दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 21 ऑगस्ट 2026; वार : शुक्रवार
- भारतीय सौर : 30 श्रावण 1948; तिथि : नवमी 23:35; नक्षत्र : अनुराधा 11:52;
- योग : वैधृति 29:18; करण : बालव 10:25;
- सूर्य : सिंह; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:20; सूर्यास्त : 19:03;
- पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव;
- शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128
जरा जिवंतिका पूजन
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
भावकवी ना.घ.देशपांडे
टीम अवांतर
मराठी रसिकांवर आपल्या कवितांनी आणि गीतांनी गेली अनेक दशके अधिराज्य गाजवणारे ना. घ. (नागोराव घनश्याम) देशपांडे यांचा जन्म विदर्भातील सिंदखेडराजा तालुक्यातील सेंदुरजन येथे 21ऑगस्ट 1909 रोजी झाला. त्यांचे वडील साहित्यप्रेमी तर होतेच शिवाय ते साखरखेर्डा परगण्याचे वतनदार देखील होते. ना.घ. यांचे शिक्षण मेहेकर, नागपूर आदी ठिकाणी झाले.
ना.घ. ऐन तारुण्यात असतानाच भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे लोण सगळीकडे पसरत गेले. साहजिकच ते सुद्धा यात सहभागी झाले. मात्र या सुमारास त्यांना विषमज्वराने घेरले आणि त्यांच्या पोटाची व्याधी देखील वाढत गेली. परिणामी त्यांना शिक्षण आणि राजकारण दोन्ही सोडावे लागले. पुढे ते वकील झाले आणि मेहकर येथे वकीली करू लागले. मेहकर एज्युकेशन संस्थेचे ते संस्थापक सदस्य होते. तसेच आकाशवाणी नागपूर केंद्राचे कार्यक्रम सल्लागार म्हणून देखील त्यांनी काम केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच महिलांना निवेदक म्हणून आकाशवाणीवर काम करता येऊ लागले.
हेही वाचा – उमाच्या प्रश्नाचं उत्तर मामीनं दिलं!
विसाव्या वर्षी ना.घं.च्या काव्य लेखनाला सुरुवात झाली. 1954 साली त्यांचा ‘शीळ ‘हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. या पहिल्या कविता संग्रहाला मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांची 23 पानी दीर्घ प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेत राज्याध्यक्ष यांनी मराठी कवितेचा व्यापक आढावा घेऊन त्यातून नाघंचे वेगळेपण सांगितले आहे. अर्थात संग्रह 1954 साली आला असला तरी 1932 साली जी. एन. जोशी यांनी गायलेल्या ‘रानावनात गेली बाई शीळ’ या कवितेच्या ध्वनिमुद्रिकेतून ना.घ.रसिकांपर्यंत पोहोचले होते. एचएमव्ही कंपनीही त्यावेळी मराठी रसिकांमध्ये लोकप्रिय होऊ लागली होती.असे म्हटले जाते की व्यावसायिक गायकाने कवितेला चाल लावून तिची ध्वनिमुद्रिका करण्याचा तो पहिलाच प्रयोग होता आणि तो मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला.
1964 साली ‘अभिसार’ हा त्यांचा दुसरा काव्य संग्रह प्रकाशित झाला. त्याला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले. 1985 साली प्रकाशित झालेल्या खूणगाठी या संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. 1996 साली ‘गुंफण ‘हा त्यांचा पुढील संग्रह आला. त्याच वर्षी’ कंचनीचा महाल ‘हा चार दीर्घ कवितांचा संग्रहही प्रकाशित झाला. या संग्रहात त्यांनी पूर्वी लिहिलेल्या कंचनीचा महाल, गिरीजेचा संसार, निश्वास गीतावली आणि जुईची कळी याची चार दीर्घ कविता आहेत. 2000 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘फुले आणि काटे‘ या पुस्तकातून आत्मचरित्रात्मक लेखनही त्यांनी केले.
साहित्य अकादमी पुरस्काराव्यतिरिक्त गदिमा पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार, विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात आलेली साहित्य वाचस्पती ही उपाधी आणि विदर्भ साहित्य संघाचा अत्यंत मानाचा ‘जीवनव्रती’ पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी आणि मानसन्मानांनी ना.घं.ची साहित्यिक कारकीर्द गौरवण्यात आली. 1984 साली त्यांच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून विदर्भ साहित्य संघाने मेहकर येथे साहित्य संमेलन आयोजित केले होते. रानारानांत गेली बाई शीळ, बकुळफुला कधीची तुला, डाव मांडून भांडून अशा गीतांनी रसिकप्रिय झालेल्या ना.घ. यांचे 10 मे 2000 रोजी निधन झाले.
आजचे राशिभविष्य
मेष – प्रत्येक परिस्थितीत मानसिक संतुलन राखणे ही आजची मोठी परीक्षा ठरेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. दुसरीकडे तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या वाढतील, त्यामुळे अधिक परिश्रम करावे लागतील. अर्थात त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील. लोखंड किंवा बांधकाम साहित्याशी संबंधित व्यवसायात फायदा होऊ शकतो. मात्र खर्चात अचानक वाढ झाल्याने तुमचे बजेट बिघडू शकते, म्हणून सावधगिरी बाळगा. संततीच्या आरोग्याकडे किंवा श्वसनाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
वृषभ – आजचा दिवस कुटुंबात शांतता आणि आनंद घेऊन येईल. तुम्हाला जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुटुंबात काही मतभेद असतील, तर ते सोडवण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. सासरच्या मंडळींकडूनही एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. उत्पन्न चांगले असेल, पण खर्चही वाढतच राहील. जर तुम्हाला मधुमेह असेल तर खाण्याच्या सवयींबाबत काळजी घ्या.
