दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 08 एप्रिल 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 18 चैत्र शके 1948; तिथि : षष्ठी 19:00; नक्षत्र : मूळ अहोरात्र;
- योग : वरियान 17:09; करण : विष्टी अहोरात्र;
- सूर्य : मीन; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:53;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
गायनाचार्य भास्करबुवा बखले
टीम अवांतर
चतुरस्त्र प्रतिभेचे श्रेष्ठ गायक; गायनाचार्य आणि अभिजात नाट्यसंगीताच्या परंपरेचे प्रवर्तक भास्करबुवा बखले यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1869 रोजी बडोदे संस्थानातील कठोर या गावी झाला. त्यांचा आवाज लहानपणापासून गोड असल्यामुळे वर्गशिक्षक त्यांना वारंवार संस्कृत श्लोकपठण करायला लावीत. त्यांच्या या गुणांमुळे पिंगळेबुवा नावाच्या हरिदासाकडे त्यांची संगीतशिक्षणाची सोय झाली. भास्करबुवांच्या आवाजाची कीर्ती पुढे किर्लोस्कर संगीत नाटक मंडळीतील भाऊराव कोल्हटकर यांच्या कानी गेली आणि त्यांनी भास्करबुवांना मंडळींत आणले. मंडळीचा मुक्काम इंदूरला असताना भास्करबुवांचा आवाज सुप्रसिद्ध बीनकार उस्ताद बंदे अलीखाँ यांनी ऐकला आणि स्वतः होऊन त्यांनी भास्करबुवांना संगीतशिक्षणासाठी गंडा बांधला.
सुमारे दोन वर्षे त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये काम केले. नंतर आवाज फुटल्यामुळे त्यांनी ही नाटक मंडळी सोडली. उच्च दर्जाची गायनकला शिकण्यासाठी ते पुन्हा बडोद्यास आले आणि ग्वाल्हेर घराण्याचे गायक उस्ताद फैज महंमदखाँ यांचे त्यांनी शिष्यत्व पत्करले. चिकाटीने, मेहनतीने आणि निष्ठेने त्यांनी खाँसाहेबांकडून विद्या प्राप्त केली आणि खानदानी गवयी म्हणून लौकीक प्राप्त केला. त्यांनी गायलेली नाथ हा माझा, मम आत्मा गमला ही नाट्यपदे खूप गाजली.
हेही वाचा – नेहाला पाहिजे असलेले पद राजने नाकारले, पण…
नंतर उस्ताद फैज महंमदखाँ यांच्याच मार्गदर्शनावरून भास्करबुवांनी आग्रा घराण्याचे उस्ताद नथ्थनखाँ आग्रेवाले यांचा गंडा बांधला. त्यांच्याच सूचनेनुसार त्यांच्या मृत्यूनंतर, भास्करबुवांनी जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादियाखाँ यांना गुरू केले आणि त्यांच्या गायकीचे मर्मही आत्मसात केले. भास्करबुवांनी ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या तीनही घराण्यांच्या गायकीचे सौंदर्य आत्मसात केले होते. शास्त्रीय संगीतावर आधारित चिजांच्या चाली वापरून त्यांनी नाट्यगीते संगीतबद्ध केली. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, सौंदर्यपूर्ण गायकी आणि प्रेमळ तसेच दिलदार स्वभाव या गुणांमुळे भास्करबुवांची ख्याती हिंदुस्थानात सर्वत्र पसरली.
विद्याहरण, स्वयंवर, द्रौपदी यासारख्या संगीतनाटकांना संगीत देऊन तसेच बालगंधर्व, मास्तर कृष्णराव, गोविंदराव टेंबे यांच्यासारख्या समर्थ कलावंतांना तालीम आणि मार्गदर्शन देऊन मराठी नाट्यसंगीताचे दर्जेदार स्वरूप त्यांनी घडविले. नाट्यसंगीत त्यांनी अभिजात संगीताच्या पातळीवर नेऊन ठेवले. रसिकांनी त्यांना ‘देवगंधर्व’ ही मानाची पदवी दिली. 1911मध्ये त्यांनी पुणे येथे ‘भारत गायन समाज’ या संस्थेची स्थापना केली. 8 एप्रिल 1922 रोजी भास्करबुवांचे पुणे येथे निधन झाले. ‘भारत गायन समाज’ ही संस्था दरवर्षी त्यांच्या स्मरणार्थ ‘देवगंधर्व संगीत महोत्सवाचे’ आयोजन करते.
