भाग – 3
नीरजने मुंबईतल्या कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेतली, पण पहिल्याच वर्षी अभ्यासात त्याची पीछेहाट पाहायला मिळाली आणि त्याने इंजिनीअरिंग सोडण्याचा निर्णय घेतला… त्याने पुण्याच्या एका कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटसाठी ॲडमिशन घेतली. परत एकदा होस्टेलचा, मेसचा खर्च सुरू झाला. पहिले सहा महिने नीरजचा उत्साह चांगला होता. आई जयू आणि वडील राजेशलाही ते पाहून आनंद वाटत होता. पण एक दिवस जयूने नीरजला फोन केला. त्याची चौकशी केली… पण त्याचा सूर काही तिला योग्य वाटला नाही…
रिझल्ट लागला. अपेक्षेप्रमाणे नीरज पाच विषयांत नापास झाला. मुलाचा धीर खचू नये, त्याने हे अपयश मनाला लावून जीवाचं काही बरंवाईट करू नये, या भीतीने राजेश आणि जयू दोघंही त्याला काही बोलले नाहीत. पण जसजसे नीरजच्या रिझल्टची चौकशी करणारे नातेवाईकांचे फोन येऊ लागले, तसे दोघंही अस्वस्थ होऊ लागले. बहाणे करून तरी किती करणार? नातेवाईकांचं एक असतं, जेव्हा आपल्या बाबतीत चांगल्या घटना घडतात, तेव्हा ते त्यांची दखलही घेत नाहीत. वाईट, बदनामीच्या घटना घडल्या की, शंभर वेळा चौकशी करतात. जखमेवर मीठ चोळण्याची संधी अशी कशी ते वाया घालवणार?
एक दिवस राजेशचा संयम संपला. मोबाइलवर गेम खेळत बसलेल्या नीरजच्या हातून त्याने मोबाइल हिसकावून घेतला…
“नीरज तुला काही गांभीर्य आहे की नाही? एवढा नापास होऊनही कसलंच टेन्शन तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही. रिझल्ट लागल्यापासून पाहतोय खाणं, पिणं, झोपणं, बाईकवर भटकणं आणि उरलेला वेळ मोबाइल घेऊन बसणं याव्यतिरिक्त दुसरा काही उद्योग नाही का तुला? काय ठरवलंयस तू? इंजिनीअरिंग सोडलं, हॉटेल मँनेजमेंट सोडलं, आता काय करायचं ठरवलंय तू?”
“मी अजून काहीच ठरवलेलं नाहिये…” वडिलांकडे रागाने पहात नीरज म्हणाला, “ते ज्योतिषी म्हणतात डी.एड.कर म्हणून…”
“खड्ड्यात घाल त्या ज्योतिषाला. तुला तुझं काही मत नाही का? अरे, वीस वर्षाचा झालाय तू आता. तुझ्या बरोबरीचे मुलं इंजिनीअरिंगच्या थर्ड इयरला पोहचलीत… पुढच्या वर्षी ते इंजिनीअर होतील आणि तुझा अजून मार्गच निश्चित नाही. काही लाज वाटते की नाही तुला?”
नीरज रडवेला होऊन आईकडे पाहू लागला. जयू पुढे होऊन राजेशला म्हणाली,
“अहो शांत व्हा. असं डोक्यात राख घालून कसं चालेल? सापडेल काही तरी मार्ग…”
“तुम्ही दोघं मला करोडपती समजता का? जवळजवळ दहा लाख रुपये खर्च झालेत आतापर्यंत, काही उपयोग झाला? दोन वर्षं वाया गेलीत आणि तिसरं वर्षही वाया घालवणार आहेत साहेब. तुला माहीत नाही, लोकांच्या प्रश्नांना उत्तरं मला द्यावी लागतात. किती दिवस खोटं बोलणार?”
हेही वाचा – नीरजचा निर्णय ऐकून राजेश अन् जयूला धक्काच बसला!
