दर्शन कुलकर्णी
आज, भारतीय सौर : 18 ज्येष्ठ शके 1947
अर्थात,
दिनांक : 08 जून 2025
वार : रविवार
तिथि : द्वादशी 07:14
नक्षत्र : स्वाती 12:41
योग : परीघ 12:17
करण : कौलव 20:18
सूर्य : वृषभ
चंद्र : तुला
सूर्योदय : 06:00
सूर्यास्त : 19:14
पक्ष : शुक्ल
मास : ज्येष्ठ
ऋतू : ग्रीष्म
सूर्य अयन : उत्तरायण
संवत्सर : विश्वावसू
शालिवाहन शक : 1947
विक्रम संवत : 2081
युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
समीक्षक प्रा. दिनकर केशव बेडेकर
प्रसिद्ध मराठी विचारवंत आणि समीक्षक प्रा. दिनकर केशव बेडेकर यांचा जन्म 8 जून 1910 रोजी सातारा येथे झाला. मराठी विश्वकोश निर्मितीत बेडेकर यांचे मोठे योगदान आहे. प्रा. बेडेकर यांनी समीक्षणात्मक लेखन तर केलेच, पण त्याचबरोबर राजकीय, धर्मचिंतनपर विषयांवर तसेच सौंदर्यशास्त्रावरही लेखन केले आहे. शांतिनिकेतनमध्ये चित्रकलेचे शिक्षण घेतले तर, बनारस हिंदू विश्वविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्र-तत्त्वज्ञानाची पदवी मिळविली. बेडेकर यांनी ‘अर्थविज्ञान’ या त्रैमासिकाचे संपादन केले आहे. ‘समाजचिंतन’ आणि ‘विचारयात्रा’ या ग्रंथांतून त्यांच्या सामाजिक विचारांचे दर्शन घडते. स्वातंत्र्योत्तर काळातील आघाडीचे तत्त्वचिंतक समीक्षक असणाऱ्या बेडेकरांची ग्रंथसंपदाही मोठी आहे. निर्मिती आणि समीक्षा, साहित्यविचार, केशवसुतांची काव्यदृष्टी, आधुनिक मराठी काव्य-उदय-विकास आणि भवितव्य, हे त्यांचे गाजलेले ग्रंथ आहेत. मुळशी सत्याग्रहात त्यांचा सक्रिय सहभाग होता. 2 मे 1973 रोजी त्यांचे निधन झाले.
जागतिक महासागर दिन
दरवर्षी 8 जून रोजी जागतिक महासागर दिन (World Oceans Day) साजर केला जातो. महासागराचे संरक्षण तसेच नैसर्गिकदृष्ट्या असलेले महत्त्व जपले जावे, हा उद्देश या मागे आहे. प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्त्वाचे आहे. तथापि, विविध कारणांमुळे समुद्र दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सांडपाणी, औद्योगिक प्रदूषके, मुदत संपलेली वा घातक रसायने, प्लास्टिकच्या बाटल्या नि पिशव्या समुद्रात टाकल्या जातात. 1992मध्ये ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिखर परिषदेत कॅनडाने यासंदर्भात प्रस्ताव मांडला. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने 2008मध्ये मान्यता दिली. तेव्हापासून ‘द ओशन प्रोजेक्ट’ या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने जागतिक महासागर दिन साजरा केला जात आहे.