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. व्यावसायिक क्षेत्रात ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. एखादा नवीन प्रकल्प किंवा उपक्रम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अनुकूल आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. भरपूर पाणी पिणे आणि हलका आहार घेणे तब्येतीसाठी फायदेशीर ठरेल.
वृषभ – आज आर्थिक स्थिती संतुलित राहील. कौटुंबिक आयुष्यात थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. लहान समस्यांचे मोठ्या वादात रूपांतर होऊ देऊ नका. नोकरी करणाऱ्यांसाठी कार्यालयातील वर्तन अत्यंत महत्त्वाचे असेल. वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी योग्य तो समन्वय ठेवा. बदलत्या हवामानाचा तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. योग्य तो वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या.
मिथुन – आर्थिक बाबतीत विवेकपूर्ण निर्णय घेणे आवश्यक आहे. करिअरमध्ये सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. पोट आणि पचनाशी संबंधित किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जंक फूड किंवा बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. कौटुंबिक जीवनातील मतभेद मिटवण्यासाठी ही योग्य वेळ आहे.
कर्क – आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या भक्कम राहील. तुमचे उत्पन्न स्थिर असेल. आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक जीवनात आनंद टिकून राहील. नातेवाईकांबरोबरचे जुने वाद मिटू शकतील. मात्र मानसिक आणि शारीरिक थकवा टाळा. पुरेशी झोप आणि हलका व्यायाम यासाठी फायदेशीर ठरेल. तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगाभ्यास करणे आवश्यक आहे.
सिंह – आज करिअरमध्ये प्रगती करण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. क्षमताही सिद्ध करू शकता. सकारात्मक विचारांनी कामाच्या तणावावर मात करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक संबंध चांगले राहतील. तब्येतीसाठी हलका व्यायाम आणि संतुलित आहार फायदेशीर ठरेल. मानसिक ताण टाळा. ध्यान किंवा योगामुळे मन शांत होण्यास मदत होईल.
कन्या – आजचा दिवस तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन आणेल. कार्यालयात तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खूश असतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्य सामान्य राहील, मात्र आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळा.
तुळ – आज नात्यांमध्ये सुसंवाद राखणे आवश्यक आहे. जोडीदारासोबत सुरू असणारे कोणतेही मतभेद चर्चेद्वारे सोडवा. त्यावेळी राग आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा कोंडी कायम राहू शकते. आज करिअरमध्ये सकारात्मक परिणाम दिसतील. आर्थिक गुंतवणूक हुशारीने करा. आरोग्य सामान्य राहील.
वृश्चिक – आजचा दिवस सकारात्मक असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी येऊ शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण टाळा आणि मन शांत ठेवण्यासाठी योग किंवा ध्यान करा. हलका व्यायाम आणि संतुलित आहार फायदेशीर ठरेल. नात्यांमध्ये अहंकार टाळा; तरच तुमचे नातेसंबंध अधिक दृढ होतील.
धनु – आज प्रेमसंबंधांमध्ये सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणतेही प्रश्न शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. गुंतवणुकीच्या बाबतीत घाई करू नका, पूर्ण विचार करून निर्णय घ्या अथवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्याबाबत काही प्रमाणात सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे.
हेही वाचा – झाले मोकळे आकाश…
मकर – कामाच्या ठिकाणी तुमचे वर्तन आणि कार्यनिष्ठा महत्त्वपूर्ण ठरेल. प्रतिस्पर्ध्यांचे डावपेच निष्प्रभ होतील. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील आणि बचतीच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. मात्र, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे टाळा. नियमित दिनचर्या पाळणे फायदेशीर ठरेल.
कुंभ – आज कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल. जोडीदारासोबतचे नातेसंबंध अधिक दृढ होतील. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात, ज्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडाल. गुंतवणूक करताना कोणतीही जोखीम घेऊ नका. बोलताना तारतम्य बाळगून, विचारपूर्वक बोला. अन्य गैरसमज निर्माण होऊन, परिस्थिती बिघडू शकते.
मीन – आजचा दिवस आव्हानांनी भरलेला असू शकतो. कौटुंबिक नात्यातील तुमचा प्रामाणिकपणा नाते अधिक दृढ करेल. कामाच्या ठिकाणी काही कठीण परिस्थितींना सामोरे जावे लागू शकते. हितशत्रूंच्या कारवायांबाबत सतर्क रहा, परंतु संयम बाळगा. पूर्वी एखाद्याला उधार दिलेले पैसे वसूल होतील.


