बघता पाच सहा वर्षे गेली. आज जाऊ, उद्या जाऊ करत आज योग आला. आज सुद्धा वाटत होतं की, भाऊ आणि वडिलांना शेवटचं एकदा विचारावं; नाहीतर कोर्टाचं हेलपाटं खावा म्हणून सांगावं. पण रंगूनं ऐकलंच नाही. पुन्हा वाटलं, कधीतरी एकदा केस करावीच लागणार आहे. जाऊया तर जाऊया…

    हेही वाचा – कामिनीने एवढा टोकाचा निर्णय घेणे गरजेचे होते का?

    आता कोर्ट-कचरी करायला सगळा वेळच आहे. दुकानाकडे दोन्ही मुलं चांगली मार्गस्थ झाली आहेत. दोन दुकानं, दोन ज्वेलऱ्या सगळं व्यवस्थित चालू आहे. आता गावाकडे राहून केस खेळावी लागली तरी खेळायची.

    “अहो, तावडे साहेबांना फोन तर लावा. त्यांची वेळ मागून घ्या. नाहीतर ते कुठंतरी जातील अचानक.”

    रंगूच्या आवाजाने बंटी शेठ भानावर आले. त्यांनी घड्याळाकडं पाहिलं. नंतर तावडे वकिलांना फोन लावला. दोन मिनिटं फोनवर बोलले. फोन बंद करून ड्रायव्हरला म्हणाले, “शिस्तीत जाऊ दे. दुपारी एक वाजेपर्यंत ते कुठं जाणार नाहीत.”

    कोर्टाच्या ऑफिसमध्ये तावडे साहेब कागदपत्रं चाळत बसले होते. तेवढ्यात दार वाजले म्हणून त्यांनी वर पाहिलं. एक जोडपं आत येत होतं. अंगावर उंची कपडे होती. श्रीमंत घराण्यातील वाटत होते. परंतु चेहऱ्यावर थकवा होता. डोळ्यांत अपेक्षा होत्या. मनात कुठेतरी खोलवर साचलेलं दुःख होतं… आत आल्यावर त्यांनी ओळखलं, हे तर मघाशी फोन केलेले बंटी शेठ आणि रंगूकाकी आहेत.

    तावडे साहेबांनी त्यांना बसायला सांगितलं. शेजारच्या टपरीवरून चहा मागवला. चहा भरलेले प्लॅस्टिक कप टेबलवर ठेवून पोऱ्या निघून गेला. तावडे साहेब म्हणाले, “आता निवांत बोला. फोनवर जास्त तपशीलवार बोलता येत नाही.‌ कारण कागदपत्रे पाहिल्याशिवाय काही सांगता पण येत नाही.”

    बंटी शेठनी पानाची काळी लेदरची पिशवी बाजूला ठेवली. चहाचा रिकामा कप जवळच्या कचराकुंडीत टाकला. बोटातल्या अंगठ्या फिरवत फिरवत ते बोलू लागले…

    “आम्ही दोघे भाऊ, एक बहीण आहे. बहिणीचं लग्न झालंय. आम्हाला एकूण साडेचार एकर जमीन आहे. वडिलांनी धाकल्या भावाच्या नावावर चार एकर जमीन केली आहे. मला फक्त अर्धा एकर जमीन ठेवली आहे. हा माझ्यावर खूप मोठा अन्याय आहे, साहेब.” त्यांनी डोकं खाली घातलं. त्यांच्या आवाजातली तगमग खरी वाटत होती.

    तावडे साहेबांनी शांतपणे विचारलं, “तुम्ही काय करता?” ते थोडे अभिमानाने म्हणाले, “मी सोन्या-चांदीच्या दुकानला आहे. तंजावरला असतो. खूप मेहनत करून पैसे कमावले. रात्रंदिवस भट्टीपुढंच होतो. विश्वासाने ते पैसे मी गावी पाठवले. त्या पैशातूनच शेती उभी राहिली.”

