चंद्रकांत पाटील
गेल्या महिन्यातली गोष्ट….
नेहमीप्रमाणे सायंकाळी मी आमच्या ‘मगरपट्टा मार्केट सेंटर’ ला गेलो होतो, तेथे म्हाताऱ्यांचा ग्रुप बसला होता. सगळे ओळखीचे लोक असल्याने त्याना ‘हाय’ करायचं आणि औषधे, भाजी घेऊन परत फिरायचं या उद्देशाने मी त्या ग्रुपकडे गेलो. कुणाला नमस्कार, तर कुणाशी शेकहॅण्ड करताना लक्षात आले की, प्रभाकर काका जरा गंभीर होऊन बसलेले आहेत… म्हणून मी त्यांना म्हणालो,
“काय काका, आज जोडीदार आलेले दिसत नाहीयेत?”
“कोण जकाते म्हणताय का?” बाजूला बसलेल्या पवार सरांनी विचारले.
“हो, हो…” मी म्हणालो.
“अरे, ते जरा आजारी आहेत… त्यांना ‘प्रोस्टेट ग्रंथी’चा त्रास असल्याने त्याना ‘कॅथेटर’ लावला आहे, त्यामुळे ते घरीच आहेत…”
“…आणि त्यांचे मित्र चौगुले काका कुठे दिसत नाहीत?”
तर, प्रभाकर काका म्हणाले, “आज त्यांनापण ‘कॅथेटर’ लावला आहे! थेंब, थेंब लघवी होते ती थांबतच नाही…”
“अरेच्चा! ही काय स्पर्धा चालली आहे का? एका मित्राला कॅथेटर बसवला म्हणून लगेच दुसऱ्यांला पण लावला!”
त्यावर पवार सर हसले आणि म्हणाले, “अरे, चौगुलेचे वय शहाऐंशी आणि जकाते अठ्याहत्तर… आता या वयात असले प्रॉब्लेम येणारच, त्याला काय इलाज नाही!”
“हो बरोबर आहे,” असे मी म्हणालो. नंतर थोड्या हवापाण्याच्या गप्पा झाल्या आणि “चला मला जरा घाई आहे,” असे म्हणून मी त्यांना बाय केले आणि दुकानाकडे निघालो.
थोडा पुढे गेलो असेन नसेन तेवढ्यात कुणीतरी हाक मारली म्हणून मी मागे वळून बघितले तर, पाठीमागून प्रभाकर काका येत होते. ते जवळ आले म्हणाले, “चंद्रकांत, कुठे मेडिकलमध्ये चाललास का?”
मी “हो” म्हणालो.
“मग थांब, मला पण तिकडेच यायचं आहे,” असे म्हणत ते माझ्याबरोबर थोडावेळ चालले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले, “मला काहीतरी सांगायचं आहे…”
मग मी थांबलो आणि म्हणालो, “सांगा, काय प्रॉब्लेम आहे?”
“अरे, जकाते आणि चौगुले दोघांनाही कॅथेटर लावला रे!” ते गंभीर चेहर्याने म्हणाले.
“बरं मग?”
त्यांनी आवंढा गिळला आणि बोलू का नको, विचार करत शेवटी म्हणालेच, “मला फार भीती वाटते रे!”
“कशाची भीती?”
हेही वाचा – सिंधू मॅडम अन् कलेक्टर शिल्पा…
“अरे, मला पण रात्री जाग येते आणि सारखी लघवी आल्यासारखे वाटते, पण होत नाही.”
“केव्हापासून हे होतंय सारं?” मी डॉक्टर असल्यासारखे त्यांना विचारले.
“हेच, त्या दोघांचं ऐकल्यापासून होतय रे…”
मग माझ्या लक्षात आले की, ते घाबरलेत आणि त्यामुळे त्यांना हा त्रास होतोय! मग मी एक क्षणभर थांबलो आणि म्हणालो, “एक काम करा, उद्या सकाळी योगा झाल्यावर क्लबच्या बाहेर येऊन थांबा. मी गाडी घेऊन येतो. तिथून आपण एका ठिकाणी जायचे आहे…”
मग मी दुसरे दिवशी त्यांना घेऊन ब्रह्माकुमारी सेंटरवर गेलो, अगोदर दिदींना केस हिस्ट्री सांगितली आणि मी मुरली ऐकत बसलो. दिदींनी त्यांना ‘कुठे राहता’ वगैरे प्रश्न विचारले, त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या आणि म्हणाल्या की, “तुम्ही तर जवळच राहता तर, दररोज संध्याकाळी यायला जमेल का?” त्याप्रमाणे त्यांनी “हो” म्हटले. मग दिदींनी मेडिटेशन कसे करायचे, हे सांगितले आणि रुटीन सुरू झाले. पुढे ते दररोज संध्याकाळी मेडिटेशनला जाऊ लागले आणि मी चिंतन शिबिरासाठी माऊंट अबूला पंधरा दिवसासाठी निघून गेलो.
