नोकरीमधला सगळ्यात मोठा पीरियड मी तेव्हाच्या टेल्कोमध्ये घालवला. चिंचवडला फौंड्री या विभागामध्ये तेव्हा मी काम केले. फौंड्री म्हणजे इथे लोखंडाचा रस तयार करतात आणि तो रस निरनिराळ्या साच्यांमध्ये ओतून गाड्यांना लागणारी कास्टिंग तयार करतात. मी मेंटेनन्स म्हणजे मशीनची दुरुस्ती आणि देखभाल या विभागात काम करत होतो. त्यामुळे माझ्याकरिता 8 तासांच्या शिफ्टची नोकरी असा प्रकार नव्हता. बऱ्याच वेळा दोन किंवा तीन शिफ्ट पण थांबावं लागायचं. एकदा शॉपमध्ये मेजर ब्रेक डाऊन आल्यामुळे, मी सलग पाच शिफ्ट काम केले आहे. म्हणजे, आज सकाळी कामावर गेलो आणि दुसऱ्या दिवशी रात्री 12.30 वाजता घरी आलो. तेव्हा घरी फोन करून काही कळवण्याची सोय पण नव्हती. बायकोला माहीत असायचं की, हे आले नाहीत म्हणजे कंपनीमध्ये आहेत आणि काळजीचे काही कारण नाही. जास्त थांबल्याचा फायदा म्हणजे नंतर कॉम्पेन्सेटरी ऑफ घेता यायचा.
हेही वाचा – कॉलेज मैत्रीण छाया 52 वर्षांनी भेटली, पण…
लोखंडाच्या रसाची हाताळणी सतत होत असल्यामुळे असुरक्षितता, मशीनचे कर्कश्य आवाज, आणि शॉपमध्ये चांगल्यापैकी एक्झॉस्ट सिस्टीम असूनही खूप धूळ… असे वातावरण कायमच असायचे. पण सवय झाल्यानंतर त्याचे काही वाटायचे नाही.
लोखंडाचा रस करण्याकरिता आमच्याकडे 12 टन क्षमतेच्या तीन वीजभट्ट्या होत्या. अजून सुधारणा करण्याकरिता 40 टन क्षमतेची होल्डिंग फर्नेस घेण्याचे मॅनेजमेंटने ठरवले. आपली 8 फूट बाय 8 फूट खोली असते, तेवढी मोठी ही भट्टी असणार होती. 1978 सालची ही गोष्ट. त्याप्रमाणे स्वीडन मधल्या ASEA या कंपनीच्या नावे ऑर्डर निघाली. भट्टीचे सगळे सामान आले आणि भट्टीची उभारणी करण्याकरिता स्वीडनचे इंजिनीअर निमीनन इथे आले. उभारणी करण्यात त्यांच्याबरोबर काम करण्याची मला छान संधी मिळाली. कधी कधी निमीनन यांना कारमधून हॉटेलमध्ये सोडणे किंवा तिथून ऑफिसला आणणे, हे काम माझ्याकडे यायचे. कारमध्ये बसल्यावर ते डोळे मिटून बसायचे… का? तर, रस्त्यावरची बेशिस्त ट्रॅफिक बघून त्यांना टेन्शन यायचे. ते म्हणायचे, स्वीडनमध्ये कोणीही, कुठलाही ट्रॅफिक नियम कधीच मोडत नाही. त्यामुळे रस्त्यावर एकदम सुरक्षित वाटते. इथे अगदीच विरुद्ध आहे. मी चूप व्हायचो, काय उत्तर देणार!
निमीनन यांचे भट्टी उभारणीचे काम संपले आणि ते परत गेले. भट्टी सुरू करण्याकरिता कमिशनिंग इंजिनीअर ही वेगळी व्यक्ती येते. त्याप्रमाणे ASEA कंपनीचे जर्मनीमधले रॉबर्ट इथे आले. कारमधून ऑफिससमोर उतरल्यावर ते बॅगेतून एक नवीनच घेतलेली कॅप काढायचे आणि डोक्यावर घालायचे. त्यावर समोरच्या फ्लॅप वर ASEA असे लिहिलेले होते. शॉपमध्ये काम करताना त्यांच्या डोक्यावर ती कॅप कायम असायची. त्यांच्याबरोबर पण काम करण्याची मला छान संधी मिळाली. त्यामुळे शिकायला पण भरपूर मिळाले. म्हणता म्हणता रॉबर्ट यांचे काम संपले, भट्टी व्यवस्थित सुरू झाली, तिचा वापरही सुरू झाला. रॉबर्ट यांची परत जाण्याची वेळ जवळ आली.
