दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 28 सप्टेंबर 2026; वार : सोमवार
- भारतीय सौर : 06 आश्विन शके 1948; तिथि : द्वितीया 19:13; नक्षत्र : रेवती 10:16;
- योग : ध्रुव 08:53, व्याघात 30:12; करण : तैतिल 08:08, वणिज 30:13;
- सूर्य : कन्या; चंद्र : मीन 10:16; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:31;
- पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
द्वितीया श्राद्ध
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
नेमबाज अभिनव बिंद्रा
टीम अवांतर
नेमबाज अभिनव बिंद्रा यांचा जन्म 28 सप्टेंबर 1982 रोजी उत्तराखंडमधील डेहराडून येथे झाला. त्यांचे शिक्षण डेहराडूनमधील डून स्कूल आणि चंदीगडमधील सेंट स्टीफन्स स्कूलमध्ये झाले. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो बोल्डर येथे व्यवसाय प्रशासनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. लहानपणापासूनच नेमबाजीची खूप आवड असल्याने अभिनव यांच्या वडिलांनी सराव करण्यासाठी घरीच शूटिंग रेंज तयार केली, पुढे जर्मनीमध्ये गॅबी बुहल्मन यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनव यांनी प्रशिक्षण घेतले.
वयाच्या 15 व्या वर्षी, अभिनव 1998 च्या राष्ट्रकुल खेळांमधील सर्वात तरुण खेळाडू होते. सिडनी येथे झालेल्या 2000 च्या ऑलिम्पिकमध्ये देखील ते सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरले. या स्पर्धेत त्यांना यश मिळाले नाही. मात्र 2001 च्या म्युनिक विश्वचषक स्पर्धेत 597/600 गुणांसह नवीन ज्युनियर विश्वविक्रम नोंदवून त्यांनी आपले पहिले कांस्य पदक जिंकले. त्या वर्षी त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहा सुवर्ण पदके जिंकली. मँचेस्टर येथे 2002 च्या राष्ट्रकुल खेळांमधील एअर रायफल प्रकारात, त्यांनी जोडी प्रकारात सुवर्ण आणि वैयक्तिक प्रकारात रौप्य पदक पटकावले.
हेही वाचा – निसर्गाचे संगीत
त्यानंतर बीजिंग येथे 2008 मधील ऑलिम्पिकमध्ये, अभिनव यांनी पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत विजय मिळवला. 2010 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बिंद्रा यांना राष्ट्रध्वजवाहक म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यांना 71 देश आणि प्रदेशांमधील 6 हजार 700 सहभागींच्या वतीने खेळाडूंची शपथ घेण्याचा सन्मानही देण्यात आला.
बिंद्रा यांनी गगन नारंग यांच्यासोबत पुरुषांच्या 10-मीटर एअर रायफल जोडी प्रकारात विक्रम प्रस्थापित करून 19 व्या राष्ट्रकुल खेळांमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले, तर वैयक्तिक प्रकारात रौप्य पदक मिळवले. याशिवाय 12 व्या आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 10-मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. याचीच पुनरावृत्ती त्यांनी 2014 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत केली.
आपल्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत 150 हून अधिक पदके मिळवलेल्या अभिनव यांना भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय एसआरएम विद्यापीठ तसेच काझीरंगा विद्यापीठ यांच्याकडून डी.लिट्., तर भारतीय लष्करातर्फे मानद लेफ्टनंट कर्नल पद प्रदान करण्यात आले. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाकडून दिला जाणारा ब्लू क्रॉस हा सर्वोच्च नेमबाजी सन्मान, तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारे दिला जाणारा ऑलिम्पिक ऑर्डर हा सर्वोच्च सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
खेळांच्या विकासासाठीही त्यांनी मोठे योगदान दिले. निवृत्तीनंतर त्यांनी अभिनव बिंद्रा फाउंडेशनची स्थापना केली. याद्वारे क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान एकत्रित केले जाऊन फिजिकल ट्रेनिंगला प्रोत्साहन दिले जाते. याशिवाय ISSF ॲथलीट समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. 2018 मध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ॲथलीट कमिशनमध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मशाल वाहक म्हणूनही त्यांची निवड करण्यात आली होती.