अबूहून परत आल्यावर सामान आणण्यासाठी मी मार्केट सेंटरला गेलो तर, प्रभाकर काका कट्ट्यावर हसत खेळत गप्पा मारताना दिसले. मला बघितल्यावर त्यानां आनंद झाला, “चल चल, चहा घेऊ या” म्हणाले. मग आम्ही एका टपरीसमोर जाऊन बसलो. मी त्यांना विचारले, “काय आज एकदम खूश दिसताय?”
“होय रे, तुझ्या त्या ब्रह्माकुमारीमुळे मला चांगला फायदा झाला. तू मार्ग दाखविलास म्हणून भीती कमी झाली… झोप पूर्ण होऊ लागली… त्यामुळे तुझे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.” त्यावर मी म्हणालो, “अहो काका, तसे काही नसते. प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते, तशी ती वेळ आली अन् मी फक्त निमित्त झालो, बाकी काही नाही.”
तेवढ्यात बारीक पाऊस येऊ लागला म्हणून आम्ही उठून टपरीत शिरलो तर, तिथे ‘भजी’ तळण्याचा कार्यक्रम चालला होता. मग व्हायचं तेच झालं… खमंग वास आणि बाहेरचं पावसाळी वातावरण… त्याचा परिणाम झाला आणि भजी खाण्याची इच्छा झाली. मग काकांना विचारले, “भजी खायची का?” त्यांनी ‘हो’ म्हणायची वाट न पाहता मी दोन प्लेट भजी मागवली. काकांनी तोंडात भजी टाकली आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. मला वाटले मिरची लागली असेल पण तसे नव्हते. मी विचारलं, “काय झालं?”
“काही नाही रे, बायकोची म्हणजे सिंधूची आठवण आली… ती अतिशय उत्कृष्ट भजी बनवित असे. आज दहा वर्षे झाली तिला जाऊन तेव्हापासून मी मुलाकडेच असतो. मुलगा आयटी इंजिनीअर आहे, त्याला दोन मुली… एक बंगलोरला शिकते, दुसरी नववीला आहे. घरी सून एकटीच असते. ती काहीही करीत नाही. घरात दोन बायका कामाला… एक स्वयंपाकाला दुसरी इतर कामाला. मी माध्यमीक शाळेतून मुख्याध्यापक म्हणून निवृत झालो. पन्नास हजार पेंशन मिळते. त्यापैकी पंचवीस हजार सुनेला द्यावे लागतात, मग ती खूश राहते.”
“बायको वारल्यापासून आज पहिल्यांदा मी भजी खाल्ली…” माझे डोळे भरून आले.
मधे काही काळ शांततेत गेला.
“पण आता दुसराच प्रॉब्लेम सुरू झालाय…”
“कसला प्रॉब्लेम?”
“अरे घरात सून पटवून घेत नाही… सारखे हिडीसपिडीस करते. पैसै दिले की, आठवडाभर व्यवस्थित असते. पुन्हा ये रे माझ्या मागल्या… कधी वेळेवर चहा, नाश्ता नाही, आंघोळीला गरम पाणी नाही, मनासारखे जेवण नाही. स्वच्छता तर बिल्कुल नाही… सदा-न-कदा मोबाइलमधे डोकं घालून बसलेली असते. त्यामुळे त्या बाहेरच्या बायका जे करतील, ते फायनल, अशी अवस्था आहे.”
“मग मुलगा लक्ष घालीत नाही का?”
“त्याला वेळ नाही, शिवाय बायकोचा वरचष्मा आहे…”
एकूण परिस्थितीचा अंदाज मला आला आणि त्यांची कुचंबणा होतेय, हे माझ्या लक्षात आले…. मग मी त्याना विचारले, “तुमची आर्थिक बाजू कशी आहे?”
“चांगली आहे. पेंशन येते. माझ्या मालकीचे दोन फ्लॅट आहेत, त्याचं भाडं येतं. गावाकडे शेती आहे, त्याचेही थोडेफार पैसे येतात. निरनिराळ्या स्कीममधे पैसे आहेत, त्याचे इंटरेस्टही येते… थोडक्यात आर्थिक बाजू चांगली आहे, पण सुख नाही.”
“काका तुम्हाला मी एक सुचवू का? पटतंय का पाहा…”
“तुम्ही वृद्धाश्रमात का राहत नाहीत?”
त्यांनी आश्चर्याने माझ्याकडे बघितले आणि म्हणाले, “अरे, तिथे तर अनाथ लोक राहतात!”
हेही वाचा – तुळशीपत्र
मी म्हणालो, “तसे काही नाही… अहो, या पुण्यात चांगल्या सोईनी युक्त असे बरेच वृद्धाश्रम आहेत. तुम्ही आरामात हॉटेलात राहिल्यासारखे राहाल. शिवाय, कुटुंबाशी ही चांगले संबंध राहतील आणि तुम्ही कटकटीतून मुक्त व्हाल!”
“मग कुठे आहे तो आश्रम?”
