दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 06 एप्रिल 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 16 चैत्र शके 1948; तिथि : चतुर्थी 14:10; नक्षत्र : अनुराधा 26:56;
- योग : सिद्धी 15:24; करण : कौलव 27:21;
- सूर्य : मीन; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:30; सूर्यास्त : 18:53;
- पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिन विशेष
भारतीय क्रिकेटचे कर्नल दिलीप वेंगसरकर
टीम अवांतर
क्रिकेटविश्वात कर्नल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांचा जन्म 6 एप्रिल 1956 रोजी राजापूर येथे झाला. 1976 साली न्यूझीलंड संघाविरुद्ध त्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटकमध्ये पदार्पण झाले. वेंगसरकर यांनी 116 कसोटी सामन्यांमध्ये 6 हजार 868 धावा आणि 17 शतके, तर 129 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 हजार 508 धावा आणि 1 शतक ठोकले.
1975मध्ये इराणी ट्रॉफीत दिलीप वेंगसरकर यांनी भारतीय शेष संघाविरुद्ध खेळताना मुंबईकडून 110 धावांची शानदार खेळी केली होती आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर वेंगसरकर यांनी 1979च्या वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या कसोटीत लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्यासह 344 धावांची भागीदारी केली होती. हा पराक्रम त्यांनी कलकत्ता येथील इडन गार्डन स्टेडियमवर केला होता आणि दोघांनीही शतके झळकावली होती. लॉर्ड्स स्टेडियमवर वेंगसरकर यांनी सलग 3 शतके नोंदवली. याचबरोबर ते लॉर्ड्सवरती असा विक्रम करणारे एकमेव फलंदाज ठरले. 1986मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्यांना मालिकावीर पुरस्कारही मिळाला होता. भारताचे पहिले शतकवीर लाला अमरनाथ यांनी वेंगसरकर यांना ‘कर्नल’ उपाधी दिली होती. दिलीप वेंगसरकर यांच्या फलंदाजीची शैली ही भारताचे पहिले कर्णधार आणि फटकेबाज फलंदाज कर्नल सी. के. नायडू यांच्यासारखीच आहे, असे अमरनाथ यांना वाटायचे.
हेही वाचा – शिवने रामकडे काय कबुली दिली?
1983 च्या विश्वचषक स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघात वेंगसरकर यांचा समावेश होता. यानंतर 1987 साली झालेल्या विश्वचषकानंतर त्यांनी कपिल देवच्या जागी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. कर्णधार म्हणून त्यांनी आपल्या पहिल्याच मालिकेत 2 शतके ठोकली होती. 1989 मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा दौरा केला होता. या दौऱ्यात भारताच्या झालेल्या पराभवानंतर वेंगसरकर यांना कर्णधारपदावरून हटविण्यात आले. 1992 ला जेव्हा ते आपला शेवटचा सामना खेळले, तेव्हा सुनील गावसकर यांच्या पाठोपाठ कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली होती.
वेंगसरकर यांना अर्जुन पुरस्कार तसेच विस्डनचा क्रिकेट ऑफ द इयर पुरस्कारही मिळाला आहे. तसेच क्रिकेटमधील त्यांच्या योगदानासाठी बीसीसीआयने त्यांना सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने गौरविले आहे. वेंगसरकर यांनी निवृत्तीनंतर मुंबईमध्ये ईएलएफ वेंगसकर अकॅडमी (Elf-Vengsarkar academy) सुरू केली. त्यांनी काही काळ बीसीसीआयचे राष्ट्रीय निवडकर्ता म्हणूनही काम पहिले होते. तसेच 2006 मध्ये मॅच रेफरीही होते.
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस थोड्या धावपळीचा असू शकतो. एखाद्या गोष्टीबद्दल थोडी चिंता वाटू शकते, पण त्यावर जास्त विचार करण्याची गरज नाही. काही लहान आर्थिक योजना आखू शकता. आज घाईचे निर्णय घेणे टाळा. विचारपूर्वक पुढे जाणे चांगले. तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल कुटुंबातील सदस्यांशी बोलल्याने हलके वाटेल.
वृषभ – तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळेल अशी चिन्हे दिसत आहेत, त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक बाबींमध्ये थोडी सावधगिरी बाळगणे उत्तम राहील. एखादे जुने काम पूर्ण झाल्याने दिलासा मिळू शकतो. घरातील वातावरण चांगले असेल. उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांनी निरोगी जीवनशैली स्वीकारणे आवश्यक आहे. योगसाधना केली तर फरक पडेल.
