Thursday, January 15, 2026

banner 468x60

Homeललितलग्नाचा 51वा वाढदिवस अन् वृद्धाश्रम

लग्नाचा 51वा वाढदिवस अन् वृद्धाश्रम

दिलीप कजगांवकर

मागच्याच आठवड्यात आबासाहेब आणि आईंच्या लग्नाचा 51वा वाढदिवस राज आणि नेहाने मोठ्या उत्साहात साजरा केला. दुसऱ्या दिवशी नेहा आणि तिची दोन्ही मुले, नेहाच्या माहेरी गेली. राजने आई-बाबांना मॉलमध्ये नेले, त्यांच्यासाठी कपडे, बुट, चपला, चष्मा एवढेच काय अगदी टुथब्रश आणि कंगवे देखील खरेदी केले. छानशा हॉटेलमध्ये जेवण… मराठी सिनेमा, संध्याकाळी बागेतील फेरफटका, पाणीपुरी, भेळ, आईस्क्रीम आणि त्यानंतर ते घरी परतले. एकंदरीत दिवस खूपच छान गेला.

“राज किती खर्च करतोस आमच्यावर?” न राहवून आई-बाबांनी विचारले.

“दोन दिवस आपल्याला पाचगणी-महाबळेश्वरला जायचेय आणि त्यानंतर साताऱ्याला…” राजने त्याचा प्लॅन आई-बाबांना सांगितला.

पुढील दोन दिवस राज आणि आई-बाबा पाचगणी-महाबळेश्वरला मनसोक्त भटकले. रात्री न आईने विचारले, “राज, आता उद्या साताऱ्याला कशासाठी जायचे?” आईच्या या प्रश्नाला उत्तर देणे राजने शिताफीने टाळले. “उद्या लवकर निघायचे आहे…” असे म्हणून राज त्याच्या रूममध्ये गेला.

तितक्यात फोन वाजला. राज आपला फोन आई-बाबांच्या रूममध्ये विसरला होता. फोन नेहाचा होता.

फोन घेताना आईंनी चुकून फोन ‘स्पीकर’ आणि ‘म्युट’ मोडमध्ये टाकला…

“राज, ठरल्याप्रमाणे शॉपिंग झाले… पाचगणी-महाबळेश्वर दर्शनही झाले… आता पुढचा प्लॅन म्हणजे आई-बाबांना उद्या सकाळी साताऱ्याच्या वृद्धाश्रमात नेणे. सकाळी 10 वाजेपर्यंत पोहोचायचे आहे, पण त्यांना शेवटपर्यंत कसलीही कल्पना येऊ देऊ नकोस! कीप इट टोटली सीक्रेट…” नेहाने फोन ठेवला.

नेहा जे बोलली ते खूपच धक्कादायक आणि अनपेक्षित होते. अचानक असा निर्णय का? कशासाठी? आपलं काही चूकलं का? निर्णय पोटच्या गोळ्याचा की सुनेचा? असंख्य अनुत्तरित प्रश्न…

आबासाहेब – “साधारणतः एक महिन्यापूर्वी मी बाहेरून आलो, त्यावेळी राज त्याच्या मित्राबरोबर गप्पा मारत होता. मी आल्याचे पाहून दोघेही बाल्कनीत गेले आणि हळू आवाजात बोलू लागले. वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यामुळे घरातील कटकटी कमी झाल्या आणि शांतता निर्माण झाली असे राजचा मित्र सांगत होता.”

हेही वाचा – म्हातारा-म्हातारी आणि मृत्यूपत्र!

आई – “मी पण ऐकले ते. अहो, पण राजच्या मित्राचे वडील जागेवरून उठूही शकत नव्हते आणि त्यांचं सर्वच आवरायला लागायचं. घरातल्या सर्वांना त्रास व्हायचा. आपलं तसं नाही ना हो! आपण आपलं सर्व काही करतो, शिवाय तुम्ही मुलांना शिकवतात, त्यांना शाळेत पोहोचवतात, शाळेतून घरी आणता… मी देखील नेहाला स्वयंपाकात आणि घर कामात शक्य तेवढी मदत करते… का आला असेल आपला कंटाळा त्यांना?”

