Tuesday, July 1, 2025
Homeवास्तू आणि वेधअश्विन, भरणी, कृत्तिका... नक्षत्रांच्या पुराणकथा

अश्विन, भरणी, कृत्तिका… नक्षत्रांच्या पुराणकथा

सुहास गोखले

(निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष)


मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे मी नक्षत्र कथा लिहीत आहे. प्रत्येक वेळी तीन अशा 27 नक्षत्रांच्या कथा आहेत. यामध्ये थोडा तुटकपणा वाटण्याची शक्यता आहे कारण मी अनुक्रमाने नक्षत्रांच्या कथा सांगणार आहे.

  1. अश्विन : आकाशात तीन ठळक तारकांचा समूह मिळून हे नक्षत्र तयार होते. आपणास या तारकांचा विशालकोन तयार झालेला आढळतो. या तीन तारकांशिवाय आणखी काही तारे या नक्षत्रात आढळतात. परंतु ते सारेच मंदतेज तारे आहेत. या नक्षत्रासंबंधीची एक सुंदर वेदकालीन कथा आहे. मधुविद्या (मृताला जीवदान देणारी विद्या) दधिची ऋषींना येत होती. अश्विनीकुमार हे देवतांचे वैद्य. तर, अश्विनीकुमार यांना दधिची यांच्याकडून ही विद्या शिकावयाची होती. पण इंद्राला ते नको होते. दधिची यांना इंद्राने, अश्विनीला ही विद्या शिकविल्यास तुमचा शिरच्छेद करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे अश्विनीकुमार यांनी अशी योजना आखली की, दधिची यांनी आधीच आपला शिरच्छेद करावा आणि त्यास घोड्याचे डोके लावून घ्यावे. म्हणजे इंद्राने दधिची यांचा शिरच्छेद केला तर पुन्हा त्यांना त्यांचे डोके लावण्यात येईल. त्याप्रमाणे घोड्याचे तोंड बसवून त्या हयवदन दधिची यांनी मधुविद्या अश्विनीकुमारांना शिकवली. (घोड्याचे तोंड लावून मिळालेल्या ज्ञानावरून पुढे Straight from horse’s mouth हा शब्दप्रयोग आला असावा का?) ठरल्याप्रमाणे दधिचींचे मूळ डोके त्यांना परत लावण्यात आले. बहुदा अश्विनीकुमार या नावावरून पुढे या नक्षत्राचे नाव अश्विनी ठेवण्यात आले असावे किंवा अश्विनी नक्षत्रावरून अश्विनीकुमार हे नाव.
  2. भरणी : अश्विनी नक्षत्रांच्या तीन चांदण्यांच्या विशालकोनापुढेच आपणास आणखी एक तीन चांदण्यांचा त्रिकोण आढळतो. तेच भरणी नक्षत्र. भरणी नक्षत्र अशुभ असल्याचे भारतात प्राचीन काळापासून मानले जाते. भरणीने यमाशी नाते जोडले आहे. (यामुळेच बहुदा भरणीला अशुभ मानले असावे.) भरणी नक्षत्राच्या तीन ताऱ्यांप्रमाणे तीन राण्या असल्याने दशरथाला अकाली मृत्यू आला.
  3. कृत्तिका : हिवाळ्यामध्ये सूर्यास्ताच्या वेळेस कृत्तिका नक्षत्र आपणास पूर्वेकडे उगवताना दिसेल. कृत्तिकांना ओळखणे फार सोपे आहे. कारण आपणास या सप्तर्षीच्याच आकारात सहा तारे दिसतात. फार पूर्वीपासून कृत्तिकांना निरनिराळी नावे देण्यात आली आहेत. वैदिक ऋषी यांना सप्तमातृका किंवा सप्त बहिणी म्हणत. कृत्तिकांचा उल्लेख सात तारका म्हणून जरी केला असला तरी नीट पाहिल्यास आपणास त्या ठिकाणी सहाच तारका पाहावयास मिळतील. बहुतेक नक्षत्र संग्रहात कृत्तिकांचा उल्लेख सात तारकाचे नक्षत्र म्हणून केला जातो. कृत्तिकांना इंग्रजीमध्ये प्लिडस असे म्हणतात. संस्कृत नाव ‘प्लिहादीही’ या शब्दाचा तो अपभ्रंश असावा. या सहा तारकांपैकी जी सर्वात तेजस्वी तारका दिसते तिचे नाव अंबा. ही आपल्या सूर्याच्या कित्येक पट तेजस्वी आणि आकाराने मोठी आहे. बाकी तारकांची नावे दुला, नितन्ती, अभ्रयंती, मेघयंती आणि वर्षयंती आहेत. कृत्तिकांमध्ये सात तारका असल्याचे आणखी एक कारण म्हणजे त्या सातव्या तारकेचे नाव चुपुणिका असल्याचे काही पुराणसाहित्यांमध्ये सापडते. कृत्तिका या सहा ऋषीपत्नी, सप्तर्षीमधील सहा ऋषींच्या पत्नी आहेत. कृत्तिका नक्षत्राच्या संदर्भात आणखी एक पुराणकथा आढळते ती म्हणजे, एका कथेनुसार महादेवाचा पुत्र षडाननाचे मातृत्व कृत्तिकांकडे आहे. शंकरामुळे अग्नीस गर्भ राहिला. अग्नीस लाज वाटून त्याने एका सरोवरात गर्भाचा त्याग केला. त्या सरोवरातील सहा बहिणींनी हा गर्भ धारण केला आणि एका पुत्राला जन्म दिला. या अद्भुत जन्मामुळे षडाननास सहा मुखे (तोंड) निर्माण झाली. कृत्तिकांमुळे षडाननाला कृत्तिकेय असेही नाव पडले.

(क्रमश:)

हेही वाचा – नक्षत्रांच्या पुराणकथा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!