    त्यांची बायको लगेच म्हणाली, “हो सर, यांनी रात्रंदिवस काम केलंय. आम्ही सुख सोडलं, पण गावासाठी पैसा दिला. आज त्याचं काहीच चीज झालं नाही.”

    तावडे साहेबांनी विचारले, “तिकडे तंजावरला काही केलंय का नाही?”

    ते पुन्हा अभिमानाने सांगू लागले, “सर परमुलखात जाऊन सुद्धा मी तेथे स्वतः जागा घेऊन तीन मजली घर बांधले आहे. नागापट्टीनमच्या समुद्रकिनारी शंभर सेंट जागा घेतली आहे. तिथे नारळाची बाग लावली आहे. दोन मुलांना दोन ज्वेलऱ्या काढून दिल्या आहेत. बाकी सगळं ठीक आहे. सोन्याहून पिवळं आहे.‌ दुःख एकच आहे, गावाकडची जमीन मला काहीच मिळाली नाही. एक हजार नाही, दोन हजार नाही साहेब, एक कोटी रुपये मी शेतीत घातले आहेत.”

    तो बोलायला लागला आणि त्याच्या प्रत्येक शब्दातून जणू वर्षानुवर्षांचा राग आणि वेदना बाहेर पडत होत्या.‌ इतक्या कष्टाचा पैसा गावाकडे दिल्यावर दुःख होणं साहजिकच आहे. शिवाय, विश्वासघात झाला ही गोष्ट निराळीच! अशावेळी माणूस खचून जातो. संपूर्ण कुटुंब दुःखाच्या खाईत लोटलं जातं. या कुटुंबाची अवस्था सुद्धा अशीच झाली होती.

    तावडे साहेब म्हणाले, “तुमच्यावर अन्याय झाला आहे, ही गोष्ट खरी आहे. तुम्ही एवढा पैसा शेतीत घातल्यानंतर वाईट वाटणं साहजिक आहे. परंतु ही गोष्ट बहिणीला तरी माहीत असणारच की! बहीण तुमच्या बाजूने आहे ना?”

    तो म्हणाला, “नाही. बहीण वडिलांचीच बाजू धरत आहे.”

    “मग आई तर?”

    तो म्हणाला, “माझ्या बाजूने कोणीच नाही, साहेब. मी मात्र पैसा घालून रिकामा झालो. आता ते सगळेजण स्वार्थीपणाने वागू लागले आहेत. मी आई-वडिलांवर विश्वास ठेवला त्याचे हे फळ आहे. आमच्या घरात रोज भांडणे सुरू आहेत. आम्हाला अन्न गोड लागत नाही साहेब. काय सांगायचं?” बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

    तावडे साहेबांनी त्यांच्याकडे पाहिलं. दोघांच्याही डोळ्यांत पाणी होतं. त्यांची बाजू खरी होती. उमेदीच्या वयातली कमाई अशी वाया गेली तर कोणाला बरं वाटेल? पण ही गोष्ट खरी असली तरी, मनात एक शंका डोकावत होती… यांनी खरंच इतका पैसा कुटुंबासाठी घातला असेल, तर घरच्यांनी यांना साथ का दिली नाही? ऊलट याची बहीण, भाऊ, वडील, आई विरोधात कसे काय आहेत? तावडे साहेबांनी तो विचार बाजूला सारला आणि पुन्हा कागदपत्रे पाहिली.

    हेही वाचा – सूरजच्या आयुष्यात नवा ‘उष:काल’!

    तावडे साहेब म्हणाले, “आता आपणास दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल करावा लागेल. त्यासाठी लागणारी आणखी कागदपत्रे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ती घेऊन या. लगेच आपण वाटपपत्राचा दावा दाखल करू. तुमच्या वाट्याची जमीन शंभर टक्के तुम्हाला मिळून जाईल. काही काळजी करू नका.”

