उमा सुहास काळे
आजकाल नात्यांमधील ओढ कमी होत चालली असल्याचे प्रकर्षाने जाणवते. उलट, अनेक नात्यांमध्ये एक विचित्र मालकीची भावना दिसून येते. “तो माझाच आहे”, “तो, माझ्या शब्दाच्या बाहेर नाही”, “मी त्यांच्यासाठी खूप केलं आहे, म्हणून त्यांनी माझे ऐकलच पाहिजे!” — अशी वाक्यं ऐकायला मिळतात. पण हे खरंच प्रेम आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो.
माणसं आपली आहेत, याचा अर्थ असा नाही की त्यांनी प्रत्येकवेळी आपल्याच अपेक्षा पूर्ण कराव्यात. प्रेम हे मोकळं असावं लागतं. स्वतःच्या विचारांनी, स्वतःच्या अस्तित्वाने जगू देणारे असते, हे आपण सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. दुसऱ्यावर प्रेम करणं म्हणजे त्याला आपल्या ताब्यात ठेवणं नव्हे, तर त्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणं.
हेही वाचा – प्रतिभावान शायर मजरूह सुलतानपुरी
आपण कोणासाठी खूप काही केलं असेल, त्याचं मोल आपण त्याच्या स्वातंत्र्याशी गाठ मारून मागू शकतो का? ते मोल असतंच प्रेमाचं, जे स्वतःहून दिलं जातं. त्यावर मालकी नसते, अपेक्षा नसतात, हे ध्यानी घेण्याची नितांत आवश्यकता आहे. एखादी व्यक्ती आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवते, आपल्या सल्ल्याचा मान ठेवते, पण त्याचा अर्थ असा नाही की, त्या व्यक्तीने आपल्या प्रत्येक शब्द फुलाप्रमाणे झेलावा. त्या व्यक्तीला सुद्धा विचार आहेत, भावना आहेत आणि त्याही तितक्याच मोलाच्या आहेत, हे भान ठेवणे गरजेचे असते.
हेही वाचा – आपणच आपल्याशी शर्यत करावी…
स्वतःच्या नात्यांना जर मालकीपेक्षा समजुतीचा हात दिला, तर नातं फुलतं, वाढतं आणि निस्सीम प्रेमाने भरतं. कोणी तुमचं ऐकत नसेल तर, तक्रार नका करू… त्याच्या विचारांचाही आदर करा. एखादी व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवते, त्याचे उत्तर त्याच्या गुलामीने नाही, तर मुक्तीने द्या.
हेही वाचा – मुलींमधला आवडता आणि नैसर्गिक ट्रेंड… पाऊट
प्रेमात बंधन नसावं, स्वातंत्र्य असावं. प्रेमात आदेश नसावा, समजूत असावी आणि प्रेमात “माझं” नसावं, “आपलं” असावं.
कारण शेवटी —
“माणूस मालकीसाठी नव्हे, माणुसकीसाठी जगतो!”



1 Comment
Pingback: सदाफुली... आयुष्यातील सुख - Avaantar