“मागच्या आठवड्यात कांदा कापताना माझे बोट कापले तेव्हा नेहाने पटकन ड्रेसिंग करून त्यावर पट्टी बांधली आणि मला सांगितले, आता तुम्ही आराम करा अजिबात काम करू नका. खूप प्रेमळ आहे हो नेहा!”

आबासाहेब – “राजही खूप प्रेमळ आहे. मी भाजी आणायला त्याच्याबरोबर जातो तेव्हा, राज कधीही मला पिशव्या उचलू देत नाही. रस्ता ओलांडताना माझा हात धरतो तो, खूप काळजी घेतो माझी. मागच्या वर्षी मला थोडा ताप आला तर रात्रभर उशाशी बसून होता.”

आई – “दोन-तीन आठवड्यांपूर्वी नेहाला तिच्या मैत्रिणीशी बोलताना मी ऐकले. नेहाच्या बहिणीसाठी पुण्यातील स्थळं बघायला सुरुवात करणार आहेत. कदाचित, आपल्यामुळे अडचण निर्माण होईल म्हणून आपली रवानगी वृद्धाश्रमात होत असेल.”

आबासाहेब – “अगदी तसेच असेल तर काही दिवस आपण तुझ्या भावाकडे आणि काही दिवस माझ्या बहिणीकडे जाऊ.”

आई – “वृद्धाश्रमात चांगली व्यवस्था नसते, अस्वच्छता असते आणि खूप हाल होतात असं मी ऐकलंय. उद्या सकाळी राजला विनवणी करून काही मार्ग निघतो का ते बघायचे का?”

आबासाहेब – “नको नको. याचना करून काही प्राप्त करण्यापेक्षा ते न मिळालेलेच बरे! चला उशीर होतोय झोपूया, उद्या सकाळी लवकर उठायचे आणि आपल्याला आपल्या ‘अखेरच्या’ घरी जायचे ना!”

“आलिया भोगासी असावे सादर” म्हणत आबा आणि आईंनी मनाशी गाठ बांधली की, राज आणि नेहाचा प्लॅन अर्थात् कट आपल्याला समजला आहे, हे अजिबात दाखवायचे नाही… जे होतेय त्यात समाधान मानायचे!

प्रयत्न करूनही दोघांनाही झोप येत नव्हती.

आई – “एक विचारू?”

आबासाहेब – “विचार…”

आई – “वृद्धाश्रमात आपल्याला भेटायला राज कधी येईल का? निदान नातवांच्या वाढदिवसाला तरी आपल्याला त्यांच्या घरी जाता येईल का? राहायला नव्हे फक्त त्यांचा कौतुक सोहळा बघण्यासाठी… आपण तेथे राहायचे नाही, मुक्काम करायचा नाही, अगदी जेवणही नाही करायचे. फक्त आशीर्वाद देऊन परतायचे. राज, नेहा आणि नातवांशिवाय राहण्याचा विचार नाही हो केला जात माझ्याकडून… अजून एक विचारू?”

आबासाहेब – “तुझा ‘एक’ कधीच संपत नाही! विचार… विचार…”

आई – “निदान आपण गेल्यावर आपल्याला अग्नी द्यायला तरी राज येईल का हो?”

आबासाहेब – “येईल, राज नक्की येईल, तो तितका कठोर नाही. शेवटी पीडा कायमची गेली, सुटलो एकदाचा, म्हणून तरी आनंदाने येईल… मी सांगतो ते ऐक, जर मी प्रथम गेलो आणि राज आला नाही तर तू मला अग्नी दे आणि… तू प्रथम गेलीस आणि राज आला नाही तर, मी तुला अग्नी देईन.”

आई – “जर आपण दोघेही एकाच वेळी गेलो तर?”

