मनोज
पुष्पा, स्त्री, गोलमाल, सिंघम, मर्दानी, भूलभुलैया, ओह माय गॉड, जुडवा-2’ अशा अनेक सिक्वेल सिनेमांची बॉलिवूडमध्ये मोठी परंपरा आहे. नेटवर सर्च करताना ‘हंटरवाली’ (1935) आणि ‘हंटरवाली की बेटी’ (1943) हे दोन पहिले सिनेमे (सिक्वेल) असल्याची माहिती मिळाली. पण ‘जुडवा’ सिनेमांची परंपरा देखील बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत जुनीच आहे. ‘जुडवा’ म्हणजे संपूर्ण कथानकाचा किंवा स्टोरीलाइनचा जशाच्या तसा वापर.
सर्वाधिक चर्चेत राहिलेला 1991 सालचा ‘दिल है के मानता नहीं’ या चित्रपटाचं कथानक पूर्णपणे उचललेलं आहे. हा सिनेमा राज कपूर आणि नर्गिस अभिनित ‘चोरी चोरी’ या पिक्चरची फ्रेम-टू-फ्रेम कॉपी आहे. यावर त्यावेळी खूप चर्चा झाली. इतकंच काय ‘दुसरे के बाप को अपना बाप कहते हुए शर्म नहीं आती,’ हा डायलॉग देखील दिग्दर्शक महेश भट्ट यांनी सोडलेला नाही.
नासिर हुसेन दिग्दर्शित 1957 सालच्या ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटातील सर्वच गाणी हिट आहेत. शम्मी कपूर आणि अमिता यांच्या प्रमुख भूमिका यात आहेत. एकदा जरा निवांत असताना चॅनल सर्फिंग करीत होतो. एका चॅनलवर संजय दत्तचा सिनेमा सुरू होता, त्यातली सिच्युएशन ओळखीची वाटली, म्हणून मी तो सीन पूर्ण पाहिला. तो चित्रपट याच ‘तुमसा नहीं देखा’ या चित्रपटाची कॉपी होतe. सिनेमाचं नाव ‘जमाने से क्या डरना’! 1994 साली प्रदर्शित झालेला, संजय दत्त आणि रवीना टंडन यांचा हा सिनेमा किती जणांच्या लक्षात असेल, हा प्रश्नच आहे.
खरंतर, बॉलीवूडचा कोणता सिनेमा सुपरडुपर हिट ठरेल, हे सांगता येत नाही. गोविंदा, चंकी पांडे, शिल्पा शिरोडकर आणि रितू शिवपुरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला 1993 सालचा ‘आँखें’ हा सिनेमा याबाबतीत नशीबवान ठरला. ‘आँखे’ हिट झाला. वस्तुत: 1974 सालच्या ‘दो फूल’ या चित्रपटाची ती कॉपी आहे. या चित्रपटात मेहमूदने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे आणि जोडीला विनोद मेहरा आहे. ‘म… म… माफ करो, ज… ज… जाने दो…’ हे गाणं ‘दो फूल’मधलं तर, ‘लाल दुपट्टेवाली तेरा नाम तो बता…’ हे ‘आँखे’मधलं! ‘आँखें’तलं ‘अँगना में बाबा…’ हे गाणं हिट झालं असलं तरी, ‘दो फूल’मधलं त्याच सिच्युएशनमधलं ‘मुत्तुकोडी कव्वाडी हडा…’ या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे.
अनुपम खेर, ऋषी कपूर आणि उर्मिला मातोंडकर यांचा ‘श्रीमान आशिक’ (1993) हाही चित्रपट 1967 सालच्या आय. एस. जोहर, जॉय मुखर्जी आणि सायरा बानो अभिनीत ‘शागिर्द’ चित्रपटावर बेतलेला आहे. विशेष म्हणजे, ‘श्रीमान आशिक’मधलं ‘लडकियों से ना मिलो तुम…’ या गाण्याची चालही चेब खालिद यांच्या गाजलेल्या ‘दिदी…’ या अरेबिक गाण्यावरून उचलली आहे!
‘शोले’ सिनेमानं इतिहास रचला. ‘अरे ओ सांभा…’पासून ‘बसंती, इन कुत्तो के सामने मत नाच…’पर्यंत सर्व डॉयलॉग तोंडपाठ आहेत. पण 1975 सालच्या या चित्रपटाचं कथानक बेतलंय ‘मेरा गाँव मेरा देश’ (1971) या सिनेमावरून. अगदी डाकूच्या नावातही साधर्म्य आहे. ‘मेरा गाँव मेरा देश’मध्ये ‘जब्बर सिंग’ (विनोद खन्ना) तर, ‘शोले’मध्ये ‘गब्बर सिंग’ (अमजद खान)! ‘मेरा गाँव मेरा देश’मध्ये जयंत या चरित्रनायकानं साकारलेली ‘हवालदार मेजर जसवंत सिंग’ ही भूमिका ‘शोले’मधल्या ‘ठाकूर’सारखीच आहे आणि जयंत (झकारिया खान) हे अमजद खानचे वडील आहेत, हे उल्लेखनीय.
