सायली कान्हेरे
आज कोबी पोहे बनविण्याची रेसिपी सांगणार आहे. हे पोहे माझ्या सासूबाईंची स्पेशालिटी आहेत. नेहेमी करत असलेल्या पोह्यांपेक्षा हे पोहे चवीला छान लागतात. यात घातलेल्या कोबीला अजिबात उग्र वास येत नाही.
कोबी पोहे
साहित्य – 2 वाट्या पोहे, 1 वाटी बारीक चिरलेली कोबी, 4 मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरलेली, कढीपत्ता, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरं, हिंग, हळद, मीठ, साखर (चवीनुसार), लिंबू – 1/2
पुरवठा संख्या – दोघांसाठी
तयारीस लगणारा वेळ – साधारणत: 15 मिनिटे
शिजवण्याचा वेळ – कोबी शिजण्यासाठी 7 मिनिटे, बाकी सुमारे 10 मिनिटे
एकूण वेळ – सुमारे 17 मिनिटे
कृती
- प्रथम पोहे भिजवून घ्यावे. मग त्यावर चवीनुसार मीठ आणि साखर घालावी.
- फोडणीसाठी थोडे अधिक तेल घ्यावे, ते तापल्यावर त्यात मोहोरी, जिरं घालावे. मोहोरी तडतडल्यावर हिंग, हळद, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालव्यात.
- नंतर त्यात बारीक चिरलेला कोबी घालून परतावे. कोबी थोडा शिजवून घ्यावा. मग त्यात भिजवलेले पोहे घालून छान परतून घ्यावे.
- झाकण ठेवून वाफ द्यावी.
- हे पोहे वाढताना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि लिंबू पिळून एकत्र करून गरम गरम वाढवेत.
पास्ता सलाड
पास्ता हा लहान मुलांचा अतिशय आवडता पदार्थ आहे. पण तो तयार करण्याच्या दृष्टीने वेळखाऊ आहे. मुलांना शाळेतून आल्यावर कायम काहीतरी वेगळे पदार्थ हवे असतात. म्हणून हा वेगळा पास्त्याचा पदार्थ नक्कीच करून बघा, झटपट करताही येतो आणि टेस्टी पण लागतो.
पास्त्याचे खूप प्रकार असतात जसे – स्पेगेती, पेने, फुसीली इत्यादी. तुम्ही पास्ता सलाडसाठी स्पेगेती सोडून कुठलाही पास्ता वापरू शकता. हल्ली आरोग्याच्या दृष्टीने पास्त्याचे बरेच प्रकार उपलब्घ आहेत. त्यात नाचणी पास्ता, मिलेट पास्ता, आटा पास्ता इत्यादी तुम्हाला हवा तो पास्ता प्रकार तुम्ही घेऊ शकता. मी आटा पास्ता घेते.
साहित्य – कोणताही पास्ता 2 वाट्या, कांदा छोटा उभा चिरलेला, सिमला मिरची छोटी उभी चिरलेली, मेयोनिज दीड वाटी, टोमॅटो केचप अर्धी वाटी, चवीपुरते मीठ आणि साखर, किसलेले चीझ 2 चमचे.
पुरवठा संख्या – दोघांसाठी
तयारीसाठी लागणार वेळ – भाज्या चिरायला 5 मिनिटे, बाकी मिश्रण करायला 5 मिनिटे
शिजवायचा वेळ – सुमारे 15 मिनिटे
एकूण वेळ – 25 मिनिटे
कृती
- प्रथम पास्ता पाण्यात घालून शिजवायला ठेवा. तो शिजला की निथळून घ्या. (शिजताना त्यात थोडं तेल घाला म्हणजे तो चिकट होणार नाही. निथळल्यानंतर त्यावर गार पाणी घाला. म्हणजे, तो मोकळा होईल).
- आता मेयोनिज घ्या. त्यात टोमॅटो केचप, मीठ, साखर, घालून एकजीव करून घ्या.
- आता हे मिश्रण, पास्ता, कांदा सिमला मिरची सगळं नीट एकत्र करा.
- खायला देताना वरून किसलेले चीझ घाला.
- रंगीबेरंगी दिसणारे हे सलाड गार छान लागते.
विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,
IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c
या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.