शरद महाबळ
अचानकपणे मुंबईतील एका वास्तूला भेट देण्याचा योग आला. जेमतेम 48 तासांच्या सहवासात आम्हा उभयतांना जी काही येथे सकारात्मक ऊर्जा मिळाली, त्या प्रेरणेतून मनाच्या गाभाऱ्यात जो हुंकार उमटला, त्यातूनच निर्माण झालेली ही सर्जनशीलता. या दाम्पत्याची थोडी पार्श्वभूमी विशद करतो. दोघांनाही सरितेची उपमा देतो आणि त्या रूपकातून त्यांचा मला उमजलेला जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न करतो.
या दोन्ही सरिता एकाच गावच्या. आपापल्या परीने आपापल्या जन्मदात्यांच्या संस्कारात वाहात होत्या. तरुण वयात त्यांच्यात नकळतपणे प्रेमाचा अंकुर फुलला… तो व्यक्त झाला आणि दोन्ही घरांतील वरिष्ठांकडून त्याला मंजुरी मिळाली…. आणि मग काय ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे…’ दोन्ही सरितांचा संगम होऊन, आपलं गांव सोडून त्या नवीन गांवात एकत्रितपणे आपापलं मांगल्य राखत प्रवाही झाल्या. या सात्विक प्रवाहात अनेक छोटे-मोठे झरे मित्र-मैत्रिणींच्या, आप्तस्वकीयांच्या तसेच नातेवाईकांच्या रुपात सामील झाले आणि आनंदाचा झरा एकत्रितपणे वाहू लागला.
या मूळ दोन नद्यांच्या प्रेमळ प्रवाहातून दोन छोटी सरोवरं एक पुत्ररत्न आणि एक कन्यारत्नाच्या रुपात निर्माण झाली. ही दोन्ही सरोवरंसुद्धा मूळ नदीप्रमाणेच अत्यंत शांत, संयमी तसेच अनेक झरे जोडणारेच निघाले. कालमानापरत्वे त्यांनाही एकेक छोट्या चवदार तळ्याची प्राप्ती झाली आणि तेही सगळ्यांशी जोडले गेले आहेत. असा हा तीन पिढ्यांचा देदीप्यमान इतिहास. याच पिढीतील ज्येष्ठ पिढीबरोबर माझं वास्तव्य झालं आणि या छोट्याशाच सहवासात मी खूप भारावलो. त्यांच्याकडून खूप काही शिकून तसंच बरंच काही घेऊन चाललो आहे.
रुपकात्मकच लिहिलं असलं तरी, शेवटी अभिमानाने सांगतो की, ही माझी चुलत बहीण आणि जीजाजींचं घर. घरात आगमन झाल्यापासूनच सस्नेह स्वागत, सकारात्मक देहबोली तसेच पाहुणचाराचे आणि अगत्याचे विविध प्रकार पाहून थक्क झालो. हे कमी म्हणून की काय अत्यंत व्यग्र असून सुद्धा भाचीने आणि भाचेजावयांनी जेवण्याचं आमंत्रण देऊन तिच्या आईच्या प्रेमळ अगत्याची पुनरावृत्ती केली. भाचा आणि भाचेसून अजिबात शक्य नसून सुद्धा तिथे येऊन भेटून गेले. इच्छा असूनही घरी बोलावू शकत नाही, याविषयी खंत व्यक्त केली. त्याच्या मुलाने म्हणजे आमच्या नातवाने त्याच्या चिमखड्या बोलातून छान मनोरंजन केले.
जीजाजींनी खास खासगी चारचाकीची व्यवस्था करुन गावातील स्थलदर्शन घडवलं. खूप शिळोप्याच्या गप्पा झाल्या, आठवणींचा जलाशय ढवळला गेला. आपण याआधी कां आलो नाही, या विचारांच्या आत्मपरीक्षणात तसेच पुनः यायचंच या विचारांवर स्थिर होत निरोप घेतला. माझं हे लेखन म्हणजे त्यांच्या हृद्य सत्काराची पावती आहे. इत्यलम.