पूर्वार्ध
“मी जगदीश महाजन. मी रिटायर्ड क्लास वन आँफिसर आहे. ही आमची पहिलीच फॉरेन टूर आहे,” बँकॉकच्या हॉटेलमध्ये मी सगळ्या ग्रुपला माझी ओळख करून दिली.
“साहेबांनी त्यांची अपूरी ओळख आपल्याला करून दिलीये…”
आमचा ग्रुप लीडर सर्वांना सांगू लागला… “तुम्हाला कल्पना नसेल पण साहेबांचे आपल्या मुख्यमंत्र्यांशी खूप जवळचे संबंध आहेत. आमदार, खासदारांसोबत तर त्यांची रोजची बैठक असते!”
सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मी मनातून खूश झालो, पण मी तसं चेहऱ्यावर दाखवलं नाही. हळूहळू सगळे आपला परिचय करून देऊ लागले. बऱ्याच जणांची ही पहिलीच विदेशवारी होती; तर काही जणांची दुसरी किंवा तिसरी. सर्वात शेवटी एक साधारण कपडे घातलेला एक माणूस उभा राहिला. त्याच्या कपड्यांमुळे म्हणा किंवा सगळ्यांना जेवणाचे वेध लागले होते त्यामुळे म्हणा… कुणी त्याला गांभीर्याने घेण्याच्या मूडमध्ये नव्हतं.
“मी सदानंद पाठक आणि ही माझी पत्नी मीनाक्षी पाठक. मी एका शैक्षणिक संस्थेत क्लार्क म्हणून काम करतो. आमची ही नववी फॉरेन टूर आहे.”
त्या हॉलमध्ये एकदम शांतता पसरली. मला तर आश्चर्याचा धक्काच बसला.
“आतापर्यंत आम्ही भूतान, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, हाँगकाँग, जपान या देशात जाऊन आलोय. पुढील वर्षी युरोप टूरला जायचा विचार करतोय…”
हेही वाचा – पुस्तकांचा ठेवा अन् खरा वारसदार!
अजूनही लोक धक्क्यातून बाहेर आले नव्हते. एका मामुली कारकुंड्याने इतक्या फॉरेन टुर्स कराव्या, हे कुणाच्या पचनी पडत नव्हतं.
“पाठक तुम्ही एकटे गेले होतात की, सहकुटुंब?” मी विचारलं.
“सहपत्नीक गेलो होतो! तसं मुलांनाही तीन-चार देशांत घेऊन गेलोय, पण त्यांचं शिक्षण आणि करिअरमुळे सगळ्या देशांत नेता आलं नाही.”
“पाठक शैक्षणिक संस्थेत चांगला हात मारलेला दिसतोय तुम्ही…” मी म्हणालो तसा तिथे एकच हशा पिकला. पण पाठक गंभीर होता. तो हसला नाही की, लाजला नाही.
“अहो साहेब, जवळजवळ सगळ्या शैक्षणिक संस्था राजकारण्यांच्या हातात असताना एक मामुली कारकून काय हात मारणार आहे?”
हेही खरंच होतं. सगळे शांत झाले.
“आम्हांला दोघांनाही प्रवास आणि पर्यटनाची आवड…” पाठक पुढे बोलू लागला, “जगप्रवास हे आमचं ध्येय होतं. पण कमाई तर तेवढी नव्हती. बचत हा एकमेव मार्ग होता, तो आम्ही अवलंबला…”
तेवढ्यात जेवण तयार झाल्याची बातमी घेऊन एक माणूस आला. सगळे उठले, पण मी पाठकला सोडणार नव्हत़ो. मी त्याला म्हणालो, “पाठक तुमच्याशी सविस्तर बोलायचंय.”
“जेवण झाल्यावर या ना साहेब रुममध्ये… छान गप्पा मारू.”
ते सगळे जेवायला गेले मी मात्र रूमकडे पळालो. दोन पेग मारल्याशिवाय मला झोप आली नसती.
जेवण झाल्यानंतर मी सौ.ला घेऊन पाठकच्या रुममध्ये गेलो…
“पाठक मला उत्सुकता आहे की, हे सगळं तुम्ही कसं जमवलंत. इतक्या फॉरेन टुर्स, त्याही कमी पगारात? खूपच आश्चर्याची गोष्ट आहे,” मी म्हणालो.
“सर, विशेष काही नाही. आम्ही आमची लाइफस्टाईल फार साधी ठेवली. फालतू खर्च करायचा नाही, हे ठरवून टाकलं. आमच्याकडे आजही टीव्ही, अँड्रॉइड मोबाइल, होम थिएटर असं काहीही नाही. टू-व्हीलर आता मुलानं घेतली, तीही अगदीच गरज होती म्हणून! मी, माझ्या बायकोनं आतापर्यंत सगळं आयुष्य सायकलवर काढलं. बायको चांगली सुगरण असल्याने कधी हॉटेलिंग केलं नाही. हॉटेलचे सर्व पदार्थ ती घरीच करते…”
“याचा अर्थ तुम्ही आयुष्यात एंजॉयमेंट काहीच केली नाही! अहो, त्या वहिनींनाही जीव आहे. कधीतरी स्वयंपाकाचा कंटाळा त्यांनाही येतच असणार ना?” मी हसत म्हणालो.
