Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    March 19, 2026

    Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे…

    March 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 मार्च 2026

    March 18, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, March 19
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य
    ललित

    आयुष्यातले सुगंध… सुगंधी आयुष्य

    Team AvaantarBy Team AvaantarApril 20, 20251 Comment4 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखन, मराठीआवृत्ती, मराठीसाहित्य, मराठीलेखक, मराठीमनोरंजन, मराठीवेबसाइट, सुगंध, पुरणपोळी, धूप, अगरबत्ती, पहिला_पाऊस
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आराधना जोशी

    आपल्या आठवणींचं एक मानसशास्त्र असतं. एखादी आठवण ही रंग, गंध, चव, स्थळ, व्यक्ती याच्याशी निगडीत असतेच असते. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. दुपारी काही कामानिमित्त घराबाहेर पडावं लागलं तर, जीव नकोसा होतो. मात्र याच तळपत्या उन्हात काल अचानक मोगऱ्याचा गंध आला आणि जीव सुखावून गेला, उन्हाच्या झळा जरा कमी झाल्यासारख्या वाटल्या आणि अनेक आठवणींना उजाळा देऊन गेला. होलिकोत्सवाच्या निमित्तानं अनेक घरांमध्ये पुरणपोळ्यांचा बेत आखला जातो. पुरण शिजवण्यापासून ते वाटण्यापर्यंत आणि त्यात वेलची, जायफळ पावडर, केशर, गूळ यांचा जो काही वास घरामध्ये दरवळतो त्याच्याशीही अनेकांच्या आठवणी निगडीत असतील. याच उन्हाळ्यात घरी आणल्या जाणाऱ्या कैऱ्या, आंबे यांच्या वासाशी सुद्धा आपल्या आठवणी निगडीत आहेत. तशाच आठवणी असतील त्या दिवाळीशी निगडीत. साफसफाईच्या कामापेक्षाही घरांमधून येणाऱ्या फराळाच्या वासांनी दिवाळी जवळ आल्याची खात्री पटते. दिवाळीच्या पहाटे सुवासिक उटण्याने केलेली आंघोळ तो दिवस आणखी सुगंधी बनवते.

    वास किंवा गंधाची आणि माझी पहिली ओळख झाली ती माझ्या मामामुळे. त्याला अत्तराचा फाया कानात ठेवण्याची प्रचंड आवड होती. दर पंधरा दिवसांनी या फायाचा गंध बदलायचा. मामाचं एखादं काम करून दिलं की, तो खूश होऊन फाया आमच्या हातावर चोळायचा आणि दुसऱ्या दिवशी अंघोळ होईपर्यंत त्या अत्तराचा वास आमच्याभोवती दरवळ रहायचा. त्यानंतर धाकट्या भावंडांच्या निमित्तानं घरामध्ये शी-शूचे कपडे, लाळेरं, शेक शेगडी यांचे वास दरवळायला लागले. त्यांचा एक वेगळा वास डोक्यात इतका घट्ट बसला आहे की, आजही रस्त्यात कुठेही शेक शेगडीचा वास आल्यावर जवळपास बाळंतीणीचं घर असल्याची वर्दी मिळते. बाळाला जवळ घेतल्यानंतरही त्याच्या अंगाला येणारा साबण, पावडर, वेखंड यांचा संमिश्र वास, जावळ हुंगल्यानंतर येणारा विशिष्ट वास परत एकदा आपल्या बालपणाकडे घेऊन जाणारा असतो.

    प्रत्येक ऋतूनुसारही आपल्या आजूबाजूला असणारे वास महत्त्वाचे असतात. म्हणजे पावसाला सुरुवात होताच, मातीचा येणारा दरवळ जितका सुखावणारा असतो तितकाच कांदा भजी, बटाटे वडा तळल्याचा आणि त्याच्यासोबत आलं घातलेला वाफाळणारा चहा आठवतो. कुठेतरी मक्याचं कणीस भाजल्याचा वास आला की, तोंडाला पाणी सुटतं. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात नानाविध प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात. मंडईत नुसती एक चक्कर मारली तरी तिथे असणाऱ्या वासानं आणि रंगसंगतीनं मन सुखावून जातं. हिरव्या रंगाच्या किती शेड दिसतात! उन्हाळ्यात तर, पांढऱ्या रंगाच्या सुवासिक फुलांची नुसती लयलूट असते. मोगरा, चमेली, जाई, जुई, सायली, रातराणी यांच्या गंधानं परिसर आणि मन तृप्त होऊन जातं. त्यातच भर पडते ती आंब्याच्या मोहोराच्या वासाची. मला तरी उन्हाळा म्हटलं की, काळ्या रंगाचा मातीचा माठ, त्याला बाहेरून गुंडाळून ठेवलेला एक ओला पांढरा पंचा, पाण्यात वाळा घालून वासित केलेलं थंडगार पाणी, घराच्या खिडक्यांना लावलेले वाळ्याचे पडदे, दुपारच्या वेळी त्यावर पाणी मारून नैसर्गिक थंडावा निर्माण करणं, उन्हं कमी झाल्यावर तापलेल्या जमिनीवर पाणी मारल्यावर येणारा मातीचा वास अशा अनेक गंधांशी निगडीत आठवणी जाग्या होतात.

