- रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. दाल फ्राय, चविष्ट ताक, शिळ्या भाताचा नाश्ता बनविताना या टिप्स वापरून पाहा.
- आवडीप्रमाणे तूरडाळ किंवा मिश्रडाळी कुकरमध्ये शिजवून, मिक्सरमध्येघ बारीक करून घ्यावे. हे मिश्रण ट्रेमध्ये किंवा प्लास्टिक पिशवीत पाऊण इंच जाड थापून फ्रीजमध्ये ठेवावे. वड्या कापण्याएवढे घट्ट झाल्यावर त्याच्या वड्या कापून त्या डीप फ्रीजरमध्ये ठेवून द्याव्यात. दहा दिवसपर्यंत जशाच्या तशा टिकतात. आमटी किंवा दाल फ्राय करण्यासाठी गरज लागेल तेव्हा डाळीची वडी घेऊन त्यावर फक्त पुढील संस्कार करावेत. इंधन व वेळेची बचत होते. घ्याव्यात.
- कडधान्ये भिजत घालताना त्यामध्ये चमचाभर मेथीचे दाणे टाकावेत. त्यांनाही कडधान्याप्रमाणे मोड येतात. त्याचा कडूपणा कमी होतो. आपण आहारात मेथ्या कमी वापरतो. त्याचा योग्य वापर होऊन पदार्थाचे पोषणमूल्य वाढते.
- एक वाटी सोललेले कोवळे हिरवेगार हरभरे वाटून, चार वाट्या मधुर ताज ताक, साखर दोन टी-स्पून, मीठ, दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर, पाव चमचा जिरे, चिमूटभर हिंग, तेल एक चमचा घ्यावे. प्रथम ताक, हरभरे, कोथिंबीर, साखर आणि मीठ एकत्र करून ढवळून सारखे करावे. तेलात हिरव्या मिरच्यांचे तुकडे, मोहरी, हिंग, जिरे टाकून फोडणी करून त्यात घालावी. साधरणपणे अर्धा तास आधी केल्याने त्यांत हरभऱ्याची आंब उतरून ताक चविष्ट लागते.
- आपण जी कडधान्ये दुकानातून आणतो, त्याला लवकर कीड लागू शकते. शिवाय आणलेली तीन-चार प्रकारची कडधान्ये एकदम वापरणेही शक्य नसते. तेव्हा ही सर्व कडधान्ये कढईत थोडी भाजून घ्यावीत. गार झाल्यावर बरणीत भरून ठेवावीत म्हणजे कीड लागत नाही. बारीक अगर जाड रवासुद्धा जर तांबूस रंगावर भाजून ठेवल्यास त्याला अजिबात अळी होत नाही.
- कडधान्ये शिजवताना आपण सर्रास सोड्याचा वापर करतो; परंतु उसळीला त्याचा एक प्रकारचा वास येतो. हे टाळण्यासाठी म्हणून कडधान्ये शिजविताना त्यात चुक्याची दोन-चार पाने टाकल्यास कडधान्ये चांगली शिजतात.
- शिळा भात खाण्यापेक्षा, रात्री भात उरल्यास त्यात कोमट दूध टाकून चमचाभर दही मिसळून ठेवावे. सकाळी दही लागते व भात त्यात पूर्णपणे मिसळून गेल्यामुळे दहिभाताची चव उत्कृष्ट लागते. सकाळी थोडेसे मीठ टाकून अथवा फोडणी देऊन उत्तम नाश्ता होतो.
- डाळिंब्याची उसळ शिजविताना, त्यात थोडे दूध घालून शिजवले असता डाळिंब्या आख्ख्या राहतात. त्या फुटत नाहीत.
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


