सार्थ ज्ञानेश्वरी
अध्याय दहावा
तुझें वाक्य व्यक्ती न येतां देवा । आपुलिया जाणे जाणिवा । तैंसा कहींचि नाहीं हें सद्भावा । भरंवसेनि आलें ॥175॥
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम । भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥15॥
एथ आपुलें वाडपण जैसें । आपणचि जाणिजे आकाशें । कां मी येतुली घनवट ऐसें । पृथ्वीचि जाणे ॥176॥ तैसा आपुलिये सर्वशक्ती । तुज तूंचि जाणूं लक्ष्मीपती । येर वेदादिक मती । मिरवती वायां ॥177॥ हां गा मनातें मागां सांडावें । पवनातें वावीं मवावें । आदिशून्य उतरोनि जावें । केउतें बाहीं ॥178॥ तैसें हें जाणणें आहे । म्हणोनि कोणाही ठाकतें नोहे । आतां तुझें ज्ञान होये । तुजचिजोगें ॥179॥ जी आपणपयातें तूंचि जाणसी । आणिकातें सांगावयाही तूं समर्थ होसी । तरि आतां एक वेळ घाम पुसीं । आर्तीचिये निडळींचा ॥180॥ हें आइकिलें कीं भूतभावना । त्रिभुवनगजपंचानना । सकलदेवदेवतार्चना । जगन्नायका ॥181 ॥ जरी थोरी तुझी पाहत आहों । तरी पासीं उभे ठाकावयाही योग्य नोहों । या शोच्यता जरी विनवूं बिहों । तरी आन उपायो नाहीं ॥182॥ भरले सरिता समुद्र चहूंकडे । परि ते बापियासि कोरडे । कां जैं मेघौनि थेंबुटा पडे । तें पाणी कीं तया ॥183॥ तैसे गुरु जी सर्वत्र आथी । परि कृष्णा आम्हां तूंचि गती । हें असो मजप्रती । विभूती सांगें ॥184॥
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः । याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥16॥
जी तुझिया विभूती आघविया । परि व्यापिती या शक्ती दिव्या जिया । तिया आपुलिया दावाविया । आपण मज ॥185॥
हेही वाचा – Dnyaneshwari : एऱ्हवीं नारदु अखंड जवळां ये, तोही ऐसेंचि वचनें गाये…
अर्थ
देवा तुझा उपदेश प्रकट होण्याच्या अगोदरच आपल्या शहाणपणाने तुझे ज्ञान करून घेतो, असे कोणी म्हणेल तर, असा जीवबुद्धीच्या सामर्थ्यावर समजला जाण्याजोगा तू केव्हाच नाहीस, हे (माझ्या मनाला) आता खात्रीपूर्वक पटले. ॥175॥
हे पुरुषोत्तमा, भूतभावना, भूतनाथा, देवाधिदेवा, जगन्नायका, तू स्वत:च स्वत:ला यथार्थ स्वरुपाने जाणतोस. ॥15॥
ज्याप्रमाणे आपला विस्तार किती आहे, हे आकाशाचे आकाशालाच माहीत अथवा मी इतकी भरीव आहे, हे प्रमाण पृथ्वीचे पृथ्वीलाच माहीत, ॥176॥ त्याप्रमाणे आपल्या सर्व सामर्थ्याने, हे लक्ष्मीपती देवा, तुला तूच जाणणारा आहेस. बाकी वेदादिक जे इतर आहेत, त्यांच्या मति (आम्ही देवाच्या स्वरुपाला जाणतो अशी) व्यर्थ बढाई मारतात. ॥177॥ अहो, सर्वात चपळ असलेल्या मनालाही (शर्यतीत) कसे मागे टाकता येईल? वारा हाताने कसा मोजता येईल? मायेतून आपल्या बाहूंच्या जोरावर कसे पार पडता येईल? ॥178॥ (हे जसे असंभाव्य) त्याप्रमाणे तुझे ज्ञान करून घेण्याचीही गोष्ट असंभवनीय आहे आणि म्हणूनच तुझे ज्ञान कोणालाही होत नाही. एवढ्याकरिता तुझ्या स्वरूपाचे ज्ञान करून घेण्याचे काम तुलाच फक्त शक्य आहे. ॥179॥ अरे देवा, तू आपल्या स्वरुपाला तूच जाणतोस, आणि ते ज्ञान दुसर्यास सांगण्यास देखील तूच समर्थ आहेस. तर आता एक केवळ माझ्या इच्छारूपी कपाळावरचा घाम पुसून टाक. ॥180॥ हे प्राणिमात्राची उत्पत्ती करणार्या, त्रिभुवनरूपी हत्तीचा नाश करणार्या सिंहा, सर्व देव आणि देवता यांना पूज्य असणार्या, हे जगाच्या स्वामी, श्रीकृष्णा, हे ऐकलेस का? ॥181॥ जर तुझ्या स्वरूपाची थोरवी पाहू गेलो, तर आम्ही तुझ्याजवळ उभे रहाण्याला देखील योग्य नाही, अशी शोचनीय स्थिती आहे. म्हणून (जर) आम्ही तुला विनंती करण्यास भ्यालो, तर तुझे स्वरूप जाणण्यास दुसरा उपाय उरला नाही. ॥182॥ जिकडे तिकडे सर्व बाजूंना नद्या आणि समुद्र तुडुंब भरलेले असले, तरी चातकाला ते कोरडे ठणठणीत असल्यासारखे आहेत. कारण, ज्या वेळेला खास मेघातून थेंब पडतील, त्यावेळेलाच त्याला पाणी मिळणार. ॥183॥ त्याप्रमाणे देवा, गुरु घरोघर आहेत, परंतु कृष्णा, आम्हाला तूच एक आश्रयाचे ठिकाण आहेस. हे राहू दे! मला विभूती सांग. ॥184॥
म्हणून ज्या विभूतींनी या सर्व लोकांना व्यापून तू आहेस, अशा आपल्या दिव्य विभूती पूर्णत्वाने मला सांगण्यास तूच योग्य आहेस. ॥16॥
महाराज, सर्व विभूती आपल्याच आहेत; परंतु दिव्य शक्तीने व्याप्त असलेल्या अशा ज्या आपल्या विभूती आहेत, त्या आपण मला दाखवाव्या. ॥185॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : प्रभु आघवेनि येणें जन्में, जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें…