आजचे राशिभविष्य
मेष – आज तुम्ही उत्साही आणि उल्हासित असाल. काहीतरी नवीन करून पाहण्याची इच्छा होईल आणि याचा तुमच्या कामावर तसेच व्यवसायावर परिणाम होईल. प्रलंबित कामे लवकर पूर्ण होऊ शकतात, ज्यामुळे व्यवसायाला नवीन गती मिळेल. जर तुम्ही नवीन भागीदारीचा विचार करत असाल, तर घाई करण्याऐवजी विचारपूर्वक पुढे जा. वाहन खरेदी करण्याचा तुम्ही आज विचार करू शकता. पाहुण्यांच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. मात्र वडिलांच्या तब्येतीबद्दल थोडी चिंता वाटू शकते.
वृषभ – आज एखाद्या गोष्टीबद्दल संभ्रम किंवा चिंता तुम्हाला वाटू शकते. एखाद्या निर्णयाबद्दल मनात धाकधूक असली तरी, धीर सोडू नका आणि इतरांच्या प्रभावाखाली येऊन निर्णय घेण्याची घाई करू नका. मालमत्तेसंबंधी एखादे प्रकरण तुमच्या बाजूने वळत असल्याचे दिसू शकते. पाणी असलेल्या भागांमध्ये वावरताना विशेष सावधगिरी बाळगणे उत्तम राहील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना कठोर परिश्रम करत राहावे लागेल. मात्र केलेल्या प्रयत्नांमुळे हळूहळू यश मिळेल.
मिथुन – आज आर्थिक आघाडीवर सकारात्मक चिन्हे दिसतील. स्वतःचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात ज्यामुळे भविष्याबद्दलचा तुमचा आत्मविश्वास वाढेल. सासरच्या मंडळींना भेटल्याने नात्यात जिव्हाळा वाढेल. कुटुंबातील वैयक्तिक बाबी इतरांना सांगणे टाळा, कारण लहानसहान गोष्टींनी विनाकारण वाद वाढू शकतात. आई-वडिलांचा आशीर्वाद आज एक विशेष आधार ठरेल. तुमचे पूर्वीचे अनुभव आज योग्य निर्णय घेण्यास मदत करतील.
कर्क – आज, तुमची प्रगती होण्याची दाट शक्यता आहे, याशिवाय सहकाऱ्यांचाही मोठा पाठिंबा मिळत राहील. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने कामे सहजपणे पूर्ण होतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी दिवस उत्तम असेल. संततीला दिलेले वचन पूर्ण करणे महत्त्वाचे ठरेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना उत्साहवर्धक बातमी मिळू शकते.
सिंह – आज नशिबाची साथ असल्यामुळे, अनेक रखडलेल्या कामांना पुन्हा गती मिळू शकते. दीर्घकाळापासूनचे अडथळे दूर होऊन मार्ग निघू शकतो. तथापि, इतरांच्या कामात जास्त हस्तक्षेप करणे टाळा. एखाद्या दूरच्या नातेवाईकाशी संबंधित बातमीमुळे तुम्हाला थोडे दुःख होऊ शकते. तुमच्या प्रगतीबद्दल आजूबाजूला असणाऱ्या लोकांचे दृष्टिकोन विचारात घ्या आणि त्यानुसार पुढे जा. जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तो काही दिवसांसाठी पुढे ढकला.
