Friday, August 1, 2025

banner 468x60

Homeशैक्षणिकएक संवेदनशील समस्या... कच्चे प्रेम

एक संवेदनशील समस्या… कच्चे प्रेम

अर्चना कुलकर्णी

डिसेंबर महिना म्हणजे शाळा, कॉलेजांमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा यांची धमाल असते. त्या दिवशी आमच्या कनिष्ठ महाविद्यालयात नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. नृत्य स्पर्धा खूपच रंगतदार झाली. दुपारी बारा वाजता स्पर्धा संपली तेव्हा प्रेक्षक, विद्यार्थीवर्ग खुशीत बाहेर पडत होता तर, कलाकार विद्यार्थीवर्ग अल्पोपहारचा स्वाद घेत नृत्य सादरीकरण आणि स्पर्धेचा निकाल यावर चर्चा करून समाधानाने हॉलच्या बाहेर पडले.

त्यादिवशी दुपारच्या वेळी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक यापैकी कोणीही संस्थेत हजर नसल्यामुळे खूप शांतता होती. माझे लक्ष यामुळे मी कार्यालयीन कामात केंद्रित केले होते. दुपारी चारच्या सुमारास एक वयस्कर गृहस्थ तावातावाने थेट माझ्या केबिनमध्ये आले. कार्यालयाच्या मदतीनीसांनी त्यांना अडवण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्यांना अक्षरशः हाताने बाजूला ढकलून ते केबिनमध्ये शिरले आणि रागाने बोलू लागले,

“मी नाडकर, कोपऱ्यावरच्या सर्वोदय हाऊसिंग सोसायटीचा मी सेक्रेटरी आहे. अहो, तुमच्या ज्युनियर कॉलेजची मुलं-मुली आमच्या सोसायटीच्या बागेत दुपारी आले होते. चक्क जोडी-जोडीने झाडाखालच्या बाकावर बसून प्रेमाचे चाळे करत होते. त्यांना काही लाज आहे की नाही? अशी कशी तुमच्या कॉलेजची शिस्त?”

हेही वाचा – आत्मविश्वास… कधी कमी तर, कधी जास्त

त्यांचे तावातवाने हातवारे करून बोलणे मी शांतपणे ऐकत होते. बरेच बोलल्यानंतर त्यांच्या बोलण्याचा वेग आणि संतापाचा आवेग कमी झाला, तेव्हा मी त्यांना सौम्य शब्दांत म्हटलं,

“सर, प्लीज ह्याव अ सीट…!”

माझे बोलणे न ऐकल्यासारखे करून धुमसतच ते खिशातून काहीतरी वस्तू काढण्याचा प्रयत्न करीत होते. मी उभी राहिले आणि त्यांना म्हटले,

“सर, प्लीज शांत व्हा. मी समजू शकते तुमचा राग. आमचे विद्यार्थी खरंच खूप चुकले. तुम्हाला खूप त्रास झाला. मी क्षमा मागते तुमची.”

मी पुन्हा एकदा त्यांना खुर्चीत बसण्याची विनंती केली, पण ती धुडकावून ते तावातावाने निघून गेले. जाता जाता चार आयकार्ड नाडकरांनी माझ्या टेबलावर भिरकावली आणि मला सुनावले,

“हे आणि त्यांचे मित्र आले होते आमच्या बागेत. बघा जमलं तर त्यांना शिस्त शिकवा…”

सगळं वातावरण एकदम शांत झालं. हा अनुभव वेगळाच होता. थोडावेळ मी सुन्न होऊन तशीच बसले. नंतर मात्र पुढे काय करायचे, यावर विचार करायला लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी शिस्तपालन समिती प्रमुखांकडे नाडकरांनी दिलेली चार ओळखपत्रे दिली. शिक्षकांनी त्यावरून त्यांना आणि त्यांच्या बरोबरीच्या इतर मुला-मुलींना शोधले. त्या सगळ्यांची नावे मला आणून दिली.

हेही वाचा – सदाफुली, माईफुली अन् राजूफुली…

शिस्तपालन समितीचे शिक्षक या प्रसंगामुळे खूपच संतापले होते. संबंधित विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींच्या पालकांना बोलवावे आणि त्यांच्या पाल्यांचे पराक्रम सांगावे, असे काही जणांचे म्हणणे होते. सर्वांच्या लक्षात राहील अशी कठोर शिक्षा करावी, असे काहींचे म्हणणे होते. मी त्या सर्वांना शांत केले.

हे प्रकरण संवेदनशील आहे, ते हळूवारपणे हाताळले तर बरे होईल, हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. अशी घटना आपल्याकडे पहिल्यांदाच घडली आहे किंवा आपल्याला प्रथमच समजली आहे, त्यावेळी मी त्या सर्व मुला-मुलींशी बोलावे. त्याचा परिणाम चांगला झाला तर ठीक अन्यथा पुढे काय शिक्षा करायची ते आपण ठरवूच, यावर सगळ्यांचे एकमत झाले. या प्रकरणात बराच विचार केल्यावर, बऱ्याच जणांशी चर्चा केल्यावर, पुस्तके वाचल्यावर मी काही निष्कर्षापर्यंत आले.

  1. कनिष्ठ महाविद्यालयातील मुले-मुली तारुण्याच्या उंबरठ्यावर असतात. साहजिकच त्यांना एकमेकांचे विशेष आकर्षण असते.
  2. या वयात चांगले दिसणे, चांगले कपडे असणे हे जास्त महत्त्वाचे वाटते. थोड्याशा प्रेमळ संवादाने, सहवासाने प्रेम जुळण्याचे प्रकार जास्त प्रमाणात होतात. त्यात हल्ली विविध वाहिन्यांचा खूप विकास झाला आहे, त्यामुळे त्याचा प्रभावही खूप जास्त होणार.
  3. या वयात प्रेम करताना मित्र, मैत्रीण स्वभावाने कसा आहे किंवा कशी आहे. भविष्यात नोकरी-व्यवसाय याबाबत त्याचे किंवा तिचे काय विचार आहेत, या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार मुलं-मुली करत नाहीत.
  4. प्रेम प्रकरणांबाबत आई-वडिलांना अंधारात ठेवले जाते.
  5. प्रेम कुठे आणि कसे व्यक्त करावे, याची समज या वयातल्या मुलांना कमी असते किंवा मुळीच नसते.

या मुदद्यांच्या आधारे विद्यार्थ्यांशी बोलायचं ठरवले.

(क्रमश:)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

banner 468x60

Most Popular

Recent Comments

मुकेश अनिल चेंडेकर on Heart touching story : अशीही एक आई… यशोदा
Team Avaantar on नवी दिशा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
सुरेश गुरव सर on आमच्या मराठी शाळा
Shweta Gokhale on नवी दिशा
Shweta Gokhale on फासा
सुनिल अनंत बोरकर on मी पिदू आणि हा दनू…
error: Content is protected !!