रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. शिळ्या भाताच्या चकल्या, मसालेभात आणि रस्साभाजी बनविताना या टिप्स वापरून पाहा.
- उरलेला भात घ्या. त्यात चवीपुरते मीठ आणि जिरेपूड टाकून चांगले मळून घ्यावे. हे सर्व कुकरमध्ये ठेवून एक शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यावे. थंड झाल्यानंतर त्याच्या चकल्या पाडून उन्हात वाळवाव्यात. या चकल्या पांढऱ्या शुभ्र होतात आणि तळून घेतल्यानंतर अत्यंत खुसखुशीत आणि चविष्ट लागतात. लहान मुले या चकल्या खूप आवडीने खातात. मुलांना पचण्यासाठी चांगल्या असतात.
हेही वाचा – Kitchen Tips : अशा प्रकारे पालक परोठे अन् कोबीची थालिपीठ भाजी करून पाहा…
- पुलाव, मसालेभात, कुर्मा करतेवेळी चांगला वास येण्याकरिता आपण त्यात लवंगा, वेलदोडे, दालचिनीचे तुकडे टाकतो. जेवतेवेळी मात्र दाताखाली आले की, काढून टाकतो. हा एकप्रकारे अपव्ययच होतो. हल्ली मसाल्याचे पदार्थ फारच महाग झालेत. यावर सोपा उपाय म्हणजे लवंग, वेलदोडे, दालचिनी समप्रमाणात घेऊन त्यांची मिक्सरमध्ये अगर खलबत्त्यात पावडर करणे, फोडणीत ही पावडर टाकणे. अतिशय सुंदर वास लागतो आणि मसाल्याचे पदार्थ फुकट जात नाहीत, त्याचा शंभर टक्के विनियोग होतो.
- कढीपत्ता आणि कोथिंबीर नसल्यास आमटी सुशोभित करण्यासाठी दोडक्याच्या शिरा, मेथी, पालक, कांद्याची पात, मुळ्याची पाने, फ्लॉवरची पाने, कोबीची पाने, ओल्या हरभऱ्याची पाने, पुदिना यापैकी जे घरात उपलब्ध असेल ते बारीक चिरून फोडणीतच चमचाभर टाका. म्हणजे ते हिरवेगार राहील आणि आमटी किंवा रस्सा भाजी चांगली दिसते आणि चवही वेगळी लागते.
- गाजराची देठे कापून खोलगट बशीत पाणी भरून स्वयंपाकघरात खिडकीजवळ लावून ठेवा. ऐनवेळी कोथिंबीरीसारखा गाजराच्या पानांचा उपयोग करता येतो.
हेही वाचा – Kitchen Tips : भाज्यांच्या सत्वयुक्त सालींचा वापर अन् टोमॅटोचे सार करण्याच्या टिप्स
- आपल्याला वर्षाला लागतील तेवढे चांगले कडवे वाल बाजारातून आणावेत. एक दिवस उन्हात वाळवून, मग स्वच्छ निवडून किडके आणि टोके असलेले वाल वेगळे करावेत. बाजारातून अर्धा किलो तांबडी माती आणावी. ती पाणी टाकून भज्यापेक्षा पातळ भिजवावी आणि त्यात चांगले वाल टाकून एकत्र मिसळून कडकडीत उन्हात सुकवावे. सात ते 10 दिवस सुकवले की, अगदी कोरडे करून थंड झाल्यावर पत्र्याच्या अगर पितळ्याच्या डब्यात ठेवावेत. आपल्याला लागतील तेव्हा काढून पाण्यात भिजवून माती धुऊन टाकून वाल वापरावेत. असे वाल वर्षभर चांगले राहतात. त्यात टोके आणि अळी लागत नाही.
तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील.