त्यावेळी चौधरी साहेब हे फौंड्रीचे प्रमुख होते. रॉबर्ट यांच्या जाण्याच्या दिवशी सकाळी 11 वाजता चौधरी साहेबांनी स्पेशल मीटिंग बोलावली. सगळ्या डिपार्टमेंट्सचे प्रमुख, संबंधित स्टाफ यांना बोलावले होते. अर्थात, मी पण त्यामध्ये होतोच. रॉबर्टही हजर होते. ऑफिसच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मोठे अंडाकृती टेबल आहे. दोन्ही टोकांना एक एक खुर्ची आणि दोन्ही बाजूला साधारण 8-8 खुर्च्या आहेत… आणि बाजूला भिंतीलगतही खुर्च्या आहेत. महत्त्वाची मिटिंग असल्यामुळे सकाळी 11 वाजताच हॉल पॅक झाला…
चौधरी साहेब पहिल्या चेअरवर बसले होते आणि त्यांच्या डाव्या बाजूला रॉबर्ट बसले. माझा नंबर टेबलच्या दुसऱ्या टोकाच्या म्हणजे चौधरी साहेबांच्या बरोबर समोर दुसऱ्या टोकाच्याच्या खुर्चीवर लागला… फर्नेस व्यवस्थित सुरू करून दिल्याबद्दल रॉबर्ट यांना पुष्पगुच्छ आणि गिफ्ट देऊन त्यांचे आभार मानले. आता रॉबर्ट यांचे काम संपले आहे आणि आज दुपारी ते आपल्या मायदेशी परत जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
“त्यांच्या संपर्कात राहून सगळ्यांनी आवश्यक ती माहिती घेतली असेलच, पण अजून कुणालाही काही शंका असतील, तर त्या त्यांनी रॉबर्ट यांना जरूर विचाराव्या… जेणेकरून आपल्या सगळ्यांना फर्नेसचा वापर करताना यापुढे काहीही अडचण येणार नाही, असे सांगून त्यांनी पुढची सूत्रे रॉबर्ट यांच्याकडे दिली.
रॉबर्ट : (जर्मनीमध्ये रहात असूनही इंग्रजीव) माझ्या कामात सगळ्यांनीच छान सहकार्य केल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. माझे सगळेच काम खेळीमेळीच्या वातावरणात छानच झाले. माझ्या राहण्याची आणि इथे रोज जाण्या-येण्याची पण व्यवस्था खूपच छान होती. तुमच्या शंका काही असतील तर जरूर विचारा…
(सगळ्यांना वाटले की, आता लोक शंका विचारतील आणि रॉबर्ट उत्तरे देतील)
पण रॉबर्ट यांनी एकदम गुगली टाकली. त्यांनी स्वतःच्या डोक्यावरची ASEA लिहिलेली कॅप हातात घेतली आणि टेबलवरून ती माझ्याकडे भिरकावली. कॅप बरोब्बर माझ्यासमोर येऊन थांबली.
रॉबर्ट : Karandikar, This cap is for you and cap is now yours.
रॉबर्ट : (सगळ्यांना उद्देशून) चौधरी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या शंका जरूर विचारा, पण त्यांना मी उत्तरे देणार नाही, माझ्या वतीने मिस्टर करंदीकर उत्तरे देतील…
मी स्वतःला चिमटा काढून जागे असल्याची खात्री करून घेतली. माझ्या बाजूला बसलेल्यांनी हात मिळवून माझे अभिनंदन केले.
प्रश्नोत्तरे सुरु झाली. सगळ्यांनीच सहभाग घेतला. थोड्याच वेळात चहा आणि बिस्किटे आली. दुपारी 1 वाजता मीटिंग संपली. सगळ्यांनी रॉबर्ट यांना बाय बाय केले आणि आम्ही जेवायला कँटीनमध्ये गेलो.
हेही वाचा – फोनवर पुणेरी उत्तरे…
असा आणि इतका विश्वास कोणी अनोळखी परदेशी माणूस आपल्यावर दाखवू शकतो, हा एक आगळा वेगळा आणि स्फूर्तिदायक अनुभव आज मला मिळाला. (मी मनात देवाचे आभार मानले आणि फौंड्रीचे आभार मानले, आणि रॉबर्ट यांचेही आभार मानले…)


