उत्तरार्ध
श्रीनिवास आणि त्याची होणारी बायको आरती मला भेटले तेव्हा श्रीनिवासने मला कडाडून मिठी मारली. नकळत आमच्या दोघांच्याही डोळ्यांत पाणी आलं, कारण आरतीच्या आईवडिलांची समजूत काढण्यासाठी आम्ही काय काय दिव्यातून गेलो होतो ते आमचं आम्हालाच माहीत होते! आमची गळाभेट बघून आरतीला हसू आवरत नव्हते.
ते दोघे जण स्थानापन्न झाले. माझा उतावळेपणा बघून श्रीनिवासने बोलायला सुरुवात केली…
“सर, एक दिवस सकाळी ऑफिसच्या थोडे आधी रस्त्यावर गर्दी जमली होती. सहज कुतूहल म्हणून मी तिथे डोकावलो. एक जण रस्त्यावर बसले होते पाणी पीत. मी बाजूच्या माणसाला विचारले तर तो म्हणाला, “अचानक चक्कर येऊन कोसळले इथे.” सगळे नुसतेच बघत उभे होते. मला रहावेना म्हणून मग मीच पुढे जाऊन त्यांची विचारपूस केली. जवळच असलेल्या दवाखान्यात घेऊन गेलो. तिथल्या डॉक्टरांनी माझ्याजवळ शंका व्यक्त केली हृदयविकाराची आणि मी त्यांचा कोणी लागतो का याची चौकशी केली.मला त्या क्षणी गांभीर्याची जाणीव झाली. तातडीने उपचार मिळण्याची आवश्यकता होती. मी डॉक्टरना विनंती करून जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये सुरुवातीच्या उपचारासाठी चिठ्ठी लिहून घेतली. एव्हाना ते काका देखील बऱ्यापैकी सावरले होते. त्यांनी त्यांच्या मुलाचा मोबाइल नंबर दिला. मी त्याला फोन करून काकांना काय झाले आहे, ते कळवून त्या हॉस्पिटलमध्ये यायला सांगितले.
हेही वाचा – न चुकलेली बस…
काकांना घेऊन मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. सुरुवातीच्या तपासणीमध्ये हलकासा हृदयविकाराचा धक्का येऊन गेल्याचे स्पष्ट झाले. काळजीचे काही कारण नव्हते. डॉक्टरांनी गोळ्या लिहून दिल्या आणि फॅमिली डॉक्टरला लवकरात लवकर दाखवायला सांगितले.
साधारणपणे तासाभराने काकांचा मुलगा मनोज आला. काकांनी मनोजशी माझी ओळख करून दिली. मला जवळ घेत काका भावूक झाले होते. अनोळखी असून देखील मी त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू करण्यासाठी प्रयत्न केले हे बोलून दाखवलं त्यांनी… तितक्यात तिला तिथे बघून मला धक्काच बसला!
“तिला म्हणजे कोणाला?” माझी उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
“सर, तिला म्हणजे आरतीला.”
“काय!” श्रीनिवासच्या खुलशावर मी ताडकन् उडालोच… मग क्षणांत मला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला.
“मग तिथेच तुझी खरी ओळख करून दिली आरतीने?”
हेही वाचा – मातृत्वाची दिवाळी!
“नाही. ते तिघे त्यांच्या घरी गेले आणि मी ऑफिसला पोहोचलो. पुढचे तीन-चार दिवस आमच्यात बिलकुल संवाद नव्हता. आरती ऑफिसला देखील येत नव्हती. पुढच्या आठवड्यात मात्र कॉफी शॉपमध्ये आरतीने मला गुड न्यूज दिली. परिस्थिती आटोक्यात आल्यावर तिने तिच्या बाबांना माझी खरी ओळख सांगितली. आरतीच्या बाबांनी लगोलग आमच्या लग्नाला परवानगी दिली आणि मला घरी यायचं आमंत्रण दिले. आरतीचे बाबा मला म्हणाले की, तू माझं हृदय वाचवलं म्हणून त्याच्या बदल्यात तुझ्या प्रेमाचं हृदय तुला हसतहसत बहाल करूनच तुझ्या ऋणातून मला मुक्ती मिळणार आहे!”
नंतर एक दिवस श्रीनिवास मला आरतीच्या घरी घेऊन गेला. तेव्हा आरतीच्या बाबांनी माझी देखील माफी मागितली आणि श्रीनिवासला लग्नाच्या तयारीला लागायला सांगितले.
अशा तऱ्हेने वडा सांबार आणि वडापाव संसाराच्या प्लेटमध्ये एकाच वेळी सांबार वड्याच्या रुपात दिसणार ह्याचा आनंद मला झाला आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात हे परत एकदा सिद्ध झाले. मी आणि आरतीचे बाबा फक्त निमित्त होतो.
श्रीनिवास लवकरच मला हट्टाने आणि हक्काने चेन्नईला घेऊन जाणार आहे, पुढचा कार्यक्रम ठरवण्यासाठी.
टीप : कोंडी जरी फुटत नव्हती तरी श्रीनिवासला मी सतत धीर देत सांगत होतो – माझं मन मला सांगतंय की, काही तर घडणार आहे, जे तुझं स्वप्न पूर्ण करणार आहे. तेव्हा वाट बघ त्या दिवसाची…


