सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय दहावा
बृहत्-साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् । मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥35॥
वेदराशीचिया सामा- । आंत बृहत्साम जे प्रियोत्तमा । तें मी म्हणे रमा- । प्राणेश्वरु ॥281॥ गायत्री छंद जें म्हणिजे । तें सकळां छंदांमाजि माझें । स्वरूप हें जाणिजे । निभ्रांत तुवां ॥282॥ मासांआंत मार्गशीरु । तो मी म्हणे शारङ्गधरु । ऋतूंमाजीं कुसुमाकरु । वसंतु तो मी ॥283॥
द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् । जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥36॥ वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनंजयः । मुनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥37॥
छळितयां विंदाणा- । माजी जूं तें मी विचक्षणा । म्हणोनि चोहटां चोरी परि कवणा । निवारूं न ये ॥284॥ अगा अशेषांही तेजसां- । आंत तेज तें मी भरंवसा । विजयो मी कार्योद्देशां । सकळांमाजीं ॥285॥ जेणें चोखाळत दिसे न्याय । तो व्यवसायांत व्यवसाय । माझेंचि स्वरूप हें राय । सुरांचा म्हणे ॥286॥ सत्त्वाथिलियांआंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु । यादवामाजीं श्रीमंतु । तोचि तो मी ॥287॥ जो देवकीवसुदेवास्तव जाहला । कुमारीसाठीं गोकुळीं गेला । तो मी प्राणासकट पियाला । पूततेनें ॥288॥ नुघडतां बाळपणाची फुली । जेणें मियां अदानवी सृष्टि केली । करीं गिरि धरूनि उमाणिली । महेंद्रमहिमा ॥289॥ कालिंदीचें हृदयशल्य फेडिलें । जेणें मियां जळत गोकुळ राखिलें । वासरुवांसाठीं लाविलें । विरंचीस पिसें ॥290॥ प्रथमदशेचिये पहांटे- । माजी कंसाऐशीं अचाटें । महाधेंडीं अवचटें । लीळाचि नासिलीं ॥291॥ हें काय कितीएक सांगावें । तुवांही देखिलें ऐकिलें असे आघवें । तरि यादवांमाजीं जाणावें । हेंचि स्वरूप माझें ॥292॥ आणि सोमवंशीं तुम्हां पांडवां- । माजीं अर्जुन तो मी जाणावा । म्हणोनि एकमेकांचिया प्रेमभावा । विघडु न पडे ॥293॥ संन्यासी तुवां होऊनि जनीं । चोरूनि नेली माझी भगिनी । तऱ्ही विकल्पु नुपजे मनीं । मी तूं दोन्ही स्वरूप एक ॥294॥
हेही वाचा – Dnyaneshwari : मी आघवियेचि सृष्टी, आदिमध्यांतीं किरीटी…
अर्थ
तसेच (चौदा) सामांमधे बृहत्साम मी आहे, छंदांमध्ये गायत्री छंद मी आहे, मासांमध्ये मार्गशीर्षमास मी आहे, ऋतूंमध्ये वसंत ऋतू मी आहे. ॥35॥
अत्यंत आवडत्या अर्जुना, वेदांमध्ये असलेल्या रथंतरादी सामांमध्ये बृहत्साम ही माझी विभूती आहे, असे लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण म्हणाला. ॥281॥ ज्यास गायत्री छंद असे म्हणतात, तो सर्व छंदांमध्ये माझे स्वरूप आहे, असे ती नि:संशय समज. ॥282॥ सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष नावाचा महिना, तो मी आहे, असे शारंगधर श्रीकृष्ण म्हणाले. सहा ऋतूंमध्ये पुष्पांची खाण जो वसंत ऋतू तो मीच आहे. ॥283॥
छलन करणार्या वस्तूंमध्ये द्यूत मी आहे, तेजस्वी पदार्थातील तेज मी आहे, सिद्धी मी आहे, उद्योग मी आहे, सात्विक वस्तूंमध्ये सत्त्व मी आहे. ॥36॥ यादवांमध्ये श्रीकृष्ण मी आहे. पांडवांमध्ये धनंजय मी आहे, मुनींमध्ये व्यासमुनी मी आहे, कवींमध्ये शुक्राचार्य मी आहे. ॥37॥
हे चतुर अर्जुना, कपटकारक कारस्थानांमध्ये जुगार ती माझी विभूती आहे, म्हणून उघड उघड चव्हाट्यावर जरी चोरी होते, तरी कोणास निवारण करता येत नाही. ॥284॥ अर्जुना, एकूण एक तेजस्वी पदार्थांमध्ये असणारे जे तेज, ते मी आहे, अशी खात्री असू दे. मी सर्व व्यवहारांतील उद्दिष्टांमध्ये विजय (हातात घेतलेल्या कामात येणारे यश) आहे. ॥285॥ सर्व उद्योगात ज्या उद्योगाने शुद्ध न्याय दिसतो, (म्हणजे जो उद्योग नीतीला सोडून नाही) तो माझेच स्वरूप आहे, असे सर्व देवांचे राजे भगवान म्हणाले. ॥286॥ सत्वगुणसंपन्नांमध्ये जे सत्व आहे, ते मी आहे, असे अनंत म्हणाला आणि यदुकुळातील पुरुषांमध्ये ऐश्वर्यवान जो कृष्ण, तोच तो मी आहे. ॥287॥ जो देवकी-वसुदेवांपासून जन्मास आलेला आणि जो योगमाया नावाच्या यशोदेच्या मुलीच्या बदली गोकुळात गेलेला, त्या मी कृष्णाने पूतना राक्षसीचे तिच्या प्राणासह शोषण केले. ॥288॥ बाळपणाची दशा संपली नाही तोच, ज्या मी दैत्यरहित सृष्टी केली आणि करांगुलीवर गोवर्धन पर्वत धारण करून इंद्राचा थोरपणा मोजून टाकला (म्हणजे इंद्राचा गर्व हरण केला). ॥289॥ यमुनेला हृदयात काट्याप्रमाणे सलणारा (जो कालिया नाग) त्याचा नाश केला. ज्या मी दावाग्नीपासून जळत असलेल्या गोकुळाचे रक्षण केले आणि ब्रह्मदेवाने गायीवासरे आणि गोपाळ यांचे हरण केले असताना (त्यांच्यासारखे दुसरे गोपळ, गायी, वासरे वगैरे आपण बनून) ब्रह्मदेवास वेड लावले, ॥290॥ बाल्यावस्थेच्या सुरुवातीलाच कंसासारखी अचाट मोठाली धेंडे अकस्मात सहज नाहीशी केली, ॥291॥ हे एक एक वेगळे किती सांगणार? हे सर्व तू देखील पाहिलेले आणि ऐकलेले आहेस. तर यादवांमध्ये हेच (कृष्ण) माझे स्वरूप आहे, असे समज. ॥292॥ आणि सोमवंशामधील तुम्हा पांडवांमध्ये जो तू अर्जुन, तो मी आहे, असे समज. म्हणून तुमच्या-आमच्या परस्परांमधील स्नेहसंबंधांमध्ये बिघाड येत नाही. ॥293॥ या लोकामध्ये तू संन्यासी होऊन माझी बहीण चोरून नेलीस, तरी माझ्या मनात काही विकल्प उत्पन्न झाला नाही; कारण मी आणि तू दोघेही एकरूपच आहोत ॥294॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : जो प्रळयतेजा देत मिठी, सगळिया पवनातें गिळी किरीटी…


