पूर्वीच्या काळात म्हणजे साधारणपणे 1960 ते 1990च्या काळात लग्नसमारंभांमध्ये पंगतीला वरण भात, मसालेभात, पातळ भाजी, एखादी सुकी भाजी, चटण्या, कोशिंबीरी, कढी किंवा मठ्ठा, पापड-कुरड्या (अख्खे नाही बरं, एकत्र चुरा केलेल्या), गोडाला बुंदीचा लाडू किंवा जिलेबी असा मेन्यू ठरलेला असायचा. त्यामध्ये आचारी सांगेल तसंच व्हायचं. यामध्ये कुठलाही बदल दिसायचा नाही. परंतु आधुनिक जीवनशैली लोक अनुसरत गेले आणि या लग्नातील पंगतींच्या गंमतीजमती मागे पडून सोफेस्टिकेटेड बुफे पद्धत अगदी शहरांपासून ते खेडेगावांपर्यंत अवलंबिली जाऊ लागली. पंगतीला बसायलाही लोक आजकाल गावठीपणा समजतात.
यामध्ये मसालेभात अर्थात तोंडलीभाताला विशेष महत्त्व होते. कधी कधी याची जागा बटाटा घ्यायचा. हळूहळू यामध्ये फुलकोबी आणि मटारने आपले विशेष स्थान निर्माण केले म्हणण्यापेक्षा कायम केले, खरंय ना? आजकाल मसालेभात म्हटला की, त्यामधे फुलकोबी आणि मटार हेच जाणार, असे समीकरणच ठरले आहे. पण खर सांगू? हा फुलकोबी आणि मटार घातलेल्या मसालेभातापेक्षा तोंडली आणि शेंगदाणे घातलेला मसालेभात सरस ठरतो. त्याच्या जोडीला जर कढी किंवा मठ्ठा असेल तर काही विचारायलाच नको! पूर्वी लग्नामध्ये आचारी अस्सा काही मसालेभात बनवायचे की, साध्या भाताला फारशी मागणी नसायची. तोंडल्याच्या या मसालेभाताबरोबर मठ्ठयाच्या किती वाट्या पोटात रीचवल्या जायच्या ते समजायचे नाही. बहुतेक सर्व महाराष्ट्रीयन लग्नात हा अस्सल खडे मसाले असलेला तोंडलीभात पंगतीमध्ये विराजमान असायचा. मसाल्यांचे प्रमाण योग्य असेल तर मसालेभाताची चव अफलातून लागते.
तोंडली आणि शेंगदाणे घातलेला मसालेभाताची जागा पुलाव, फ्राइड राईस वगैरे तरी नाही घेऊ शकत. या इतिहासजमा होत चाललेल्या तोंडलेभातलाही उजाळा देण आवश्यक आहे. मंडळी हा तोंडल्याचा मसालेभात एकदा करून तर पाहा… एकदा याची चव जीभेवर रेंगाळली तर तो तुम्ही वारंवार कराल. याच्या घमघमाटाने वातावरण दरवळून जाईल आणि पोटातील कावळे याचा आस्वाद घ्यायला आतुरतील.
साहित्य
- तांदूळ (कुठलाही चालतो) – 2 वाट्या
- तोंडली – पाव किलो
- तमालपत्र – २
- कलमी – एक इंच (दोन तुकडे)
- चक्रीफूल – २
- मसाला वेलची – २
- काळे मिरे – चार ते पाच
- लवंग – तीन-चार
- आलं – एक इंच (ऐच्छिक)
- हिरव्या मिरच्या – पाच ते सहा
- लसूण – सात- आठ पाकळ्या
- कोथिंबीर – एक वाटीभर (चिरलेली)
- ओल खोबरं – एक वाटीभर (भातावर वरून घ्यायला)
- धणे – एक चमचा
- जिरे – एक चमचा
- भिजलेले शेंगदाणे – दोन मूठ
- तेल – एक पळीभर
- गोडा मसाला – दोन चमचे
- लाल तिखट – दोन चमचे
- मीठ – चवीनुसार
- हिंग – एक लहान चमचा
- कढीपत्ता – पाच ते सात पाने
- हळद – एक चमचा
हेही वाचा – Recipe : अतिशय खमंग अन् सर्वांच्या पसंतीचं थालिपीठ!
कृती
- प्रथम तोंडली स्वच्छ धुवून त्याचे उभे काप करावेत.
- हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरीची एकत्रित पेस्ट करून घ्यावी. या पेस्टमध्ये तुम्ही थोडं सुकं खोबरं बारीक केल तरी चालतं.
- धणे हातावर रगडून बारीक करावे किंवा मिक्सरमध्ये भरडून घ्यावे.
- तांदूळ स्वच्छ धुवून निथळून घ्यावे.
- आता एका मोठ्या पसरट भांड्यात एक पळीभर तेल गरम करून त्यात एक-एक चमचा मोहरी आणि जिरं टाकावे. एक छोटा चमचा हिंगही टाकावा.
- त्यानंतर, कढीपत्त्याची सात आठ पाने, दोन तेजपान, कलमीचे दोन तुकडे, मिरे, लवंग, चक्रीफूल, मसाला वेलची आणि भरडलेले धणे टाकावे आणि दोन सेकंद परतून घ्यावे. ज्यामुळे या खड्या मसाल्यांचा स्वाद तयार होईल.
- नंतर त्यामध्ये उभी चिरलेली तोंडली टाकावी आणि मंद आचेवर थोडी परतून घ्यावीत.
- तोंडली परतल्यावर त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचे वाटण टाकावे.
- थोडे परतल्यावर तांदूळ टाकून आणखी परतून घ्यावे आणि नंतर थोडे पाणी टाकावे.
- आता यामध्ये एक चमचा हळद, दोन चमचे तिखट, दोन चमचे गोडा मसाला आणि मीठ टाकून एकदा छान परतून घ्यावे.
- नंतर यामध्ये भिजवलेले शेंगदाणे टाकावे आणि तांदळाच्या दुप्पट पाणी घालून आणि झाकण ठेवून भात शिजू द्यावा. वाटल्यास वरच्या ताटलीवर पाणी घालून ठवू शकता.
- भात तुम्हाला किती फडफडीत किंवा मऊसर हवा, त्यानुसार पाणी घालावे.
हेही वाचा – Recipe : उपवासाचे दहीवाले आलू करून पाहिले आहेत का?
टीप्स
- तोंडलेभात शिजला की, वरून दोन चमचे साजूक तूप सोडावे आणि अर्धे लिंबू पिळावे जेणेकरुन भात छान मोकळा होतो.
- सर्व्ह करताना भातावर ओले खोबरे आणि कोथिंबीर पेरून सर्व्ह करावा.
तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.
या ईमेलवर किंवा
9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर
तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.


