सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
जळचरु जळाचा आभारु धरी । बाळक स्तनपानीं उपरोधु करी । तरी तया जिणया श्रीहरी । आन उपायो असे ॥79॥ म्हणोनि भीडसांकडी न धरवे । जीवीं आवडे तेंही तुजपुढां बोलावें । तंव राहें म्हणितलें देवें । चाड सांगैं ॥80॥
एवमेतद्यथात्थ त्वमात्मानं परमेश्वर । द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम ॥3॥
मग बोलिला तो किरीटी । म्हणे तुम्हीं केली जे गोठी । तिया प्रतीतीची दिठी । निवाली माझी ॥81॥ आतां जयाचेनि संकल्पें । हे लोकपरंपरा होय हारपे । जया ठायातें आपणपें । मी ऐसें म्हणसी ॥82॥ तें मुद्दल स्वरूप तुझें । जेथूनि इयें द्विभुजें हन चतुर्भुजें । सुरकार्याचेनि व्याजें । घेवों घेवों येसी ॥83॥ पैं जळशयनाचिया अवगणिया । कां मत्स्य कूर्म इया मिरवणिया । खेळु सरलिया तूं गुणिया । सांठविसी जेथ ॥84॥ उपनिषदें जें गाती । योगिये हृदयीं रिगोनि पाहाती । जयातें सनकादिक आहाती । पोटाळुनियां ॥85॥ ऐसें अगाध जें तुझें । विश्वरूप कानीं ऐकिजे । तें देखावया चित्त माझें । उतावीळ देवा ॥86॥ देवें फेडूनियां सांकड । लोभें पुसिली जरी चाड । तरि हेचि एकी वाड । आर्तीं जी मज ॥87॥ तुझें विश्वरूपपण आघवें । माझिये दिठीसि गोचर होआवें । ऐसी थोर आस जीवें । बांधोनि आहें ॥88॥
मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो । योगेश्वर ततो मे त्वं दर्शयाऽत्मानमव्ययम् ॥4॥
परी आणीक एक एथ शारङ्गी । तुज विश्वरूपातें देखावयालागीं । योग्यता माझां अंगीं । असे कीं नाहीं ॥89॥ हें आपलें आपण मी नेणें । तें कां नेणसी जरी देव म्हणे । तरी सरोगु काय जाणे । निदान रोगाचें ॥90॥
हेही वाचा – Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…
अर्थ
पाण्यात राहणार्या प्राण्यांनी जर पाण्याच्या उपकाराचे ओझे मानले, अथवा मुलाने स्तनपान करण्याविषयी आईची भीड धरली तर देवा, त्यास जगण्यास दुसरा उपाय आहे काय? ॥79॥ म्हणून भीड अथवा संकोच धरत नाही. मनाला जे बरे वाटेल, ते देखील तुझ्यापुढे बोलून दाखवावे. त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, थांब, तुझी इच्छा काय असेल ती सांग. ॥80॥
हे परमेश्वरा, तू स्वत:विषयी हे जे सांगितलेस, त्याप्रमाणे हे पुरुषोत्तमा, हे तुझे ऐश्वर्ययुक्त विश्वरूप (प्रत्यक्ष) पहाण्याची माझी इच्छा आहे. ॥3॥
मग तो अर्जुन म्हणाला, देवा, तुम्ही (मागे दहाव्या अध्यायात) जी गोष्ट सांगितलीत, त्या योगाने माझ्या अनुभवाची दृष्टी शांत झाली. ॥81॥ आता ज्याच्या संकल्पाने ही लोकांची मालिका उत्पन्न होते आणि नाहीशी होते आणि ज्या स्थानास तू ‘मी’ असे म्हणतोस, ॥82॥
जेथून ही दोन हातांची अथवा चार हातांची रूपे देवाचे कार्य करण्याच्या निमित्ताने वारंवार घेऊन येतोस, ते तुझे मूळ स्वरूप होय. ॥83॥ हा अवतारांचा खेळ संपल्यावर क्षीरसमुद्रात झोप घेण्याचे सोंग, किंवा मत्स्य, कूर्म इत्यादिक अलंकार, यांना तू गारोडी जेथे (ज्या मूळ स्वरूपात) साठवितोस, ॥84॥ उपनिषदे ज्याचे वर्णन करतात, योगी लोक आपल्या हृदयात शिरून ज्याचा साक्षात्कार करून घेतात, ज्याला सनकादिक संत मिठी मारून राहिलेले आहेत, ॥85॥ असे अमर्याद असलेले तुझे विश्वरूप कानांनी जे मी ऐकतो, ते पाहण्याकरिता देवा, माझे चित्त फारच उत्कंठित झाले आहे. ॥86॥ माझा संकोच दूर करून प्रेमाने माझी इच्छा काय आहे, असे ज्याअर्थी देवाने प्रेमाने विचारले आहे, तर महाराज, मी असे सांगतो की, हीच एक मला मोठी तीव्र इच्छा आहे. ॥87॥ तूच या विश्वात भरलेला आहेस, हे पूर्णपणे माझ्या या डोळ्यांना दिसावे, अशी मोठी इच्छा मी मनात बाळगून राहिलो. ॥88॥
हे प्रभो, ते मी पहाणे शक्य आहे, असे जर तुला वाटत असेल तर हे योगेश्वरा, क्षयरहित असे स्वत:चे रूप तू मला दाखव. ॥4॥
परंतु कृष्णा, आणखी एक गोष्ट आहे, ती ही की, विश्वरूप जो तू त्या तुला पहाण्याला माझ्या अंगात योग्यता आहे की नाही, ॥89॥ हे माझे मला समजत नाही. हे का समजत नाही, असे जर आपण म्हणाल, तर (सांगा,) रोग्यास आपल्या रोगाचे मूळ कारण समजते काय? ॥90॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं…


