दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 29 जानेवारी 2026; वार : गुरुवार
- भारतीय सौर : 09 माघ शके 1947; तिथि : एकादशी 13:55; नक्षत्र : रोहिणी 07:31, मृगशीर्ष 29:29
- योग : ऐंद्र 20:27; करण : बव 24:32
- सूर्य : मकर; चंद्र : वृषभ 18:31; सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:28
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
जया एकादशी
भीष्म द्वादशी
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आज भोवतालचे वातावरण आनंददायी असेल. एकामागोमाग एक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. व्यवसायात काही नवीन योजना राबवू शकता, मात्र त्याबद्दल जोडीदाराशी चर्चा करायला विसरू नका. आज तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जरा लांबच ठेवा, अन्यथा ते तुम्हाला काही चुकीच्या गोष्टीत अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात.
वृषभ – आजचा दिवस तुमचा आदर आणि सन्मान वाढवणारा असेल. एखाद्याला मदत करण्यासाठी तुम्ही पुढे जाल, मात्र लोक या प्रकाराला स्वार्थी समजू शकतात. कामाबद्दल निष्काळजीपणा करू नका, कारण त्यामुळे संपूर्ण प्रकल्प बिघडू शकतो. कौटुंबिक जीवनात निर्माण होणारे कोणतेही तणाव दूर होतील. आज होणाऱ्या नव्या ओळखी नजीकच्या भविष्यात फायदेशीर ठरतील.
कर्क – नोकरीच्या चिंता असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. उत्पन्न आणि खर्च यात संतुलन ठेवा. आर्थिक योजना व्यवस्थित आखाव्यात. कामाच्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहण्याचे टाळा, कारण ते तुमच्या प्रगतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. संततीच्या मनमानी वागण्यामुळे आज काहीसा ताण येईल.
मिथुन – आजचा दिवस धावपळीचा असेल. जास्त नफा मिळवण्यासाठी कोणतेही धोकादायक पाऊल उचलणे टाळावे. खूप दिवसांनी जुन्या मित्राला भेटल्याने आनंद मिळेल. स्वतःच्या आरोग्याबद्दल सजगता बाळगा. कामाच्या ठिकाणी तुमच्या आवडीचे काम मिळू शकते, त्याने समाधान वाटेल. तुम्हाला समाजातील काही खास लोकांच्या भेटीगाठी होतील. घरातील तुमच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
सिंह – आज प्रतिस्पर्ध्यांपासून सावध रहा. एखादा करार अंतिम होण्यापूर्वीच त्याला खीळ बसू शकते. ऑफिसमधील सहकारी वरिष्ठांना तुमच्याबद्दल असलेल्या विश्वासाला धक्का देण्याचा प्रयत्न करतील. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन तुम्ही चांगले नाव कमवाल. आईची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ताणतणावातून मुक्तता मिळेल.
कन्या – आजचा दिवस संमिश्र असेल. व्यवसाय योजनांमधून चांगला नफा मिळेल, त्यातून काही प्रमाणात उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. घाईने वाहन चालवणे टाळा. अनपेक्षितपणे आज खर्च वाढू शकतात. वडिलांची काळजी घेण्यासाठी देखील वेळ काढावा लागेल. अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा कोणत्याही वादात अडकू नका.
तुळ – आज जवळच्या नातेवाईकांमुळे मोठा फायदा होईल. वाढत्या कामाच्या ताणामुळे काहीसा त्रास जाणवू शकतो. तब्येतीची काळजी घ्या, पथ्येपाणी सांभाळा. संतती एखाद्या गोष्टीमुळे तुमच्यावर नाराज असू शकते. आज जोडीदारासाठी एखादे सरप्राईज गिफ्ट आणू शकता. कुटुंबासाठी नवीन लक्झरी वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता.
हेही वाचा – आस्तिक आणि नास्तिक
वृश्चिक – आजचा दिवस तुम्हाला अनपेक्षित फायदे देईल. अचानक होणारा आर्थिक लाभ तुम्हाला प्रचंड आनंद देईल. तुमच्या बढतीबद्दल आज चर्चा होण्याची शक्यता आहे. तथापि, शब्द जपून वापरा, अन्यथा वरिष्ठांसोबतचे संबंध ताणले जाऊ शकतात. गरजू व्यक्तीला मदत करण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल. तुमची राजकीय प्रतिमा आणखी उजळून निघेल.
धनु – घाईघाईने निर्णय घेण्याचे शक्यतो टाळा. शांतपणे, विचारपूर्वक घेतलेले निर्णय फायदेशीर ठरू शकतात. कोणाच्या तरी सल्ल्याने कोणतीही गुंतवणूक करणे टाळा. कोणत्याही कायदेशीर बाबींसाठी अनुभवी व्यक्तींशी सल्लामसलत करा. कुटुंबातील सदस्यांसोबत आज मौजमजा करू शकाल. जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक सहलीला जाऊ शकता.