पाठक हसला.
“साहेब एंजॉयमेंटचा अर्थ चमचमीत नॉनव्हेज खाणं, दारू पिणं, चारित्र्यहीन पात्रांच्या आणि सासू-सुनांच्या कारस्थानांच्या सीरियल्स पहाणं हा असेल तर, तो आम्हाला अमान्य आहे. चांगली पुस्तकं वाचणं, चांगलं संगीत ऐकणं, निसर्गात फिरणं, फुलांचं, पक्ष्यांचं निरीक्षण करणं, प्रवास करणं, प्रवासात भेटणाऱ्या व्यक्तींशी संबंध जुळवणं, त्यांच्या संस्कृतींचा अभ्यास करणं यातही एक पॉझिटिव्ह एंजॉयमेंट आहे, असं तुम्हाला नाही वाटत? आता राहिला प्रश्न बायकोच्या स्वयंपाकाच्या कंटाळ्याचा, तर तुम्हाला सांगतो साहेब, आमच्या घरातला प्रत्येकजण उत्कृष्ट स्वयंपाकी आहे; त्यामुळे आम्ही आलटून पालटून स्वयंपाक करतो. स्त्री पुरुष समानता आमच्या घरात नेहमीच राहिली आहे.”
बापरे, हे काहीतरी वेगळंच प्रकरण होतं. मी चटकन विषय बदलत म्हंटलं, “बरं, ते जाऊ द्या. मूळ विषयाकडे येऊ या…”
“हं, तर बचतीबरोबरच ॲडिशनल इन्कमसाठी मी दुकांनांचे, छोट्या फर्म्सचे अकाऊंट्स लिहायला सुरुवात केली. मिसेसने पोस्टाची एजन्सी घेतली. मुलं मोठी झाल्यावर मुलीने शिकवण्या घ्यायला तर, मुलाने गॅरेजवर काम करायला सुरुवात केली. कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही, हे आम्ही मुलांच्या मनावर बिंबवलं होतं!”
“पण मग, मुलांची शिक्षणं व्यवस्थित झाली का?”
“मुलं जात्याच हुशार आणि सिन्सीअर होती. स्कॉलरशिप मिळवून त्यांनी शिक्षणं पूर्ण केली. फक्त परीक्षेचा फाँर्म भरण्यासाठी ती पैसे मागत!”
“आता काय करतात मुलं?”
“मुलगी सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. तिने एम.एस. केलंय अमेरिकेतून. सध्या बंगलोरला असते. तिचा नवराही इंजिनीअर आहे. दोघांनी कंपनी सुरू केलीय. मस्त चाललंय तिचं. मुलगा नुकताच एम.डी. झालाय मेडिसिनमध्ये…. सध्या एका हॉस्पिटलला प्रॅक्टिस करतोय. लवकरच स्वतःचं हॉस्पिटल उभारायचा विचार करतोय…”
हेही वाचा – जोशी सर… भलेपणाचा वसा
मी चाट पडलो. मला माझी मुलं आठवली. मुलीने काँलेजमध्ये अनेक लफडी केली होती. लग्नाअगोदरच ती प्रेग्नंट राहिली होती. ते प्रकरण निपटताना माझ्या नाकीनऊ आले होते. प्रचंड हुंडा देऊन मी तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून दिलं होतं. पण तिथेही ती व्यवस्थित रहात नव्हती. भांडणं करून माहेरी निघून येणं सुरूच होतं. मुलाने तर नाकात दम आणला होता. कॉलेजमध्ये असताना मारामाऱ्या करणं, मुलींची छेड काढणं, गुटखा खाणं, दारू पिणं एवढेच त्याचे उद्योग होते. माझ्या ओळखींमुळे मी त्याच्या भानगडी निस्तरल्या होत्या. कॉलेजमधून काढून मी त्याला बियर बार काढून दिला. आम्हाला न जुमानता एका टुकार मुलीशी त्याने लग्न केलं होतं. तिच्याशीही त्याचं पटत नव्हतं. दारू पिऊन तो तिला मारहाण करायचा. घरात रोज घडणाऱ्या महाभारताला कंटाळूनच आम्ही बँकाँकच्या टूरला आलो होतो.
“आमचा औषधाचाही खर्च नगण्य आहे”
पाठकच्या बायकोच्या बोलण्यामुळे माझी तंद्री भंगली… “सायकल चालवण्यामुळे किंवा कुठेही पायी जात असल्यामुळे आम्ही एकदम फिट आहोत. लोक आम्हांला कंजूष म्हणतात, पण याचे फायदे त्यांना दिसत नाहीत. बघा, औषधाची एक गोळी नाही लागली आम्हाला आजपर्यंत. तोही खर्च आमचा वाचला!”
मी माझ्या सुटलेल्या पोटाकडे पाहिलं, मग बायकोकडे पाहिलं. आम्ही दोघांनीही वजनाची शंभरी पार केली होती. तुलनेत पाठक पती-पत्नी चाळीशीतले वाटत होते. पाठकची बायको तर अजूनही चवळीची शेंग वाटत होती.
“साहेब तुमच्याबद्दल सांगा ना काही!” पाठक बोलला.
क्रमश:
(ही कथा माझ्या ‘कथा माणुसकीच्या’ या पुस्तकातील आहे. माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करावा.)