जयूला नवऱ्याची अडचण समजत होती. तिलाही तर महिला मंडळातल्या आणि शेजारपाजारच्या बायका नीरजबद्दल विचारुन भंडावून सोडायच्या आणि पुरुषांपेक्षा बायका जास्तच चहाटळ असतात, असं जयूचं मत होतं. राजेशचा संताप पाहून ती नीरजला आतल्या खोलीत घेऊन गेली.
त्या प्रसंगानंतर नीरज अबोल झाला. त्याचं बाहेर भटकणं कमी झालं. त्याचे सगळे मित्रही पुढे निघून गेले होते. जे काही अकोल्यात होते. ते भेटल्यावर त्याची टिंगलटवाळी करायचे. नीरज अजूनच निराश होऊन घरी परतायचा.
एक दिवस तो जयूला म्हणाला, “आई, मी वडापावची गाडी सुरू करू? मुंबईला वडापाववाले खूप श्रीमंत झालेत…”
जयूला भडभडून आलं. इतका हुशार मुलगा, ज्यानं इंजिनीअर होण्याची स्वप्नं पाहिली, आज सामान्य मुलासारखा वडापावची गाडी टाकणार? तिला त्या विचारानेच कसंतरी झालं. पदराने डोळे पुसत ती त्याला म्हणाली, “इतकी वाईट वेळ नाही आली बेटा आपल्यावर! तू अजूनही विचार कर. कुठंतरी ॲडमिशन घे. हे वर्ष तरी वाया घालवू नकोस.”
नीरज म्हणाला, “आई, काय करावं ते मलाही सुचत नाहीये. डोकं नुसतं चक्रावून गेलंय. सगळीकडे नुसता अंधार दिसतोय. आजकाल कुठंही ॲडमिशन घ्यायला जा. पैशाचा नुसता चुराडा असतो. त्यामुळे बाबांना ते सांगायची मला भीती वाटते. असं वाटतं आपल्याला तेही नाही जमलं तर?”
जयूला त्याची अवस्था समजत होती, पण काहीतरी करावं तर लागणारच होतं. तिला अचानक एक कल्पना सुचली…
“नीरज तू बारावीच्या बेसवर बी.एस्सी.ला का नाही जात? आजकाल मायक्रोबायोलॉजीसारखे वेगळे विषय आहेत, ते फारसे कठीण जाणार नाहीत आणि तुझं वर्षही वाया जाणार नाही. शिवाय, पुढे नेटसेटच्या परीक्षा देऊन तू प्राध्यापकही होऊ शकतोस!”
नीरजला ती कल्पना पटली, तो तयार झाला. जयूने राजेशलाही ते पटवून दिलं. राजेश आता या ॲडमिशन प्रक्रियेलाच कंटाळला होता. नीरजने त्याला पटेल ते करावं, अशी त्याने भूमिका घेतली.
एक दिवस राजेशचा कॉलेजचा मित्र रात्री जेवायला आणि रहायला आला. नीरज तेव्हा बाहेर गेला होता. गप्पांच्या ओघात नीरजचा विषय निघाला, तेव्हा राजेशने त्याला नीरजबद्दल सगळं सांगितलं.
“तुझी परवानगी असेल तर, मी काही त्याला समजुतीच्या गोष्टी सांगू?” त्याने विचारलं.
“जरुर सांग. बाहेरच्यांनी कान टोचले की, त्याचा राग येत नाही.”
नीरज आला. जेवणं झाल्यावर राजेशच्या मित्राने नीरजला करिअरबद्दल विचारलं. तेव्हा नीरजने बी.एस्सी. करत असल्याचं सांगितलं.
“तुला एक छोटीशी गोष्ट सांगू बेटा? त्यातून तुला झाला तर, फायदाच होईल!”
