दर्शन कुलकर्णी
आज, दिनांक : 13 जुलै 2025, वार : रविवार
भारतीय सौर : 22 आषाढ शके 1947, तिथि : तृतीया 25.02, नक्षत्र : श्रवण 06:52
योग : प्रीति 18:00, करण : वणिज 13:27
सूर्य : मिथुन, चंद्र : मकर 18:53, सूर्योदय : 06:08, सूर्यास्त : 19:19
पक्ष : कृष्ण, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन
संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
दिनविशेष
कवयित्री इंदिरा संत
टीम अवांतर
जीवनातील स्वास्थ्यापेक्षा संघर्षावर श्रद्धा बाळगून भावकविता लिहिणाऱ्या इंदिरा संत यांचा आज स्मृतीदिन. स्वतःच्या अनुभवांचा अत्यंत संयत शब्दांमध्ये रेखीव आविष्कार करणे, हे त्यांच्या कवितेचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. लघुनिबंधकार ना. मा. संत हे त्यांचे पती होते. या दोघांच्या कविता 1941 साली ‘सहवास’ या नावाने प्रसिद्ध झाल्या. मात्र पतीच्या अकाली निधनानंतर एकटेपणाची, काहीशी अबोल, अंतर्मुख करणारी भाववृत्ती इंदिराबाईंच्या कवितांमधून व्यक्त व्हायला लागली. लहानपणी कुटुंबातून घडलेले स्त्रीगीतांचे तसेच ओव्यांचे संस्कार आणि नंतर स्त्रीसुलभ साधेपणा, स्वाभाविकपणा, प्रांजलपणा, एक अखंड संवाद साधण्याचा प्रयत्न, ही इंदिराबाईंच्या कवितेची इतर वैशिष्ट्ये होती. त्यांच्या ‘शेला’, ‘मेंदी’, ‘रंग बावरी’ या कवितासंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे वाड्मयीन पुरस्कार तर मिळालेच, याशिवाय 1984 साली ‘गर्भरेशमी’ या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला. 1995 साली नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘जनस्थान’ पुरस्काराने इंदिराबाईंना सन्मानित करण्यात आले. त्यांचे ‘मृगजळ’, ‘बाहुल्या’, ‘मृण्मयी’, ‘चित्रकळा’, ‘वंशकुसुम’, ‘निराकार’ हे काव्यसंग्रह देखील रसिकप्रिय झाले. याशिवाय ‘मृद्गंध’ हे आत्मकथन, ‘मालनगाथा’ हे स्त्रियांच्या ओव्यांचे संपादन (२ खंड), ‘कदली’ तसेच ‘चैतू’ हे कथासंगह अशी साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. 13 जुलै 2000 रोजी बेळगाव येथे त्यांचे निधन झाले.
हेही वाचा – गुरू अन् शिष्याची घट्ट ‘वीण’
सूरश्री केसरबाई केरकर
टीम अवांतर
हिंदुस्थानी संगीतशैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याच्या ख्यातनाम मान्यवर गायिका म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या केसरबाई केरकर यांचा जन्म 13 जुलै 1892 रोजी गोव्यातील केरी या गावी झाला. त्यांच्या कुटुंबाला संगीत परंपरा लाभली होती. गावात होणाऱ्या गवळणकाला उत्सवात केसरबाई श्रीकृष्णाची भूमिका करत असत. त्यांचे काम आणि गायन ऐकायला इतर गावांमधून देखील लोक या उत्सवात येत असत. त्यांचे गाण्याचे औपचारिक शिक्षण वयाच्या आठव्या वर्षापासून सुरू झाले. किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ हे त्यांचे पहिले गुरू. नंतर पंडित रामकृष्णबुवा वझे, उस्ताद बरकतुल्ला खाँ, पंडित भास्करबुवा बखले यांच्याकडेही त्यांचे संगीत शिक्षण झाले. पुढे जयपूर-अत्रौली घराण्याच्या अल्लादिया खाँसाहेबांकडे त्यांनी गंडा बांधून, त्यांचे शिष्य बनून रितसर संगीत शिक्षण घेतले. तानेचा दाणेदारपणा, डौलदारपणे सम गाठणे, गायनातील ओघवतेपणा ही त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये होती. त्याकाळात सर्वाधिक बिदागी घेणाऱ्या गायिका म्हणून देखील त्यांचे नाव घेतले जायचे. रवीन्द्रनाथ टागोर हे देखील केसरबाईंच्या गाण्याचे चाहते होते. 1977 साली व्हॉयेजर-1 या अंतराळयानात मानवी संस्कृतीचे द्योतक म्हणून जगभरातील संगीताचे नमुने सुवर्णांकित ताम्रध्वनिमुद्रिकेच्या स्वरूपात जतन करण्यात आले. रॉबर्ट ब्राऊन या संगीतशास्त्रज्ञाने भारतीय संगीताचे प्रतिनिधित्व करणारे संगीत म्हणून केसरबाईंनी गायलेल्या भैरवीतील ‘जात कहां हो अकेली गोरी’ या ठुमरीच्या ध्वनिमुद्रणाचा समावेश या अंतराळयानातील मुद्रिकेसाठी केला. त्यामुळे केसरबाईंचे गायन अंतरिक्षातही पोहोचले. संगीत नाटक अकादमी – प्रमुख आचार्या, पद्मभूषण, महाराष्ट्र शासनाचा राज्यगायिका यासारखे अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. धोंडूताई कुलकर्णी या केसरबाईंच्या एकमेव शिष्या म्हणून ओळखल्या जात. अशा या महान गायिकेचे 16 सप्टेंबर 1977 रोजी निधन झाले. मात्र आजही गोव्यात दरवर्षी ‘केसरबाई केरकर स्मृती संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात येते. याशिवाय मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे (एन.सी.पी.ए.) गायनात कारकिर्द करण्याची इच्छा असलेल्या नवोदित कलाकारांना सूरश्री केसरबाई केरकर शिष्यवृत्ती देण्यात येते.
हेही वाचा – सुरेश भट… शब्द, स्वरांचा पारिजात