याशिवाय, नावामुळे ‘कर्ज’ सिनेमाची आठवण करून देणारा ‘ओम शांती ओम’ या सिनेमाचा शेवट देखील दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांच्या ‘मधुमती’ चित्रपटासारखाच आहे. 1988 सालचा ‘जनम जनम’ हा सिनेमा देखील ‘मधुमती’ची पूर्णपणे कॉपी आहे. या चित्रपटात ऋषी कपूर, अमरिश पुरी आणि विनिता गोयल हे प्रमुख भूमिकेत आहेत.
त्याचबरोबर, हेमा मालिनीच्या ‘सीता और गीता’सारखाच श्रीदेवीचा ‘चालबाज’ अन् दिलीप कुमारच्या ‘राम और शाम’सारखे ‘किशन कन्हैया’ आणि ‘जुडवा’ हे सिनेमे आहेतच. तर, शरच्चंद्र चटोपाध्याय यांच्या प्रसिद्ध ‘देवदास’ (1917) या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित 1928पासून वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये 13 चित्रपट झाले आहेत. त्यात तीन हिंदी आहेत – कुंदनलाल सेहगल (1936), दिलीप कुमार (1955) आणि शाहरुख खान (2002).
मराठी आणि हिंदीची देवाण-घेवाण
इतर भाषांबद्दल कॉपी म्हणायचं झालं तर, दाक्षिणात्य सिनेमांची हिंदीमध्ये मोठ्या प्रमाणवर कॉपी केली जाते, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पण फिरोज खान (हिंदीतला महेश कोठारे) याने थेट ‘गॉड फादर’ या इंग्रजी चित्रपटाची कॉपी केली होती अन् तो सिनेमा देखील गाजला होता. त्याचं नाव आहे – ‘धर्मात्मा’. 1975 साली झळकलेल्या या सिनेमात फिरोज खान याच्याव्यतिरिक्त हेमा मालिनी, रेखा, डॅनी, प्रेमनाथ, फरिदा जलाल, रणजीत, सुधीर यांच्या भूमिका होत्या.
1966 सालचा ‘मेरा साया’ हा सिनेमा ‘पाठलाग’ (१९६४) या मराठी सिनेमावरून घेतला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही सिनेमे गाजले आणि त्यातली गाणीही हिट झाली. ‘मेरा साया’मध्ये सुनील दत्त आणि साधनाचा संयत अभिनय पहायला मिळतो. ‘पाठलाग’मध्येही भावना, काशिनाथ घाणेकर आणि राजा परांजपे यासारखे दिग्गज कलावंत होते.
‘धुमधडाका’ हा 1985 साली रिलिज झाला. महेश कोठारेचा (मराठीतला फिरोज खान) हा चित्रपट देखील हिट (‘आँखे’सारखाच) ठरला होता. यात महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी, सुरेखा, प्रेमा किरण, शरद तळवलकर यांच्या भूमिका होत्या. हा चित्रपट 1966 सालच्या ‘प्यार किये जा’ या चित्रपटाची फ्रेम टू फ्रेम कॉपी आहे. या सिनेमात शशी कपूर आणि किशोर कुमार यांच्या जोडीला मेहमूद आणि ओम प्रकाश यांनी धम्माल केली आहे. (‘प्यार किये जा’चे मी राईट्स घेतले आहेत, असे महेश कोठारे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले आहे.)
या विषयाला पूरक असे अजून काही मिळते का, याचा इंटरनेटवर शोध घेत असताना सचिन पिळगावकरचा ‘अशी ही बनवा बनवी’ हा सिनेमादेखील असाच ‘उचललेला’ आहे, असे दिसले. अगदी फ्रेम-टू-फ्रेम नसला तरी, स्टोरीलाइन तीच आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे – ‘बीवी और मकान’. 1966 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे निर्माते हेमंत मुखर्जी आणि दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी आहेत. या सिनेमात विश्वजीत, कल्पना, मेहमूद, केश्टो मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका होत्या.
सचिनचा ‘नवरा माझा नवसाचा’ हा सिनेमा देखील 2007 सालच्या ‘एकदन्त’ या कन्नड सिनेमावर बेतलेला आहे. त्यात त्याने ‘बॉम्बे टू गोवा’ चित्रपटाचा मसाला घातला आहे, बस एवढाच फरक!