“सांगा ना काका…”
जयूही बाहेर येऊन बसली
“साधारण तीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट. एका खेड्यात एक मुलगा रहात होता. खूप हुशार. शाळेत नेहमी पहिला येणारा. त्याचे वडील शेतमजूर होते. तुटपुंजं उत्पन्न. पण वडिलांना वाटायचं माझ्या मुलाने इंजिनीअर व्हावं. मुलाला मात्र संगीताचं वेड. तो बासरी छान वाजवायचा, चित्र खुप सुरेख काढायचा. नाटकात काम करायचा. इंजिनीअरिंग म्हणजे सगळं कठीण, रूक्ष… त्यात अशा कलावंतांना कुठून स्कोप असणार? म्हणून मुलाला ते नको होतं. त्याला कलेच्या क्षेत्रात नाव कमवायचं होतं. दहावीचा रिझल्ट लागला. मुलाला चांगले मार्क्स मिळाले. त्याला आर्ट्स कॉलेजला ॲडमिशन घ्यायची होती. पण बापाचं स्वप्नं होतं, मुलाला इंजिनीअरच करीन. इच्छा नसतानाही मुलाला बापाचं स्वप्नं पुर्ण करण्यासाठी यवतमाळच्या पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन घ्यावी लागली. गावाबाहेरचं कॉलेज. हॉस्टेल सोडलं तर कसल्याही सुविधा नाहीत. जेवायलासुद्धा पाच किमीवरच्या हॉटेलमध्ये जावं लागायचं. सकाळ संध्याकाळ वीस किमीची पायपीट ठरलेली. बाकीच्या मुलांनी सायकली विकत घेतल्या. पण या मुलाला सायकलीसाठी वडिलांना पैसे मागवेनात. घरची गरिबी तो जाणून होता. वडील फक्त महिन्याच्या जेवणापुरते पैसे पाठवत. म्हणून या मुलाने चहा सोडला. इतर मुलं कॉलेजजवळच्या टपरीवर चमचमीत वडा, मिसळ खायचे. त्या वासाने आपली भूक खवळू नये म्हणून हा तिकडे फिरकायचाच नाही. अभ्यासाला पुस्तकं नव्हती. रुम पार्टनर झोपले की, हा त्यांची पुस्तकं घेऊन रात्ररात्र अभ्यास करायचा. वह्या, ड्राईंग शीटस्, पेन्सिली, साबण यांना लागणारा पैसा कुठून आणायचा म्हणून याने गावात पेपर वाटायला सुरुवात केली. त्यासाठी भल्या पहाटे बाकी मुलं साखरझोपेत असताना आपल्या रुम पार्टनरची सायकल घेऊन तो जायचा. महिन्याला पगार झाला की, या सायकलचं भाडं तो पार्टनरला द्यायचा. त्याच्या या परिस्थितीची त्याच्या मित्रांना दया यायची. मग तेच कधीतरी त्यांच्या पैशाने त्याला सिनेमा दाखवत. कधी बाहेरची चटपटीत पाणी पुरी, भेळ खाऊ घालत. इतक्या कठीण दिवसातही या मुलाच्या चेहऱ्यावरचं हसू कधी मावळलं नाही. वागण्यातली नम्रता कधी कमी झाली नाही. बाकी मुलांनी कठीण विषयाच्या ट्युशन्स लावल्या होत्या. याला ते परवडणारं नव्हतं. पण रिझल्ट लागला की, पहिला नंबर याचाच असायचा. डिप्लोमाची तीन वर्ष संपली. शेवटच्या वर्षीही हा काँलेजमधून पहिला आला.
आनंदाने तो घरी आला तर वडिलांनी अंथरुण धरलेलं, टीबीमुळे त्यांची अवस्था वाईट झालेली. पहिल्या नंबरने पास झाल्याचा आनंद विरुन गेला. वडिलांनी सांगितलं, “आता शिक्षण पुरे. काहीतरी कामधंदा कर. माझ्याकडून आता काम होणं शक्य नाही.” दोन लहान बहिणी आणि एका भावाची जबाबदारी अंगावर पडलेली. घरात दोन वेळेचं जेवण मिळायची मारामार. त्याला आठवलं, त्याच्या मित्राचे वडील तालुक्याला इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर होते. लगोलग तो त्यांच्याकडे गेला. इंजिनीअर असूनही वायरमनची कामं करायची तयारी दाखवली. मित्राच्या वडिलांना दया आली. महिन्याला पाचशे रुपये पगारावर ठेवून घेतलं. तालुक्याचं गाव याच्या गावापासून वीस किमी अंतरावर. बसची व्यवस्था चांगली नाही. पहिल्या पगाराला एक जुनीपुराणी खटारा सायकल विकत घेतली. तिला डागडुजी करुन हा रोज तिच्यावर तालुक्याला ये-जा करू लागला. नंतर एका कंपनीत त्याला नोकरी मिळाली. पगार वाढला. दोनतीन वर्षांनी एका सरकारी खात्यात जागा निघाल्या. त्यात याची निवड झाली. पण अजून संघर्ष संपला नव्हता. आईवडिलांचं आजारपण, दोन बहिणींची लग्न, धाकट्या भावाचं शिक्षण अंगावर होतं. त्यांच्यासाठी काटकसर चालूच राहिली. बिचाऱ्याला मनसोक्त कधी जगताच आलं नाही. मन मारुन बिचारा जगला…”
“काका, ही तुमची तर गोष्ट नव्हे?” नीरजने मधेच उत्सुकतेने विचारलं. एवढ्यात त्याचं लक्ष आईकडे गेलं. ती डोळ्याला पदर लावून मुसमुसत होती. राजेशचेही डोळे भरून आले होते.