“त्या ब्रह्माकुमारी सेंटरच्या पलीकडेच तो आश्रम आहे. उद्या पाच वाजता तुम्ही इथेच या आपण माझ्या गाडीने जाऊ…”
मग दुसरे दिवशी मी ब्रह्माकुमारी शिबीरासाठी शिवलेला पांढरा झब्बा आणि पांढरी विजार घातली. जाताना बायकोनी बघितले आणि नेहमीप्रमाणे तिने टोमणा मारलाच, “आज काय पुढारीपण दिसतंय?”
“तसं काही नाही…” म्हणत बाहेर पडलो. काकाना घेऊन ‘निर्सग’ वृद्धाश्रमात पोहोचलो. रिसेप्शनमध्ये एक मध्यम वयाचे गृहस्थ बसले होते. त्यांनी आमचे स्वागत केले. त्यांनी काकांना नाव, गाव अशी प्राथमिक माहिती विचारली.
मला त्यांनी विचारले, “तुम्ही कार्यकर्ते आहात का?”
मला कळेना ‘हो’ म्हणावे का ‘नाही’…
“नाही म्हणजे, इथे बरेच पुढारी लोक वृद्ध अनाथांना घेऊन येतात म्हणून विचारले…” त्यांनी स्पष्टीकरण दिले.
“तसं नाही, हे आमचे मित्र आहेत…” मी त्रोटकपणे म्हणालो. पाढर्या ड्रेसचा असा परिणाम पलीकडच्या डोळ्यांवर झाला होता!
मग आम्ही वरती जाऊन रूम बघितल्या… हॉल बघितला. सर्व सोई होत्या. अटॅच बाथरूम होते… फ्रीज होता… टीव्ही होता… अंथरूण-पांघरूण…. थोडक्यात फाइव्हस्टार हॉटेल फॅसिलीटिज होत्या. शिवाय, कॉमन वाचनालय, डायनिंग हॉल, दवाखाना, सेवेला नर्स… त्याचबरोबर सहली, नाटक, पिक्चर सगळं होत. भाडं फक्त पंचवीस हजार! कधीही पाहुण्यांकडे किंवा घरी जाण्याची मुभा होती
काका एकदम खूश झाले म्हणाले, “पंचवीस हजारात एवढं सुख मिळत असेल तर, काय वाईट आहे. चल मी उद्याच येतो…” ते एकदम उत्साहात होते.
मग परत येताना काकांना विचारले, “घरी काय सांगणार?”
“काय सांगणार म्हणजे? त्यांना मी नकोच झालोय. उलट माझ्या या निर्णयाने त्यांना आनंदच होईल… आज संध्याकाळी जेवताना मी माझा निर्णय सांगणार आहे.”
“ठीक आहे, काय होतंय ते मला सांगा,” असे बोलून मी त्याना त्यांच्या घराजवळ सोडून परत आलो.
दुसरे दिवशी संध्याकाळी मला काकांचा फोन आला… “मी निर्सग आश्रम जॉइन केलाय आणि जवळच ब्रह्माकुमारी सेंटर आहे, तिथे जाणे मला सोईचे होईल. तुझी मदत मी आयुष्यभर विसरणार नाही.”
“अहो, तसं काही नाही… काही लागले तर एनी टाइम फोन करा…” असे म्हणून एक चांगले कार्य केल्याच्या आनंदात मी दुसर्या कामाला लागलो.
मधे काही कारणानी मी मार्केटकडे गेलो नाही. नंतर एक दिवस गेलो तर, काका मला ग्रुपमध्ये गप्पा मारताना दिसले.
“अरेच्या! तुम्ही इकडे कसे?” मी आश्चर्याने विचारले.
“त्याची एक स्टोरीच झाली बघ,” ते हसत हसत म्हणाले…
“मी घरातून बाहेर पडल्यावर नवरा बायकोचं जोरदार भांडण झाले. मुलगा आणि नात एका बाजूला आणि सुन दुसर्या बाजूला! मुलाच्या आणि नातीच्या म्हणण्यानुसार सुनेमुळे मला घर सोडायची पाळी आली… वाद टोकाला पोहोचला…. या कलहामुळे नात आजारी पडली. हॉस्पिटलमध्ये नेली, सगळ्या तपासण्या झाल्या, तरी तिचा ताप उतरायला तयार नाही. यात आठ दिवस गेले… ती सारखं आजोबांना बोलवा म्हणू लागली. शेवटी मला सुनेचा फोन आला, ‘मी चुकले मला माफ करा,’ म्हणायला लागली आणि पिंकीला अडमिट केलंय म्हणाली.”
“मग मी विषय वाढविला नाही. ताबडतोब हॉस्पिटल गाठले नातीला भेटलो. ती ‘आजोबाss’ म्हणून रडायला लागली आणि तिने जी मिठी मारली ती सोडायला तयारच नाही…” हे सांगताना ते थोडे भावनाविवश झाले आणि त्यांचे डोळे पाणावले.
“नंतर आम्ही तिला घेऊन घरी आलो… आता तिचा ताप उतरलाय. मी परत घरी राहायला आलोय. घरातील वातावरण पूर्णपणे बदलले आहे आणि सर्वजण माझी काळजी घेतायत….”
जे होते ते चांगल्यासाठीच… याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला!
मोबाइल – 9881307856