सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय अकरावा
आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोन्हीं रसीं । जेथ पार्था विश्वरूपेंसीं । होईल भेटी ॥1॥ जेथ शांताचिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा । आणि येरांही रसां पांतिकरां । जाहला मानु ॥2॥ अहो वधुवरांचिये मिळणीं । जैशीं वराडियांही लुगडीं लेणीं । तैसे देशियेचां सोकासनीं । मिरविले रस ॥3॥ परि शांताद्भुत बरवे । जे डोळियांचां अंजुळीं घ्यावे । जैसे हरिहर प्रेमभावें । आले खेंवा ॥4॥ नातरी अंवसेचां दिवशीं । भेटलीं बिंबें दोनी जैसी । तेवीं एकवळा रसीं । केला एथ ॥5॥ मीनले गंगेयमुनेचे ओघ । तैसें रसां जाहलें प्रयाग । म्हणोनि सुस्नात होत जग । आघवें एथ ॥6॥ माजीं गीता सरस्वती गुप्त । आणि दोनी रस ते ओघ मूर्त । यालागीं त्रिवेणी हे उचित । फावली बापा ॥7॥ एथ श्रवणाचेनि द्वारें । तीर्थीं रिघतां सोपारें । ज्ञानदेव म्हणे दातारें । माझेनि केलें ॥8॥ तीरें संस्कृताचीं गहनें । तोडोनि मऱ्हाठियां शब्दसोपानें । रचिली धर्मनिधानें । निवृत्तिदेवें ॥9॥ म्हणौनि भलतेणें एथ सद्भावें नाहावें । प्रयागमाधव विश्वरूप पहावें । येतुलेनि संसारासि द्यावें । तिलोदक ॥10॥ हें असो ऐसे सावयव । जेथ सासिन्नले आथी रसभाव । जे श्रवणसुखाची राणीव । जोडली जगा ॥11॥ जेथ शांताद्भुत रोकडे । आणि येरां रसां पडप जोडे । हें अल्पचि परी उघडें । कैवल्य जेथ ॥12॥
हेही वाचा – Dnyaneshwari : आतां सामान्य विशेष, हें जाणणें एथ महादोष…
अर्थ
आता यानंतर अकराव्या अध्यायामध्ये (शांत आणि अद्भुत या) दोन रसांनी भरलेली कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे. ॥1॥ या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचारास आला आहे आणि इतर रसांनाही या दोन रसांच्या पंक्तीचा मान मिळाला आहे. ॥2॥ अहो, नवरानवरीच्या लग्नसमारंभात ज्याप्रमाणे (वधूवराबरोबर) वर्हाड्यांसही वस्त्रे, दागिने मिळतात, त्याप्रमाणे इतर रसांचीही मराठी भाषारूप पालखीत मिरवणूक होऊन त्यांस शोभा आली आहे. ॥3॥ परंतु शांत आणि अद्भुत हे दोन चांगले रस (या अध्यायात इतके प्रामुख्याने आहेत की, ते) या डोळ्यांना उघड दिसतील. जसे विष्णू आणि शंकर हे एका योग्यतेचे देव प्रेमभावनेने एकमेकांस भेटावयास यावेत, ॥4॥ अथवा अमावास्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्यबिंब आणि चंद्रबिंब एकमेकांना भेटतात, त्याप्रमाणे या अध्यायात हे दोन रस एकत्र आले आहेत. ॥5॥ ज्या प्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा आणि यमुना या दोन नद्यांच्या ओघाचा संगम झाला आहे, त्याप्रमाणे या अध्यायात शांत आणि अद्भुत या दोन रसांचा मिलाफ होऊन, अकरावा अध्याय हा प्रयाग क्षेत्रच बनला आहे. म्हणून सर्व जग येथे स्नान करून पवित्र होते. ॥6॥ ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा आणि यमुना या दोन नद्यांचे ओघ प्रकट दिसतात आणि त्या दोन ओघांच्या मधे जशी सरस्वती नदी गुप्त आहे, त्याप्रमाणे या अध्यायात शांत आणि अद्भुत हे दोन रस स्पष्ट दिसणारे आहेत आणि या दोन रसांत गीता ही गुप्त सरस्वतीच आहे. म्हणून बापहो, ही योग्य त्रिवेणी सर्वांना प्राप्त झाली आहे. ॥7॥ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला कारणीभूत करून माझे गुरू जे निवृत्तिनाथ, त्यांनी श्रवणाच्या द्वाराने या (त्रिवेणी) तीर्थात प्रवेश करणे (सर्वांना सोपे केले आहे.) ॥8॥ धर्माचा ठेवा जे माझे गुरू निवृत्तीनाथ त्यांनी (मला कारणीभूत करून) संस्कृतभाषारूपी कठीण (उंच डगरीचे) किनारे फोडून मराठी भाषेतील शब्दरूपी पायर्यांचा घाट बांधला, ॥9॥ म्हणून या त्रिवेणीसंगमात हवे त्याने आस्तिक्यबुद्धीने स्नान करून, जसे प्रयाग क्षेत्रात माधवाचे दर्शन घेतात, तसे येथे विश्वरूप माधवाचे दर्शन घ्यावे, अशा रीतीने संसाराला तिलांजली द्यावी. ॥10॥ हे रूपक पुरे. याप्रमाणे येथे (नव) रसांचे मूर्तिमंत स्वरूप भराला आले आहे. जगाला श्रवणसुखाचे राज्य प्राप्त झाले आहे. ॥11॥ या अकराव्या अध्यायात शांत रस आणि अद्भुत रस हे मूर्तिमंत आहेतच; पण इतर रसांसही या अध्यायात शोभा प्राप्त झाली आहे. हे यांचे वर्णन थोडेच आहे. पण खरोखर या अध्यायात मोक्ष स्पष्ट झालेला आहे. ॥12॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : तो तूं परब्रह्मचि असकें, मज दैवें दिधलासि हस्तोदकें…