” अरे वेड्या, तुझ्या लक्षात नाही आलं? ही तुझा बाप, राजेशची गोष्ट आहे!”
नीरज चपापला… आई का रडतेय, हे त्याच्या लक्षात आलं.
“पण बाबांनी मला हे कधी सांगितलं नाही.”
“कसं सांगणार? आपल्या दुःखाची, कष्टांची सावली आपल्या मुलावर पडावी, असं कोणत्या बापाला वाटतं?”
नीरज खाली मान घालून बसला. आपल्या वडिलांसारखं कष्टमय जीवन आपल्या वाट्याला कधीच आलं नाही, याची जाणीव त्याला झाली.
“आता बघ. तुझ्या आयुष्याची तुझ्या बापाच्या आयुष्याशी तुलना करून बघ. इतक्या प्रतिकूल परिस्थितीतही तुझ्या वडिलांनी हार मानली नाही. त्यांची आवड, स्वप्नं, महत्वाकांक्षा वेगळी होती. पण केवळ वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी आपल्या स्वप्नांना तिलांजली देत इंजिनीअरिंग केलं. तेही रडत-कुथत नाही तर, सर्वस्व ओतून, पहिल्या क्रमांकाने पास होऊन… हे असं सर्वस्व ओतण्याची भावना तुम्हा मुलांमध्ये का नाही? कुणीतरी सांगितलं, मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये राम नाही म्हणून तू सरळ रामराम ठोकला. हॉटेल मॅनेजमेंट सुरुवातीला आवडलं, पण नंतर आवडेनासं झालं म्हणून तू ते सोडून दिलंस! काय करायचं तुझ्या बापाने? तुझ्या लहरीखातर लाखो रुपये बर्बाद करायचे? अरे, तुझ्या बापाचा मी रुमपार्टनर होतो. त्याचं संपूर्ण आयुष्य मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. तुझ्या मोबाइलच्या किमतीएवढे सुद्धा पैसे त्याने आपल्या शिक्षणाला खर्च केले नसतील.”
आता मात्र नीरजला गहिवरून आलं… वाया गेलेली दोन वर्षं आणि या दोन वर्षांत झालेली पैशांची उधळपट्टी त्याच्या मनाला कुठेतरी बोचू लागली
“सॉरी काका…”
“मला सॉरी म्हणून काय उपयोग? माफी तू आईवडिलांची माग. मुलं जेव्हा नालायक निघतात ना, तेव्हा आईवडिलांच्या मनाला किती यातना होतात, हे तुला आता नाही, तू स्वतः बाप होशील तेव्हा कळेल. मी माझ्या आईवडिलांना अशाच यातना दिल्या. तीन वर्षांचा डिप्लोमा मी पाच वर्षांतही पूर्ण केला नाही. शेवटी बापाने मला आमच्या किराणा दुकानावर बसवलं. आज माझी मुलं मला त्रास देतात, तेव्हा मला बापाच्या यातना कळतात…”
घरात शांतता पसरली. वातावरण एकदम जड होऊन बसलं. जयूला काहीतरी बोलायचं होतं, पण राजेशने तिला गप्प रहाण्याची खूण केली… शेवटी मित्रानेच शांततेचा भंग केला,
“सॉरी बेटा, मी तुला खूप बोललो. राग मानू नकोस. तुझ्या भल्यासाठीच मी बोललो. अजूनही वेळ गेलेली नाही. ठाम निर्णय घे. आवडो न आवडो, एक काहीतरी शिक्षण पूर्ण कर. तुझ्या आईवडिलांची सगळी स्वप्नं तुझ्याभोवती केंद्रित झाली आहेत. त्यांना तडा जाऊ देऊ नकोस…”
दोन दिवसांनी नीरज राजेशला म्हणाला, “बाबा मला परत मेकॅनिकल इंजिनीअरिंगला ॲडमिशन घ्यायचीय.”