मिथुन – जुनी अपूर्ण कामे पूर्ण झाल्यामुळे आज मनावरचा ताण हलका होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. काही चांगल्या बातमीमुळे कौटुंबिक वातावरण प्रफुल्लित होईल. जोडीदाराचे आणि संततीचे प्रेम आणि पाठिंबा तुमचे मनोधैर्य वाढवेल. आईच्या आरोग्याबाबत काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुम्हाला श्वसनाशी संबंधित त्रास होत असल्यास, दिरंगाई न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या.
कर्क – कामाच्या ठिकाणी गोंधळ आणि आव्हानांचा आज सामना करावा लागू शकतो. मात्र संयम आणि समजूतदारपणाने परिस्थिती तुमच्या बाजूने वळवू शकता. सरकारी कामात अडथळे येण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणत्याही प्रक्रियेत घाई करू नका. जोडीदारासोबत छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे शांत राहणेच उत्तम. व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होण्याची शक्यता आहे. सर्दी आणि ताप यांचा त्रास होऊ शकतो. मानसिक शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. योग धारणा अवश्य करा.
सिंह – तुमचा आत्मविश्वास आणि त्यामुळे मिळणारे यश या दोन्ही गोष्टी आज महत्त्वाच्या ठरतील. कामाच्या ठिकाणी तुमची उत्तम कामगिरी असेल. वरिष्ठही तुमची प्रशंसा करू शकतात. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. धातू-संबंधित व्यवसाय असणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतील. राजकीय किंवा प्रभावशाली ओळखींचाही फायदा होऊ शकतो. रक्तदाबाचा त्रास असेल तर सावधगिरी बाळगा.
कन्या – सुधारलेल्या प्रकृतीमुळे तुम्हाला आज पूर्वीपेक्षा अधिक उत्साही वाटेल. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील. न्यायालयीन खटल्यांमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक आणि परराष्ट्र व्यवहारांमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे. भावंडांसोबतचे संबंध अधिक गोड होतील. मात्र आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. मज्जातंतूंशी संबंधित कोणत्याही समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
तुळ – विचारांमधील सकारात्मक बदलांमुळे आजचा तुमचा दिवस चांगला जाऊ शकतो. आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील आणि कामे तुलनेने सुरळीतपणे पार पडतील. आज तुमचे संवाद कौशल्य ही तुमची सर्वात मोठी ताकद असेल. शिक्षण आणि करिअर या दोन्हीमध्ये चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीकडून महत्त्वपूर्ण मदत मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्याल. आरोग्यही उत्तम असेल.
वृश्चिक – आज यश आणि सन्मान मिळण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. बऱ्याच काळापासून उसनी दिलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. मित्र आणि महिला सहकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे काम सोपे होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. स्वतःच्या खाण्याच्या सवयींबाबत काळजी घ्या कारण पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
हेही वाचा – कानडा राजा
धनु – आजचा दिवस चांगला असेल. तुमच्या रागामुळे गोष्टी बिघडू शकतात. त्यामुळे, प्रतिक्रिया देण्यापूर्वी थोडा वेळ थांबणे फायद्याचे ठरेल. तुमचे नियोजन आणि कठोर परिश्रम यामुळे कामाच्या ठिकाणी पुढे जाल. शिक्षण, अध्यापन किंवा ज्ञानक्षेत्रात गुंतलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. कुटुंबात सलोखा टिकून राहील. जर तुम्हाला पाठदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
मकर – आज अनेक प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे, सोबतच आर्थिक लाभही होईल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याचीही शक्यता आहे. मात्र आज वडिलांच्या प्रकृतीबद्दल चिंता वाटू शकते. वैवाहिक जीवनातील जुने वादग्रस्त मुद्दे पुन्हा उपस्थित करणे टाळा. ऋतूनुसार तुमच्या दैनंदिन दिनचर्येत आणि आहारात बदल करणे महत्त्वाचे आहे.
कुंभ – आज उत्पन्न आणि खर्च यांच्यात योग्य संतुलन राखणे आवश्यक आहे. तुम्हाला सरकारी योजना किंवा सेवांचा लाभ मिळू शकतो, परंतु कायदेशीर बाबींमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगा. प्रवास करताना सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे. जोडीदाराच्या आरोग्याबद्दल काळजी वाटू शकते. वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे. पोट आणि कफ संबंधित समस्या टाळण्यासाठी स्वतःच्या आहाराकडे लक्ष द्या.
मीन – आजचा दिवस उत्साह आणि सकारात्मकता घेऊन येणारा आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. मित्राच्या मदतीने तुम्ही एक महत्त्वाचे काम पूर्ण करू शकाल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी परिस्थिती अनुकूल असेल. एखाद्याला उसनी दिलेली मोठी रक्कम परत मिळण्याची चिन्हे आहेत. स्थावर मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये यश मिळू शकते. या सगळ्यात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; पोटाशी संबंधित कोणत्याही समस्यांवर त्वरित उपाय करा.