मकर – प्रतिकूल परिस्थितीतही संयम राखावा लागेल आणि व्यवसायात कोणतेही बदल काळजीपूर्वक विचार करूनच करावे लागतील. नफ्याच्या दृष्टीने नियोजनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. विरोधक तुम्हाला त्रास देण्यासाठी प्रयत्न करतील, मात्र तुम्ही हुशारीने सहजपणे मात देऊ शकाल. मित्राकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो. एखादा कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो.
कुंभ – आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही बाबतीत तुम्हाला महत्त्वपूर्ण फायदे मिळतील. व्यवसायात नवीन योजना देखील सुरू करू शकता. तुमच्या जोडीदाराचे आरोग्य बिघडू शकते, म्हणून कोणताही निष्काळजीपणा टाळा, सतर्क राहा. वरिष्ठ सदस्यांसोबत संस्मरणीय क्षण घालवाल.
मीन – आज तुमच्या सर्जनशील क्षमता प्रबळ असतील आणि कामाच्या शैलीने लोकांना आश्चर्यचकित कराल. कोणताही निर्णय काळजीपूर्वक विचार करून घ्या. आळस न दाखवता प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कोणाला पैसे उधार दिले असतील तर, त्याच्या वसुलीसाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. कुटुंबात सुरू असणाऱ्या समस्यांबद्दल वडिलांशी चर्चा कराल.
दिनविशेष
आधुनिक ओडिया साहित्याचे एक प्रवर्तक मधुसूदन राव
टीम अवांतर
आधुनिक ओडिया साहित्याच्या तीन प्रवर्तकांतील एक प्रवर्तक अशी ओळख असणाऱ्या मधुसूदन राव यांचा जन्म 29 जानेवारी 1853 साली पुरी येथे झाला. ओरिसावर मराठ्यांचे राज्य असताना महाराष्ट्रातून जी कुटुंबे ओरिसात जाऊन स्थायिक झाली, त्यापैकी एका कुटुंबात मधुसूदन यांचा जन्म झाला. पुरी येथे शिकत असतानाच मधुसूदन यांना राधानाथ राय गुरू म्हणून लाभले. ओडिया काव्यात या गुरुशिष्य जोडीने नव्या युगाचे प्रवर्तन केले.
हेही वाचा – भीती… दोन चिमुरड्यांच्या मनातली!
मधुसूदन हे शिक्षणतज्ज्ञ होते. लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती. त्यांना बंगाली, हिंदी, संस्कृत, इंग्रजी इत्यादी भाषा चांगल्या अवगत होत्या आणि ओडिया भाषासाहित्याचा तर त्यांचा सखोल व्यासंग होता. महाविद्यालयात शिकत असतानाच मधुसूदन यांनी ब्राह्मो समाजाची दीक्षाही घेतली आणि प्रदीर्घकाल ओरिसात ब्राह्मो समाजाचे नेतृत्व केले. 1907 मध्ये त्यांना ‘रावबहादूर’ हा किताब प्राप्त झाला. त्यांनी इंग्रजीतील तसेच संस्कृतमधील साहित्याची ओडियात अनेक भाषांतरे केली. ही भाषांतरेही मौलिक साहित्य निर्मितीइतकीच सरस उतरली आहेत. चांगल्या शालेय पुस्तकांची ओडियातील उणीव लक्षात घेऊन त्यांनी मुलांसाठी उत्कृष्ट पाठ्यपुस्तके आणि बालवाङ्मय तयार केले.
मधुसूदन यांना ओडियातील आधुनिक भावगीतांचे जनक मानले जातात. इंग्रजीतील सुनीत, उद्देशिका (ओड), विलापिका इ. काव्यप्रकार त्यांनी यशस्वीपणे ओडियात आणले. त्यांच्या महत्त्वाच्या साहित्यकृती पुढीलप्रमाणे : निबंध – प्रबंधमाला, शिक्षणविषयक – निम्न शिक्षक सुहृद, उच्च शिक्षक सुहृद, शब्दकोश – सुखबोध, काव्य-कर्णबध, बसंतगाथा, कुसुमांजली, नलचरित, उत्कलगाथा. मधुसूदन ग्रंथावलीमध्ये त्यांच्या सर्व काव्यरचना, निवडक गद्य तसेच उत्तररामचरितचा त्यांनी केलेला ओडिया अनुवाद अंतर्भूत आहे. 28 डिसेंबर 1912 रोजी या महान साहित्यिकाचे निधन झाले.