“काय्य? आता परत कुठलं खुळ तुझ्या डोक्यात शिरलंय? तू तर बी.एस्सी.ला ॲडमिशन घेणार होतास ना?”
“नाही बाबा. मी तो विचार कॅन्सल केलाय आणि मी इंजिनीअरिंग मुंबईला नाही इथे अकोल्यातच करणार आहे.”
“अरे, पण मग तुला परत सीईटी आणि जेईई द्याव्या लागतील…”
” देईन मी आणि क्वालिफायही नक्की होईन… आणि हो बाबा, मला फक्त ॲडमिशनसाठी तात्पुरते पैसे द्या. मी माझ्या मित्राच्या वर्कशॉपमध्ये पार्टटाइम जॉब शोधलाय. त्याच्या पगारातून मी तुमचे पैसे परत फेडेन…”
राजेशने त्याला जवळ घेतलं,
“अरे बेटा अजून तुझा बाप जिवंत आहे आणि तू नोकरी करण्याइतकी आपली परिस्थिती काही वाईट नाही…”
“नाही बाबा, मी निर्णय घेतलाय… माझं शिक्षण मी माझ्याच पैशावर करणार आहे. प्लीज नाही म्हणू नका!”
जयू जवळच उभी होती. मुलाचा तिला अभिमान वाटला.
चार वर्षांनी नीरज आपला रिझल्ट घेऊन घरात शिरला… “आईबाबा मी पास झालो आणि तेही मेरिटमध्ये!”
राजेशने त्याला मिठी मारली. जयूने त्याला ओवाळलं, त्याला साखर खाऊ घातली आणि ती रडायला लागली… अखेर तिचा मुलगा इंजिनीअर झाला होता!
हेही वाचा – दिशाहीन नीरजच्या चिंतेने आई गेली थेट ज्योतिषाकडे!
“आई रडू नकोस. अजून एक आनंदाची बातमी आहे. मी ज्या वर्कशॉपमध्ये काम करत होतो, त्याच्या मालकांना नवीन इंडस्ट्री सुरू करायचीय, फ्रान्सच्या कोलॅबरेशनने! मला त्यांनी पार्टनरशिपची ऑफर दिलीय, कारण सध्या त्यांचं वर्कशॉप मीच तर सांभाळत होतो. त्यांचा विश्वास बसलाय माझ्यावर!”
“पण कारे ती इंडस्ट्री चालली नाही तर?” जयूने शंका येऊन विचारलं
“आई, आपण मराठी माणसं याच शंकेने कोणताही व्यवसाय न करता पाच-दहा हजारांवर नोकऱ्या करतो. काही घाबरू नकोस, तसं काही होणार नाही आणि समजा तसं झालंच तर आता मला इतका अनुभव आहे की, मी लाथ मारेन तिथं पाणी काढेन!”
“वारे मेरे पठ्ठे! याला म्हणतात कॉन्फिडन्स…” राजेश त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला.
नीरज बाहे गेल्यावर राजेश जयूला म्हणाला, “अगं त्या ज्योतिषालाही पेढे देऊन ये. नीरजच्या कुंडलीत इंजिनीअरिंगचे योग नाहीयेत, असं म्हणत होता ना तो!”
जयू हसायला लागली आणि म्हणाली, “आपलं ध्येय मजबूत असेल तर नियतीचे योगसुद्धा आपल्याला साथ देऊ लागतात.”


