सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय दहावा
यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा । तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥41॥
जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया असती ठाया । ते ते जाण धनंजया । विभूती माझी ॥307॥
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन । विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥42॥
अथवा एकलें एक बिंब गगनीं । तरी प्रभा फांके त्रिभुवनीं । तेवीं एकाकियाची सकळ जनीं । आज्ञा पाळिजे ॥308॥ तयांतें एकलें झणी म्हण । ते निर्धन या भाषा नेण । काय कामधेनूसवें सर्व साहान । चालत असे ॥309॥ तियेतें जें जेधवां जो मागे । तें ते एकसरेंचि प्रसवों लागे । तेवीं विश्वविभव तया अंगें । होऊनि आहाति ॥310॥ तयातें वोळखावया हेचि संज्ञा । जे जगें नमस्कारिजे आज्ञा । ऐसें आथि ते जाण प्राज्ञा । अवतार माझे ॥311॥ आतां सामान्य विशेष । हें जाणणें एथ महादोष । कां जे मीचि एक अशेष । विश्व आहे म्हणोनि ॥312॥ तरी आतां साधारण आणि चांगु । ऐसा कैसेनि पां कल्पावा विभागु । वायां आपुलियेचि मती वंगु । भेदाचा लावावा ॥313॥ एऱ्हवीं तरी तूप कासया घुसळावें । अमृत का रांधूनि अर्धें करावें । हा गां वायूसि काय डावें- । उजवें अंग आहे ॥314॥ पैं सूर्यबिंबासि पोट पाठीं । पाहतां नासेल आपुली दिठी । तेवीं माझां स्वरूपीं गोठी । सामान्यविशेषाची नाहीं ॥315॥ आणि सिनाना विभूतीं । मज अपारातें मविसील किती । म्हणोनि किंबहुना सुभद्रापती । असो हें जाणणें ॥316॥ आतां पैं माझेनि एकें अंशें । हें जग व्यापिलें असे । यालागीं भेदु सांडूनि सरिसें । साम्यें भज ॥317॥ ऐसें विबुधवनवसंतें । तेणें विरक्तांचेनि एकांतें । बोलिलें जेथ श्रीमंतें । श्रीकृष्णदेवें ॥318॥ तेथ अर्जुन म्हणे स्वामी । येतुलें हें राभस्य बोलिलेती तुम्ही । जे भेदु एक आणि आम्हीं । सांडावा एकीं ॥319॥
हेही वाचा – Dnyaneshwari : सत्त्वाथिलियांआंतु, सत्त्व मी म्हणे अनंतु…
अर्थ
जी जी वस्तू वैभवाने, संपत्तीने अथवा उदारतेने युक्त असेल, ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे, असे जाण. ॥41॥
अर्जुना, ज्या ज्या (पुरुषाच्या) ठिकाणी ऐश्वर्य आणि दया ही दोन्ही राहावयास आलेली असतील, तो तो पुरुष माझी विभूती आहे, असे समज. ॥307॥
अथवा हे अर्जुना, हे (प्रत्येक वस्तूचे) वेगवेगळे ज्ञान तुला काय करायचे? (कारण असा तू मला कोठवर जाणशील? तर, थोडक्यात सांगतो -) मी आपल्या एकाच अंशाने हे सर्व विश्व व्यापून राहिलो आहे. ॥42॥
अथवा सूर्यबिंब जसे आकाशात एकटे एकच असते, पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यात पसरतो, त्याप्रमाणे या एका पुरुषाची आज्ञा सर्व लोक मानतात. ॥308॥ त्या पुरुषांना तू कदाचित एकटे असे म्हणशील तर, असे म्हणू नकोस. ते निर्धन आहेत, असे समजू नकोस. (जरी त्यांच्याजवळ साधने प्रत्यक्ष दिसली नाहीत, तरी ती त्यांच्या अंगभूत आहेतच.) कामधेनूबरोबर सर्व सामग्री चालत असते की काय? ॥309॥ तिच्याजवळ जो जे जेव्हा मागेल, ते ती एकदम प्रसवू लागते. त्याप्रमाणे विश्वातील ऐश्वर्ये त्यांच्या अंगभूत होऊन राहतात. ॥310॥ त्यांना ओळखायची खूण हीच की, त्यांची आज्ञा जगाला शिरसावंद्य असते. बुद्धिवान अर्जुना, असे जे आहेत, ते माझे अवतार समज. ॥311॥ आता हे संपूर्ण विश्व मीच आहे, म्हणून या विश्वात एक साधारण आणि एक मुख्य, अशी निवड करणे म्हणजे मोठे पाप आहे. ॥312॥ तर आता एक साधारण आणि एक चांगला असा भेद कसा कल्पावा? आपल्याच बुद्धीने माझ्या ठिकाणी भेदाचा कलंक व्यर्थ का लावावा? ॥313॥ नाहीतर तूप कशाला घुसळावयाचे? अमृताला शिजवून काय अर्धे करावयाचे? बाबा अर्जुना वार्याला उजवे-डावे असे वेगवेगळे अंग आहे काय? ॥314॥ सूर्यबिंबाबाला पोट-पाठ आहे का म्हणून पाहावयास गेले तर, आपल्याच दृष्टीचा बिघाड होईल. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेषांची नुसती गोष्टही नाही. ॥315॥ आणि निरनिराळ्या विभूतींद्वारा अमर्याद जो मी, त्या मला किती मोजशील? यास्तव अर्जुना, फार बोलून काय करावयाचे आहे? हा विभूती जाणण्याचा प्रकार राहू दे. ॥316॥ माझ्या एकाच अंशाने हे सर्व जग व्यापलेले आहे, याकरिता आता भेदभावना टाकून ऐक्यदृष्टीने मला सर्व ठिकाणी सारखे भज. ॥317॥ ज्ञानी पुरुषरूपी वनाचा वसंत आणि वैराग्यशील पुरुषांचे एकनिष्ठेचे ठिकाण, असे जे श्रीमंत श्रीकृष्णदेव ते याप्रमाणे बोलले. ॥318॥ तेव्हा अर्जुन म्हणाला, महाराज, भेद हा एक वेगळा असून त्यास टाकणारे आम्ही एक वेगळे, असे आपण अविचाराने बोलला. ॥319॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : पैं पर्जन्याचिया धारां, वरी लेख करवेल धनुर्धरा…