    हेही वाचा – …असेही लाँग डिस्टन्स रिलेशनशिप

    आजोळ स्टेशनजवळ असल्यामुळे पूर्वी दगडी कोळशावर चालणाऱ्या गाड्यांची ये-जा कायम न्याहाळायला मिळायची. शिवाय पाणी तापवण्यासाठी गावाकडे तांब्याच्या बंबांचा उपयोग होत असे. त्यातही काहीवेळा कोळसा वापरला जाई. त्यामुळे आजही कोळशाचा वास आला की, मन आपोआपच गाड्या आणि बंबाच्या आठवणींमध्ये रमतं. शाळा विलेपार्ले येथे असल्याने जवळच असणाऱ्या पार्ले बिस्कीट फॅक्टरीमधून बिस्कीटं भाजण्याचा जो वास यायचा तो विसरता न येण्यासारखाच आहे. याशिवाय शाळेजवळच असणाऱ्या चणे, दाणे विकणाऱ्या दुकानाच्यामागे असलेल्या मोठमोठ्या कढयांमध्ये चणे-दाणे भाजण्याचा किंवा लाह्या फुटल्यावर जो वास यायचा, त्यामुळे भूक चाळवली जात असे.

    भारतात सुवासाचं जितकं वैविध्य आहे, तितकं बाकी जगात कुठेच नाही. परदेशातली फुलं रंगाने कितीही सरस असली तरी ती सुवासिक नसतात. म्हणूनच परफ्यूमचा शोध लागला असावा, असं वाटतं. शिवाय, हल्ली गंध चिकित्सा म्हणजे ‘अरोमा थेरपी’चा बोलबाला आहे. घर, कार्यालय अशा ठिकाणी वातावरण प्रसन्न रहावं म्हणून अरोमा कॅन्डल्स किंवा रूम फ्रेशनर वापरले जातात. यातही असणारा सुगंध उग्र नसून सौम्य स्वरूपाचा असतो जो, तिथे वावरणाऱ्या व्यक्तींना फ्रेश ठेवण्यास मदत करत असतो. देवासमोर लावायची उदबत्ती देखील हल्ली किती विविध सुवासांमध्ये उपलब्ध आहे. शिवाय, घरात फिरवला जाणारा धूप, लावला जाणारा कापूर यांचे सुगंधही मनाला सकारात्मकता देत असतात.

    स्वयंपाकघरात फोडणीत जिन्नस टाकल्यानंतर जो दरवळ सगळ्या घरात पसरतो, तोच पदार्थ कोणता आहे आणि त्याची चव कशी असणार आहे, याची वर्दी देऊन जातो. भूक खवळायला हा दरवळ पुरेसा असतो. अनेकदा बाहेरून घरी आल्यावर दरवाजातच ‘आज जेवणाचा भन्नाट बेत’ असल्याचा सुगावा लागतो, तो पदार्थाच्या याच दरवळामुळे. म्हणूनच तर भारतीय मसाले आणि त्यापासून तयार होणारे पदार्थ आज जागतिक कुझीनमध्ये महत्त्वाचं स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. एक चांगला शेफ केवळ वासावरून एखाद्या पदार्थाची चव कशी असेल किंवा तो पदार्थ बरोबर झाला आहे की, बिघडला आहे हे सहज सांगू शकतो.

    हेही वाचा – लेखिका कविता महाजन यांची अविस्मरणीय भेट

    हल्ली रसरसलेला कोळसा एका भांड्यात ठेवून मग ते भांडं तयार पदार्थांच्या बरोबर मध्यभागी ठेवायचा आणि वरून चमचाभर तूप त्या कोळशावर ओतायचं. लगेच वरून दुसऱ्या एखाद्या घट्ट झाकणाने ते भांडं काहीवेळ झाकून ठेवायचं म्हणजे कोळशाचा स्मोकी फ्लेवर त्या पदार्थात मुरतो आणि खायला एकदम मस्त लागतो.

    अशी ही सुवासाची, सुगंधाची दुनिया. यातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. जगातील अनेक सुगंध हल्ली बाटलीबंद करून आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. पण तरीही अजूनही पहिला पाऊस पडल्यानंतर येणारा मातीचा गंध कृत्रिमरित्या तयार करणं मानवाला जमलेलं नाही. कदाचित येणारा काळ त्याचं उत्तर देऊ शकेल. पण सध्यातरी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या या सुगंधी दुनियेला भरभरून प्रतिसाद तर देऊ या.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    March 19, 2026 ललित

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026 ललित

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026 ललित

    1 Comment

    1. Bhagyashri on April 21, 2025 7:45 pm

      वाह… खरंच अनेक आठवणी जाग्या झाल्या.☺️

      Reply
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    By स्नेहा सुतारMarch 19, 2026

    अगरबत्तीचा मंद सुवास आणि सोबतच आईच्या पावलांचा आवाज… एकदम तिला प्रसन्न वाटलं. रात्र सरून पहाटेचा…

    पुण्यातील मुक्काम अन् ठसठसणारी ती जखम!

    March 16, 2026

    दोन शब्द पुरे जगण्याला…

    March 16, 2026

    रामने शिवला थेटच विचारलं, ‘आरू का रडली?’

    March 16, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    त्याचा फोन अन् तेच नेहमीचंच…

    March 19, 2026

    Dnyaneshwari : घटीं थोडेसें उदक घालिजे, तेणें न गळे तरी वरिता भरिजे…

    March 19, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 19 मार्च 2026

    March 18, 2026

    Dnyaneshwari : एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं समुद्रा चुळीं भरिलें…

    March 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 मार्च 2026

    March 17, 2026

    पडद्यावर खाष्ट, पण प्रत्यक्षात कूल कूल…

    March 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 241
    • अवांतर 171
    • आरोग्य 88
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 181
    • मैत्रीण 16
    • ललित 500
    • वास्तू आणि वेध 354
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn