यश:श्री
खूप दिवसांनी लिहायला बसले आहे. जर लिहायचेच झाले, तर काय लिहायचे? अवतीभोवती तसेच विषय भरपूर असतात, पण प्रत्येक विषय हा लिहिण्यासाठी ‘चार्ज’ करणारा नसतो. काही वेळेस एखादी अशी लहानशी घटना असते, पण ती दिवसभर नव्हे तर, काही दिवस तरी डोक्यात पिंगा घालत राहते. त्याच्या अनुषंगाने येणारे विचार लेखाच्या माध्यमातून मांडायचा प्रयत्न मी करते. जसे सुचत जाते, तसे लिहिते. ते अभ्यासपूर्ण किती होते, वैचारिक किती होते, गंभीर विषयांना हात घालणारे किती होते, हे माहीत नाही. एखाद्या गोष्टीचे किंवा घटनेचे विश्लेषण करणारी किंवा त्यावर आपले ‘वैचारिक’ मत मांडणारी मी कुणी फार मोठी लेखिका नाही. सर्वसामान्यांप्रमाणे मनात येणाऱे विचार मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असतो. थोर विदुषी दुर्गाबाई भागवत यांची एकदा भेट झाली होती. त्यांनी त्यावेळी रोज दोन-चार ओळी लिहायला सांगितल्या होत्या. त्यावेळी धीर झाला नाही, पण आता लिहायला सुरुवात केली आहे.
लिखाणाची सुरुवात समाज माध्यम अर्थात सोशल मीडियापासून झाली. सोशल मीडिया नसता तर, काय? कदाचित, मनातले विचार कागदावरच उतरवले असते! हा मनात विचार आला आणि माझा प्रवास ‘जर’ आणि ‘तर’च्या दिशेने सुरू झाला. हे जे ‘जर’ आणि ‘तर’ आहे ना, हे फार महत्त्वाचे आहेत. दैनंदिन जीवनात हे ‘जर’ आणि ‘तर’ अनेकदा नकळतपणे आपल्या समोर येत असतात. हे कधी आनंद देऊन जातात, तर कधी पश्चातापची भावना निर्माण करतात. पश्चातापच पदरी आल्यावर, त्यापोटी उदासीनता, राग, दु:ख आदी भावनांचा जन्म होतो. मुख्यत: हळहळच जास्त असते. पण, एखादा निर्णय घेतलाच नाही आणि अनुकूल असे घडले नाही तर, ‘बरे झाले, वाचलो,’ ही प्रतिक्रिया उमटते. पण काहीतरी हुकले असेल तर, मनात चुटपूट लागून राहते.
वस्तुत: ‘जर’ आणि ‘तर’चा हा कल्पनाविलास शाळेपासूनच आपल्या जीवनात येतो. मराठी आणि हिंदी भाषेच्या प्रश्नपत्रिकेत आपल्याला तो दिसतो. ‘जर मी पंतप्रधान झालो तर…’, ‘जर मी कपाट झालो तर…’ किंवा ‘यदि मैं सूरज होता…’, साधारणपणे पाचवीपासूनच ही सुरुवात होते. त्यावेळी आपल्या जीवनाशी त्याचा मार्कांपुरताच संबंध. त्यामुळे त्याबद्दल राग नाही की लोभ नाही! फक्त ज्याची तयारी करून गेलो, त्याऐवजी दुसराच आला तर मग टेन्शन.
हेही वाचा – राजवैभवी मोर… तख्त-ए-ताऊस
एखादा निर्णय ‘टर्निंग पॉइंट’ ठरतो. ही नाण्याची दुसरी बाजू. 1982 साली आम्ही मुंबईहून पुण्याला राहायला गेलो; मग मी मुंबई सोडलीच नसती तर…? पेशा, व्यवसाय, नोकरी काय असती? कौटुंबिक, आर्थिक अन् सामाजिक जीवनमान काय असते? काय मानायचे आनंद की पश्चाताप? नाही माहीत. अशा अनेक घटना मनात प्रश्नावली निर्माण करून जातात, पण त्याला उत्तरेच नसतात.
प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे ‘टर्निंग पॉइंट’ हे ‘जर’ आणि ‘तर’च्या साच्यात न बसवलेलेच उत्तम. शेवटी, ‘हे बघ, जे व्हायचे ते होतेच, त्यामुळे फार विचार करायचा नाही,’ असे आपणच आपल्याला समजावायचे. हे कसे माहीत आहे, सिनेमासारखे आहे. ‘जो जीता वह सिकंदर’ बघायला बसतो, शेवटच्या क्षणी आमीर खान सायकल रेस जिंकतो. तुम्ही हा सिनेमा पुन्हा पुन्हा पाहा, शेवट हाच आहे. असे कधी होत नाही की, एखाद्या वेळी तो बिचारा दीपक तिजोरी जिंकला आहे. जे शूट झाले आहे, तेच समोर दिसते. आयुष्य देखील असेच आखलेले आहे, असे म्हणत स्वत:लाच चुचकारायचे. पण ‘जे व्हायचे, ते होतेच’ ही फुटपट्टी सर्वकडे लावता येत नाही ना! एखाद्या गुन्हेगाराबद्दल किंवा गुन्ह्याबद्दल अशी भूमिका घेता येईल का?
मुळात हे ‘टर्निंग पॉइंट’ म्हणजे आयुष्यात समोर येणाऱ्या संधी. बहुतांश त्या सुवर्ण संधीच असतात. आता या सुवर्ण संधी म्हणजे त्या कायम आपल्याला टाटा, बिर्ला बनवणाऱ्याच पाहिजेत, असे नव्हे. तर, त्या आयुष्यातील एक संघर्ष संपवणाऱ्या, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलवणाऱ्या किंवा उत्साहवर्धक टॉनिक म्हणून असतात. म्हणूनच, आयुष्याच्या बाबतीत ‘जर’ आणि ‘तर’च्या भानगडीत न पडता, जे समोर येईल ते, हसतमुखाने स्वीकारायचे. ‘हॅप्पी गो लकी’, हेच तत्व आयुष्याचे असले पाहिजे. हे मान्य की, कितीही नाही म्हटले तरी आयुष्यात काही वेळेस नैराश्याचा सामना करावा लागतो. पण मनात आशेचा किरण जागता ठेवला की, चुकीचे पाऊल उचलले जात नाही.
येथे मला रणजित देसाई यांचे एक वाक्य वाचलेले आठवते. बहुधा ‘राधेय’ पुस्तकातील आहे – ‘कोणतीही गोष्ट अचानक घडत नाही. त्याच्या मागची कारणे आपल्याला त्यावेळी माहीत नसतात, एवढेच.’
हेही वाचा – मूर्तीकला असो की नाणी… मोरालाच प्राधान्य