    अलीकडे वाटणीच्या दाव्यामध्ये कोर्ट जास्त वेळ केस चालू देत नाही. वाटप हे कधीतरी होणारच असते. जमीन वडीलोपार्जित आहे का? सर्व मुले त्याच व्यक्तीची आहेत का? एवढेच पाहिले जाते.‌ त्यामुळे बऱ्याच वेळेला प्रकरण मध्यस्थीकडे सोपवले जाते. काही वेळा लोक अदालतमध्ये ठेवले जाते. याही प्रकरणांमध्ये असेच झाले. कोर्टाने प्रकरण मध्यस्थीकडे सोपवले. हे प्रकरण भंडारे कोर्टाकडे वर्ग झाले. भंडारे साहेबांनी दोन्ही पार्टींना बोलवून घेतलं.

    त्या दिवशी बंटी शेठचं सगळं कुटुंब कोर्टात आलं होतं, आई, वडील, भाऊ आणि लग्न झालेली बहीण. वातावरणात तणाव होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळ्या भावना होत्या. राग, नाराजी, दुःख, आणि कुठेतरी प्रेमाचाही एक अस्पष्ट अंश दिसत होता. वडील मात्र शांत होते. दुपारी एक वाजता पुकारणी झाली. सर्वजण कोर्टात उभे राहिले.

    भंडारे साहेबांनी वडिलांना शांतपणे विचारलं,

    “कायद्यानुसार सर्व मुलांना समान हिस्सा मिळायला हवा. मग एकाला चार एकर आणि एकाला फक्त अर्धा एकर का? तुम्ही त्यांना त्यांच्या हिश्श्याची जमीन देणार असाल तर, हे प्रकरण मिटून जाईल.”

    वडील पुढे झाले आणि म्हणाले, “साहेब अजिबात जमणार नाही. मी केलं आहे, तेच बरोबर आहे. हा कधी गावाकडे आला नाही. आई-बापाची विचारपूस केली नाही. भावाला शाळेला पैसा दिला नाही. शेतीत पैसे घातले नाहीत. आई, बहिणीला कधी झंपरसाठी सुद्धा अर्धा मीटर कपडा आणला नाही… मग याला काय हक्क आहे जमीन मागण्याचा? का याला बरोबरीने जमीन द्यायची?”

    आईच्या डोळ्यांत अश्रू होते, पण ती काही बोलली नाही.

    एवढ्यात बंटी शेठ पुढे आले. ते दोन्ही हात जोडून साहेबांना सांगू लागले, “साहेब, हे सर्वजण खोटे बोलत आहेत. मी शेतीमध्ये थोडेथोडके नाहीत. एक कोटी रुपये घातलेले आहेत.”

    हे ऐकून बहीण संतापली. तिचा रागाचा पारा चढला. ती झटकन पुढे झाली आणि म्हणाली, “साहेब, एक काम करूया. याने आणि याच्या बायकोने गुलाल उचलून, स्वतःच्या पोराच्या माथ्यावर हात ठेवून सांगायचं की, दुकानदारीच्या चाळीस वर्षांच्या कालावधीमध्ये आईला कधी फुटका मणी घातला आहे म्हणून? बहिणीला कधी एखादी साडी घेतली आहे म्हणून? भावाला कधी एखादा ड्रेस घेतला आहे म्हणून? बापाला कधी विजारीचं कापड घेतलं आहे म्हणून? शेतीत तर एकदा सोडून याने कधीच पैसे दिले नाहीत. त्याने जर गुलाल उचलून सांगितले की, मी यातलं काहीतरी केलंय तर साहेब, धाकल्याला दिलेली माझ्या हिश्श्याची आणि राहिलेली सगळीच जमीन त्याला देतो.”

    तिचा आवाज शांत होता, पण शब्द धारदार होते. ती अत्यंत तळमळीने बोलत होती. आई-वडील आणि तिचा शेती करणारा भाऊ यांच्याबद्दलचा तिचा कळवळा स्पष्टपणे दिसून येत होता. कोर्टात क्षणभर शांतता पसरली.

    साहेबांनी बंटी शेठला पुढे बोलवले. त्याला विचारले, “ही सर्व तुझ्या रक्ताच्या नात्यातली मंडळी आहेत. हे सर्व असे का बोलत आहेत? तू खरंच पैसे घातले आहेस का?

    बंटी शेठ म्हणाले, “साहेब, वडिलांना समोर बोलावून विचारा. 1985 साली विहीर पाडायची होती. मला यांनी पैसे मागितल्यानंतर मी यांना वीस हजार रुपये दिले आहेत.”

    साहेबांनी वडिलांना पुढे बोलवून घेतले. “ही गोष्ट खरी आहे का?”

    वडील म्हणाले, “होय साहेब. आयुष्यात त्याने एकदाच वीस हजार रुपये दिले होते. त्यावेळी आम्ही विहीर पाडणार होतो. आम्ही विहिरीला एक लाख साठ हजार रुपये खर्च केला होता. घडीव दगडांची बांधीव विहीर पाडली. कारण पाण्यावरच आमचं जगणं अवलंबून आहे. याच्या मागे लागून लागून याने कसेतरी वीस हजार रुपये दिले. शेवटी आम्ही कर्ज काढलं. कर्जाच्या हप्त्याला याने कधी एक रुपाया दिला नाही. मग आम्ही मागायचंच सोडून दिलं. आम्ही सर्वांनी मिळून कष्ट करून ते कर्ज फेडलं. याने विहिरीला पैसे दिले होते म्हणूनच याला अर्धा एकर जमीन आणि विहिरीतली एक दिवसाची पाळी दिली आहे. आमचं काय चुकलं साहेब?”

    मग साहेबांनी पुन्हा बंटी शेठला पुढे बोलवून घेतले. म्हणाले, “तू केवळ वीस हजार रुपये घातले असतील तर त्याचा मोबदला म्हणून ते अर्धा एकर जमीन आणि एक दिवसाची पाणी पाळी द्यायला तयार झाले आहेत. परंतु, तू तर म्हणत होता, मी एक कोटी रुपये घातले आहेत. खरंच तू इतका पैसा कुटुंबासाठी घातलास?”

    “होय साहेब. मी खरंच सांगतो. मी एक कोटी रुपये घातले आहेत. मी ज्यावेळी यांना वीस हजार रुपये दिले, त्यावेळी म्हणजे 1985 साली सोन्याचा भाव होता ३२०० रुपये तोळा. त्यावेळी तीन हजार दोनशे रुपयेला दहा ग्रॅम सोनं येत होतं. मी वीस हजार रुपये घातले त्यावेळी 60 ग्रॅम सोनं मोडलं होतं. मी 60 ग्रॅम सोन्याचे चाळीस वर्षांमध्ये किमान 600 ग्रॅम सोने करू शकलो असतो. आजचा दर बघितला तर 600 ग्रॅम सोन्याचे जवळजवळ 93 लाख रुपये म्हणजेच एक कोटीच्या आसपास पैसे होतात, साहेब! इतके पैसे आता मी कोणाला विचारू? यांना त्यावेळी मी घातलेल्या वीस हजाराची काहीच किंमत वाटत नाही.”

    आता बंटी शेठच्या चेहऱ्यावर समाधान होतं. जणू त्यांनी मोठं गणित मांडलं होतं. काहीतरी जिंकल्यासारखे ते वारंवार पाठीमागे पाहात होते.

    बंटी शेठचा हिशेब ऐकून साहेबांनी डोक्याला हात लावला. हसावं की रडावं, हेच त्यांना समजेनासं झालं. कोणाच्या डोक्यात कोणता हिशोब असेल, काही सांगता येत नाही. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने आयुष्याचे गणित मांडत असतो. त्या गणिताची आकडेमोड खरी किती, खोटी किती हे मात्र आयुष्याच्या अखेरीस समजतं. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते…

    “ते वीस हजार सोडून तू पुन्हा किती वेळा पैसे दिलेस?” साहेबांनी बंटी शेठला विचारलं.

    बंटी शेठकडे उत्तर नव्हतं. त्यांची मान खाली गेली. त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरचा गर्व गळून पडला. गर्वाच्या जागी लाज, अपराधीपणा आणि वास्तव उभं राहिलं.

    साहेब म्हणाले, “असाच हिशोब करायचा तर तू दुकानला जाण्याच्या अगोदर आई-वडिलांनी जेवढा खर्च केला तेवढ्या पैशात आता दहा किलो सोनं आलं असतं. मग तू दहा किलो सोन्याचे पैसे त्यांना देणार आहेस का? असं विचित्र गणित करून आयुष्य सुटत नाही. कायद्याने तुला ती एक एकर जमीन मिळेल, परंतु व्यवहाराने वडिलांनी जे काय करून ठेवलं आहे, तेच बरोबर आहे. आई-वडिलांसाठी दिलेलं कधी मोजायचं नसतं. पण तू तर न देताच मोजतो आहेस. कायद्याने जमीन मिळवायला तुला किती वर्षे लागतील काही सांगता येत नाही. तुझा तू शांत डोक्याने विचार कर आणि नको तसला हिशेब करून जमीन मिळवण्याच्या फंदात पडू नकोस. याउपर ही तुझी मर्जी.”

    बंटी शेठला आणि रंगूला तोंडात मारल्यासारखं झालं. आपण एक कोटी रुपये कुटुंबात घातल्याचं बिंग उघडं पडलं याची त्यांना शरम वाटली. ते गणित कुणालाच पटलं नाही, याची त्यांना लाज वाटली. ते साहेबांना म्हणाले, “ठीक आहे साहेब. आपण म्हणताय तर, आम्ही केस मागे घेतो. आम्हाला जेवढी जमीन दिली आहे तेवढी पुरेशी आहे.”

    साहेब म्हणाले, “मी म्हणतो म्हणून केस मागे घेऊ नका. तुम्ही पती-पत्नी प्रामाणिकपणे विचार करा. मगच केस मागे घ्या.”

    बंटी शेठ दोन्ही हात जोडून पुन्हा म्हणाले, “नाही साहेब, पूर्ण विचार करूनच आम्ही केस मागे घेत आहोत.”

    त्या दिवशी ते संपूर्ण कुटुंब कोर्टातून बाहेर पडताना, सूर्य मावळत होता. बाहेर गार वारा सुटला होता. थोड्याच वेळात अंधार पडणार होता.

    काही वेळाने बंटी शेठ आणि त्यांचे सर्व कुटुंब आपापल्या घरी जाईल. त्यानंतरचा दुसरा दिवस त्यांच्या आयुष्यात कोणते गणित घेऊन उगवेल काय माहीत…!!!

    ॲड. कृष्णा पाटील

    मोबाइल – 9372241368

    Related Posts

    शाळेचा डबा अन् गुंडाळी पोळी

    April 27, 2026 ललित

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    April 27, 2026 ललित

    चांगुलपणाचा असाही अनुभव

    April 27, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    शाळेचा डबा अन् गुंडाळी पोळी

    By पराग गोडबोलेApril 27, 2026

    शनिवारची शाळा म्हणजे अफाट आनंद. सकाळची शाळा, ती ही अर्धा दिवस… दुसऱ्या दिवशी रविवार म्हणजे…

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    April 27, 2026

    चांगुलपणाचा असाही अनुभव

    April 27, 2026

    आले जल गेले जल झाले जल आरपार…

    April 26, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    वास्तव अन् आभासी जगामधली धूसर रेषा!

    April 27, 2026

    सोन्याचा हिशेब ऐकून जजही चक्रावले!

    April 27, 2026

    शाळेचा डबा अन् गुंडाळी पोळी

    April 27, 2026

    बेसनाचे लाडू… माँची आठवण

    April 27, 2026

    Dnyaneshwari : पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परि वदनांचा शेवटु न टके

    April 27, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 27 एप्रिल 2026

    April 27, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 280
    • अवांतर 184
    • आरोग्य 106
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 398
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 200
    • मैत्रीण 18
    • ललित 584
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    वास्तव अन् आभासी जगामधली धूसर रेषा!

    April 27, 2026

    सोन्याचा हिशेब ऐकून जजही चक्रावले!

    April 27, 2026

    शाळेचा डबा अन् गुंडाळी पोळी

    April 27, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.