संगीता भिडे
‘संस्कार’ ही संकल्पना प्रथम स्पष्ट होणे आवश्यक आहे. ‘सम्यक करोति इति संस्कारः।’
कोणतीही कृती चांगली करणे म्हणजे संस्कार. तर दुसरा अर्थ, प्रत्येक धर्मानुसार जन्मापासून मृत्यूपर्यंत जे अनेक विधी केले जातात, त्यातील प्रत्येक विधी म्हणजे एक संस्कार. उदा. नामकरण, उपनयन, विवाहबंधन, अंत्यसंस्कार इत्यादी. हे सर्व धर्मसंस्कार असावेत की, नसावेत, हे मला इथे अजिबात अभिप्रेत नाही. माझ्यापुरतं बोलायचं तर, मी स्वतः पोथीनिष्ठ धर्मसंस्कार अजिबात मानत नाही. कारण, धमनि प्रश्न सुटले आहेत, असं आजवरच्या इतिहासात तरी घडलेलं आढळत नाही. तसं घडलं असतं तर, दोन भिन्न धर्मात युद्ध पेटलं नसतं, एकाच धर्माच्या छत्राखाली राहणारी, एकाच कुळात जन्मलेली माणसं एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभी राहिली नसती आणि एकमेकांचे गळे घोटायला तयार झाली नसती आणि महाभारत घडलंच नसतं. धर्मसंस्कार आम्हाला नेमकं काय देतात? जो धर्म, संस्कार आम्हाला जगू देत नाही आणि दुसऱ्याला जगण्याची संधी देत नाही, त्याला ‘संस्कार’ म्हणायचं का? अन्यथा, संपूर्ण मानव जातीचे हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, शीख इत्यादी इत्यादी विविध कप्पे, त्यांचे पुन्हा उपकप्पे निर्माण झालेच नसते.
जी प्रवृत्ती माणसाला माणूस म्हणून जगू देते, तो खरा संस्कार! संस्कारालाही दोन बाजू संभवतात चांगली आणि वाईट. जो संस्कार कुटुंब, समाज, देश इत्यादींसाठी हितकारक कृत्याला प्रवृत्त करतो तो सुसंस्कार तर, जो अहितकारक कृत्याला प्रवृत्त करतो तो कुसंस्कार.
जे संस्कार दु:खितांचे अश्रू पुसायला शिकवतात, परमत-सहिष्णुता आणि परधर्म-सहिष्णुता शिकवतात, तेच खरे संस्कार, तीच खरी संस्कृती आणि तोच खरा मानवता धर्म!
प्रश्न येतो तो हे संस्कार शिकवायचे कोणी? राष्ट्राने, समाजाने, कुटुंबाने, शिक्षण संस्थांनी की प्रत्येक व्यक्तीने? अर्थात् ही जबाबदारी यातील प्रत्येक घटकाची आहे. जन्माला घालणारी स्त्री या नात्याने प्रत्येक मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुर्दैवाने, आता कुटुंब संस्था विस्कळीत झाली आहे. ‘हम दो हमारा / हमारी सिर्फ एक’च्या जमान्यात कुटुंबामार्फत नकळत होणाऱ्या संस्कारांची संख्या आता अस्तंगत झाल्यागत झाली आहे. तरीही, जो काय सहवास आई-बाबांचा मुलाला घडतो, तो जर सकारात्मक असेल तर, मूल सुसंस्कारी घडू शकते. ही जबाबदारी एकट्या स्त्रीची नाही तर, पुरुषाचीही आहे. नाहीतर, घडलेलं पोर बापाचं आणि बिघडलेलं पोर आईचं अशी विभागणी सहजपणे केली जाते.
हेही वाचा – संस्कार आणि स्त्रिया
शिक्षणाने सुसंस्कृतता येते का? हाही एक चिंतेचाच विषय आहे. अन्यथा, सुशिक्षित कुटुंबात सुनेला जाळणे, हुंडाबळी घेणे, एकमेकांच्या जीवावर उठणे यासारख्या घटना राजरोसपणे घडल्याच नसत्या.
सध्या तर समाजकारण, राजकारण इतकं रसातळाला गेलं आहे की, वैचारिक विरोध झाला की, त्या व्यक्तीला जीवे मारणे एवढाच एक उपाय उरला आहे का, असं वाटू लागलं आहे. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरेंद्र दाभोलकर इत्यादींच्या हत्यांची ज्याप्रकारे चर्चा होते, ती पाहता हा कोणत्या संस्कारांचा परिणाम? असा प्रश्न मला तरी पडतो. एखादी विचारप्रणाली न पटणं किंवा अगदी ती व्यक्ती न रुचणं, हे अगदी स्वाभाविक आहे. पण त्यासाठी त्या व्यक्तीला संपवून टाकणं, हे कोणत्या संस्कारात बसतं? हे धर्ममान्य आहे? मानवता धर्माला अर्थात सुसंस्कारांना कलंक आहे. आपण आपल्या पाल्यांना चूक-बरोबर, चांगलं-वाईट, सुष्ट-दुष्ट हा विचार करायला शिकवणं, मला तरी नितांत आवश्यक वाटतं.
हेही वाचा – पोटभर आशीर्वाद
हा सगळा उहापोह केल्यावर, “लवकर निजे लवकर उठे, त्यासी आरोग्य ज्ञानसंपदा मिळे,” “वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळावी”, “नेहमी खरे बोलावे, खोटे कधी बोलू नये”, “चोरी कधी करू नये”, “दररोज देवाची स्तोत्रे म्हणावीत, प्रार्थना करावी” एवढ्या पुरतेच संस्कार अभिप्रेत नाहीत. बालपणापासूनच परमतसहिष्णुता, परधर्मसहिष्णुता, आत्मनिर्भरता, सदसद्विवेकबुद्धी, मानसिक सबलता, मानवता इत्यादी बाबींचे संस्कार आधी व्हायला हवेत. या संस्कारांचा वारसा जर आम्ही आमच्या पाल्यांना दिला तर आणि तरच उत्तम नागरिक आपले पाल्य होऊ शकतील आणि मग कुटुंब, समाज आणि पर्यायाने राष्ट्र एकसंध राहू शकतील.
जाता जाता एकच मुद्दा – सध्या अमेरिका-इस्रायल-इराण यांच्यात जे युद्ध सुरू आहे आणि जे जागतिक युद्धापर्यंत पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे, त्या या घटनेत कुठेतरी मानवता संस्कारांचा स्पर्श जाणवतो का? संस्कार आणि धर्म या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे पटतंय ना?
इति अलम्!