आबासाहेबांकडून कोणतेही उत्तर आले नाही, बहुधा त्यांचा डोळा लागला असावा…

साताऱ्याला जाताना, राज छान मूडमध्ये होता आणि बरंच काही बोलत होता, आई-बाबा मात्र गप्प गप्पच… दुतर्फा दाट झाडी, वळणावळणाचा रस्ता, गार हवा, अगदी प्रसन्न वातावरण… कारमधील रेडिओ गदिमांनी रचलेले, बाबूजींच्या जादुई आवाजातील गीत ऐकवत होता –

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा

दोष ना कुणाचा…

वृद्धाश्रमाच्या मॅनेजर साहेबांनी राज, आबासाहेब आणि आईंचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले. संपूर्ण वृद्धाश्रमाला एक राऊंड मारून ते सर्व मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये विसावले. हिरवीगार झाडी, भव्य पटांगण, सुसज्ज कॅान्फरन्स हॅाल, मीटिंग रूम्स, प्रशस्त आणि हवेशीर रहायच्या रूम्स… वृद्धाश्रम खरोखरच सुंदर होते.

“वार्षिक फी एक लाख रुपये प्रत्येकी” समोरच्या बोर्डवर लिहिले होते.

चहा पिता पिता मॅनेजर साहेब म्हणाले, “सर्व तयारी झाली आहे, चला आपण जाऊया. आई-बाबांनी मन घट्ट केले.”

मीटिंग रूममध्ये 25-30 लोक जमले होते. राज पुढे झाला आणि म्हणाला, “हा वृद्धाश्रम माझ्या आई-बाबांना खूप आवडला. हो ना?” राजने आई-बाबांकडे पाहिले.

त्यांनी यांत्रिकपणे मान डोलावली, डोळ्यांतले अश्रू लपवत…

राजने दोघांना पुढे बोलावले आणि त्यांच्या हातून मॅनेजर साहेबांना दोन लाख रुपयांचा चेक दिला. टाळ्यांच्या गजरात आई-बाबांचा हुंदका कुणालाही ऐकू गेला नाही!

“मॅनेजर साहेब, निघतो…” राज म्हणाला.

“राज बेटा,  सावकाश जा, सांभाळून गाडी चालव आणि घरी पोहोचल्यावर फोन कर,” आई-बाबा म्हणाले.

“हे काय? मला एकट्यालाच पाठवता?” राजने विचारले.

“आम्हीही यायचे?” खात्री करून घेण्यासाठी आई-बाबांनी विचारले.

“अर्थातच!” राज उत्तरला.

“…आणि ते दोन लाख रुपये… वृद्धाश्रमाच्या फीचे?”

“छे, छे… ते तर तुमच्या लग्नाच्या 51व्या वाढदिवसानिमित्त तुमच्या हस्ते वृद्धाश्रमाला दिलेल्या देणगीचे! चला, आपल्याला परत पुण्याला जायचेय…”

आई-बाबांसाठी हा सुखद धक्का होता… परतीचा प्रवास सुरू झाला आणि तितक्यात नेहाचा फोन आला, “राज, कसा झाला कार्यक्रम? लवकर परत या. मी आणि मुले तुझी आणि आई-बाबांची वाट पाहत आहोत आणि हो, येताना शिरवळला आईंची आवडती भजी आणि बाबांचा आवडता बटाटेवडा खायला विसरू नका.”

हेही वाचा – सुख म्हणजे नक्की काय असतं?

नेहाचे फोनवरील बोलणे ऐकल्याने झालेला गोंधळ मिटला होता. परतीचा प्रवास खूपच सुखकर होता… नातवांपासून ताटातूट होणार नव्हती, घर सुटणार नव्हते, सुनेचा नि मुलाचा सहवास लाभणार होता… हरवेल असे वाटणारे सुख अबाधित होते!

कारमधील रेडिओ मस्त गाणं ऐकवत होता –

मला सांगा,

सुख म्हणजे नक्की काय असतं?

काय पुण्य असलं की ते,

घरबसल्या मिळतं?

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. उतारवयातील चिंतेचे सुखदानंदात केलेले उत्कंठावर्धेत लेखन मनाला जगण्याची उमेद देऊन गेले त्यात आपण केलेल्या संस्काराची सत्यता पडताळीत भरून पावल्याचे सुख दिलेत
    धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

डॉ सुधाकर संभाजीराव तहाडे on आशीर्वाद सर अन् Best Reader किताब
स्मिता जोशी on Navratri : नवरात्रीचे रंग!
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Mental Health : जसे मन, तसे तन आणि जीवन
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
रविंद्र परांजपे.योग शिक्षक व लेखक. मो.9850856774 on Basic Human Needs : निरामय आरोग्याची गरज
मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!