आपल्या सगळ्यांकडेच छान छान आठवणींचा छोटा-मोठा खजिना हा असतोच असतो. माझी अशीच एक आठवण शेअर करत आहे… (‘ही सत्य घटना आहे,’ असा उल्लेख मुद्दाम करतो आहे, कारण माझे बरेच लेख काल्पनिक असतात.) बऱ्याच वेळेला आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो की, ज्या समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरती आनंद आणू शकतात आणि आपल्या चेहऱ्यावर पण आनंद आणू शकतात…
बऱ्याच वेळेला बावधनहून कर्वेनगरला घरी जाताना माझा ऑटो रिक्षेशी संबंध येतो. एक दिवस बावधनहून गुजरात कॉलनीपर्यंत (अंतर साधारण दोन किलोमीटर) मी पीएमटी बसने आलो. गुजरात कॉलोनीमधून कोथरूड भाजी मंडईपर्यंत पाच ते सात मिनिटांचे अंतर चालत गेलो आणि तिथून ऑटो करून घरी जाणार होतो.
कोपऱ्यावरच्या फरसाणच्या दुकानासमोर एक ऑटो उभी दिसली. तिथपर्यंत पोहोचलो आणि नेमके तेव्हाच ड्रायव्हर रिक्षेतून खाली उतरून बाहेर पडत होते…
“दादा, कर्वेनगरला चलणार का?” – मी
हेही वाचा – कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…
“चला…” असे म्हणत ड्रायव्हर मागे वळले.
मी : तुम्ही दुकानात जात होता का? तुम्हाला या दुकानातून काही घ्यायचंय का?
ड्रायव्हर : सकाळी निघताना मुलीने सांगितलं होतं, येताना ढोकळा आणा. तिला ढोकळा खूप आवडतो. इथे ढोकळा चांगला मिळतो. पण तुम्ही बसा, आधी तुम्हाला सोडतो. ढोकळा पुढे कुठेतरी घेईन.
मी : दादा, मुलीकरिता ढोकळा घेऊन या. मला 5 ते 10 मिनिटे उशीर झाल्याने काही फरक पडत नाही. ढोकळा घेऊन या, मी थांबतो.
पाच मिनिटांत ड्रायव्हर हातात एक पाकीट घेऊन आले आणि गाडी सुरू केली. त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघून मी जाम खूश झालो. मुलीच्या आवडीचा ढोकळा आज घरी गेल्यानंतर मुलीला दिल्यावर ती खूश होणार, हाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
हेही वाचा – अवघ्या पंधरा दिवसांत 5 रुपयांचे झाले 500 रुपये!
थोडं पुढे गेलो आणि माझ्या लक्षात आलं की, मीटर सुरू करायचं राहिलं आहे.
मी : दादा, मीटर सुरू करायचं राहिलं आहे, सुरू करा.
ड्रायव्हर : काका राहू द्या. तुमच्या मनाला येईल तेवढे पैसे द्या.
माझी उतरण्याची जागा आली. मी नेहेमी देतो तेवढे पैसे दिले, त्यांनी ते मोजले पण नाहीत आणि खिशात ठेवले.
‘धन्यवाद’ आणि ‘पुन्हा भेटू’ची आनंदी चेहऱ्यांनी देवाण घेवाण झाली आणि आम्ही आपापल्या मार्गाला लागलो. मजा आली.