कन्या – आज तुम्हाला प्रत्येक पावलावर संतुलन आणि सावधगिरी बाळगावी लागेल. संततीच्या संगतीकडे लक्ष द्या आणि गाडी चालवताना कोणताही निष्काळजीपणा टाळा. मागील व्यवहारांचे ओझे उतरल्याने मानसिक आराम मिळेल. तुम्हाला आवडणाऱ्या आणि आनंद देणाऱ्या गोष्टींवर खर्च करण्याची इच्छा होऊ शकते. वैवाहिक संबंध गोड राहतील आणि तुम्हाला जोडीदारासोबत बाहेर जाण्याची चांगली संधीही मिळू शकते.
तुळ – आजचा दिवस नात्यांमध्ये स्नेह आणि मनःशांती घेऊन येईल. जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला आंतरिक बळ मिळेल आणि परस्पर प्रेम वाढेल. संतती तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी खास खरेदी करावेसे वाटू शकते. तुमच्या आईने तुमच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या गांभीर्याने घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल. कुटुंबातील सदस्यांसोबतच्या हास्यविनोदआणि गप्पांमुळे दिवसाचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल.
वृश्चिक – आजचा दिवस चढ-उतारांचा असला तरी प्रगतीच्या संधी घेऊन येईल. विरोधकांवर तुमचा प्रभाव कायम राहील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. महत्त्वाच्या व्यावसायिक कामांमुळे प्रवासाला जावे लागू शकते. आज रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात तुमची प्रभावशाली व्यक्तींशी भेट होऊ शकते, जे भविष्यात फायदेशीर ठरेल.
हेही वाचा – Homeopathy : भारतात होमिओपॅथी आली तरी कशी?
धनु – आजचा दिवस व्यवसाय आणि करिअर या दोन्हीसाठी उत्साहवर्धक असेल. तुमच्या आरोग्यात पूर्वीपेक्षा सुधारणा होईल. व्यवसायासाठी गरज असली तरी पैसे उधार घेणे टाळणेच उत्तम. कामाच्या ठिकाणी स्पष्टपणे आणि आत्मविश्वासाने बोला. आज एखाद्या सहलीचे नियोजन करू शकता. आई-वडिलांचे आशीर्वाद तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतील. भूतकाळातील चुकांमधून शिकल्यामुळे आज योग्य निर्णय घेण्यास मदत होईल.
मकर – आज स्वतःच्या आरोग्याबाबत मोठा दिलासा मिळेल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने तुम्हाला चांगला प्रकल्प पूर्ण करण्याची संधी मिळेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ती पुढे ढकलण्याऐवजी वेळेवर पूर्ण करा. संततीच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केल्याने तुमचे नाते अधिक घट्ट होईल. जुन्या कर्जातून सुटका होण्याची चिन्हे आहेत. तसेच, आपल्या सभोवतालच्या लोकांचा हेतू समजून घेतल्यानंतरच महत्त्वाचे पाऊल उचलणे तुमच्या हिताचे ठरेल.
कुंभ – आज तुमच्या मेहनतीचे फळ स्पष्टपणे दिसेल. तुमचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षा अधिक दृढ होईल. वाढलेल्या धैर्यामुळे आणि दृढनिश्चयामुळे, तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेण्यास अधिक सक्षम वाटेल. पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीसाठीची कागदपत्रे काळजीपूर्वक पूर्ण करा. आज नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचारही गांभीर्याने मनात येऊ शकतो.
मीन – आजचा दिवस सकारात्मक परिणाम देणारा असू शकतो. सुज्ञपणे आणि विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतून भविष्यात भरीव परतावा मिळू शकतो. व्यवसायात यशाच्या संधी तुमची वाट पाहत आहेत आणि प्रलंबित निधी परत मिळाल्याने आर्थिक दिलासा मिळेल. आज वैवाहिक जीवनात आनंद वाढेल आणि जोडीदाराच्या सहवासाने तुमच्या मनाला शांती मिळेल. तुमच्या गोड बोलण्याने लोक सहज आकर्षित होतील, मात्र आपल्या विरोधकांपासून सावध राहणे शहाणपणाचे ठरेल.


