Thursday, July 31, 2025

banner 468x60

Homeललितलेखिका कविता महाजन यांची अविस्मरणीय भेट

लेखिका कविता महाजन यांची अविस्मरणीय भेट

आराधना जोशी

साल 2007. झी मराठीबरोबर 2003पासून ‘नमस्कार झी मराठी’ या फोन इन कार्यक्रमामुळे जुळलेले ऋणानुबंध कार्यक्रम बंद झाल्यामुळे संपुष्टात आले होते. झी 24 तास या वृत्तवाहिनीत येण्यासाठी संबंधितांनी सुचवले होते. मात्र शिफ्ट ड्यूटी आणि लहान मुलगी यामुळे नकार दिला होता. त्यामुळे फेब्रुवारीपासून नव्या नोकरीच्या शोधात होते. एके दिवशी पत्रकारितेतील माझे गुरु प्रकाश अकोलकर सरांचा फोन आला. “सध्या काय करतेयस? माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्रपोजल आहे. लेखिका कविता महाजन यांना त्यांच्या प्रोजेक्टसाठी मदतनीस हवी आहे. तुझं नाव मी सुचवलं आहे. तू त्यांना जाऊन भेट. मी नंबर पाठवतो. तू त्यांच्याशी बोलून घे,” असा निरोप सरांनी दिला. लगेच कविता मॅडमचा नंबरही पाठवला.

मी भीत भीतच कविता मॅमना फोन लावला. माझं नाव सांगितल्याबरोबर “अगं हो, प्रकाश बोलला होता तुझ्याबद्दल. एक काम कर. येत्या रविवारी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत माझ्या घरी ये. म्हणजे सविस्तर बोलता येईल,” असा त्यांनी मला निरोप दिला. वसईच्या घरी कसं यायचं ते पण सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं. पत्ता सांगण्याची पद्धत इतकी अचूक होती की, काय बिशाद मी चुकण्याची.

रविवारी आमची भेट ठरली आणि शनिवारी संध्याकाळी कविता महाजन यांना सोलापूरचा भैरू रतन दमाणी पुरस्कार जाहीर झाला. त्यामुळे रविवारी सकाळी त्यांच्या घरी जाताना एक छानसा बुके बरोबर घेतला. सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांच्या घरी पोहोचले. डोक्याला तेल लावून छानपैकी मालिश केलेल्या कविता मॅडम माझ्यासमोर आल्या. हसरा आणि हुशारीचं चेहेऱ्यावर असणारं तेज, अत्यंत आपुलकीनं त्यांनी माझं स्वागत केलं. हातातला बुके देऊन त्यांचं अभिनंदन केल्यावर त्यांना झालेला आनंद मलाही सुखावून गेला आणि त्याचवेळी “अगं मला कविता मॅम नाही तर ताई म्हण. मला जास्त आवडतं,” असं त्यांनी मला सुचवलं. मग रितसर माझी मुलाखत घेतली जाईल, असं मला वाटलं होतं पण कविता ताई मात्र माझ्याशी मस्त गप्पा मारण्याच्या मूडमध्ये होत्या. मी याआधी काय करत होते? माझी शैक्षणिक पार्श्वभूमी, माझ्या आतापर्यंतच्या कामाचं स्वरूप याची त्यांनी चौकशी केली. अकोलकर सरांना मी कशी ओळखते, त्याबद्दलही मला विचारले. मधेच उठून अचानक, तू कॉफी घेशील की चहा? असं विचारून कॉफी करण्याची त्यांनी त्यांच्या मदतनीस मुलीला विनंती केली.

गप्पांच्या ओघात त्यांनी त्यांचा सुरू होणारा नवीन प्रकल्प, त्याचं स्वरूप, त्यासाठी त्यांना कशाप्रकारची मदत अपेक्षित आहे, ते सांगितलं. त्यांच्याकडे आधीच्या प्रकल्पांवर काम करणाऱ्या चार मदतनीस होत्या. या नव्या प्रकल्पासाठी त्यांना आणखी एक मदतनीस हवी होती. कामाचं स्वरूप, नवीन काहीतरी शिकायला मिळेल, याची असणारी खात्री यामुळे कविता ताईंबरोबर काम करायला मला नक्कीच आवडलं असतं. पण प्रश्न आला तो मानधनाचा. झी मराठीत मिळणाऱ्या पगारापेक्षा कविता ताईंनी सांगितलेलं मानधन खूपच कमी होतं.

अर्थात याची त्यांनाही जाणीव होती. म्हणूनच मानधनाचा आकडा सांगताना त्यांनाही अवघडल्यासारखे झालं होतं. शेवटी त्यांनीच एक सल्ला दिला की, आधी सगळा विचार कर. आर्थिकदृष्ट्या तुला ते जमेल का ते बघ. अर्थात मी तुला माझ्याकडेच ये यासाठी दबाव आणणार नाही. पण तू जर येणार असशील तर मला खूप आनंद होईल. तुलाही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. साहित्य क्षेत्रातल्या मान्यवरांशी ओळखी होतील, असं कविता ताई म्हणाल्या.

त्यावेळी सर्व गोष्टींचा विचार करता कविता ताईंकडील नोकरी स्वीकारणं, मला शक्य झालं नाही. त्यांना तसं मी कळवलं. त्यावर कोणत्याही प्रकारचा राग, संताप व्यक्त न करता त्यांनी माझा निर्णय स्वीकारला होता. त्यानंतरही दोनदा त्यांच्याशी फोनवरून बोलणं झालं. त्यावेळीही अत्यंत ऋजुतेने त्यांनी माझ्याशी संवाद साधला होता. मी सध्या काय करते? याचीही त्यांनी आस्थेने चौकशी केली होती. नंतर कामाच्या व्यग्रतेमुळे आणि एवढ्या मोठ्या लेखिकेला आपण कसा काय सारखा फोन करायचा? या विचाराने त्यांच्याशी झालेला संपर्क तुटलाच.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!