मिथुन – एखाद्या गोष्टीचे थोडे दडपण आल्यासारखे वाटू शकते, पण काळजी करू नका. दिवसाच्या अखेरीस, परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. कोणत्याही वादापासून दूर राहा. त्यामुळे बोलताना जपून बोला, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. गुडघेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुडघ्यांवर फार ताण न देता व्यायाम करा.
कर्क – आज थोडे भावनाप्रधान व्हाल. जुन्या आठवणींमध्ये रमून जाल. कुटुंबासोबत वेळ घालवणे आनंददायी असेल. कामाची प्रगती मंदगतीने होईल, त्यामुळे संयम बाळगणे आवश्यक आहे. स्वतःवर जास्त ताण घेणे टाळा. त्वचा अती कोरडी पडणे किंवा वजनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्या.
सिंह – आज आत्मविश्वास टिकून राहील आणि कामे अधिक चांगल्या प्रकारे हाताळाल. लोक तुमच्या मताचे कौतुक करू शकतात. कामाच्या ठिकाणी प्रगतीची संधी मिळू शकते. मात्र रागाच्या भरात बोलणे टाळा. शांत वृत्ती ठेवणे फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या समस्या भेडसावणार नाहीत, मात्र पुरेशी आणि शांत झोप शरीराला आवश्यक असेल.
कन्या – आज तुमच्यावरील जबाबदाऱ्या थोड्या वाढू शकतात, मात्र तुम्ही त्या व्यवस्थित हाताळू शकाल. तुमच्या मेहनतीचे फळ आता मिळेल अशी चिन्हे दिसत आहेत. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. फक्त जास्त विचार करणे टाळा. ध्यानधारणा किंवा श्वासांशी निगडीत व्यायाम केल्याने मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल.
तुळ – दिवस सामान्य असेल, मात्र हाती असलेल्या वेळेचा पुरेपूर उपयोग करा. आज फक्त आणि फक्त स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कामे पूर्ण होण्याचा वेग अतिशय मंद असेल. वडिलधाऱ्या व्यक्तीचा सल्ला उपयुक्त ठरू शकतो. मांडीचा स्नायू दुखावणे किंवा पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा.
वृश्चिक – आज मनात नवीन कल्पना येऊ शकतात आणि त्या सत्यात साकारण्यासाठी योग्य प्रयत्न करावे लागतील. मित्र किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळू शकतो. मात्र घाईघाईने कोणताही निर्णय घेणे टाळा. कागदपत्रांवर सह्या करण्याआधी ती नीट समजून घ्या. अन्यथा न्यायालयीन कारवाईत अडकाल. तब्येतीची काळजी घ्या, स्वतःसाठी थोडासा वेळ काढा.
धनु – कोणतीही महत्त्वाची कामे पुढे ढकलू नका. दिवस चांगला जाईल आणि तुमचे मन शांत राहील. मात्र, श्रम आणि विश्रांती या दोन्हींसाठी वेळ द्या. एखाद्या जुन्या मित्राशी बोलणे होईल, ज्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बाहेरचे आणि पचायला जड असे अन्न खाणे टाळा.
हेही वाचा – या डोळ्यांची दोन पाखरे…
मकर – आज तुम्ही कामाबाबत गंभीर राहा. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. संयम बाळगणे फायदेशीर ठरू शकते. मनातील कोणताही गोंधळ हळूहळू दूर होऊ शकतो. गुंतवणुकीबाबतचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. डायबेटिस असलेल्या जातकांनी पथ्ये पाळावीत, खाण्यावर ताबा ठेवावा.
कुंभ – आज तुम्हाला व्यवसायात काहीतरी नवीन करून पाहण्याची इच्छा होऊ शकते. त्यादृष्टीने भविष्यातील कामाचेही नियोजन करू शकता. बाहेर फिरायला जाण्याचा बेतही आखू शकता. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. यामुळे काम सोपे होईल. कोणाचेही ऐकून लगेच निर्णय घेऊ नका, शांतपणे विचार करा.नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा यामुळे फायदा मिळेल.
मीन – आज मन शांत असेल आणि तुम्ही स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित करू शकता. एखाद्या गोष्टीबद्दल थोडा गोंधळ निर्माण होईल, पण वेळेनुसार गोष्टी स्पष्ट होत जातील. स्वतःसाठी थोडा वेळ काढणे ही उत्तम कल्पना आहे. तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. बाहेरचे अन्न खाणे टाळा. ब्लड प्रेशर आणि पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.


