आराधना जोशी
काही व्यक्तींचं या पृथ्वीतलावर असणंही मनाला समाधान देणारं, धीर देणारं असतं. डॉ. स्नेहलता देशमुख मॅडम यांचं असणं माझ्यासाठी त्याच भावनेचं होतं. 29 जुलै 2024 रोडी मॅडमचं प्रदीर्घ आजाराने निधन झाल्याची बातमी समजली आणि एक आधार हरपल्याची जाणीव झाली.
डॉ. स्नेहलता देशमुख मॅमशी माझी पहिली भेट झाली ती 1996 साली मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात. त्यावर्षी मराठी वाङ्मय विषयात विद्यापीठात पहिली आल्यामुळे देशमुख मॅडमच्या हस्ते दोन सुवर्णपदके स्वीकारण्याचे भाग्य मला लाभले. त्यावेळी त्या मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू होत्या. पदवीदान समारंभात त्यांच्या मंद हास्यावर, चेहऱ्यावर दिसून येणाऱ्या बुद्धीच्या तेजावर आणि तरीही अतिशय मृदू स्वरात समोरच्याशी संवाद साधण्याच्या त्यांच्या लकबीवर मी फिदा झाले होते. त्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी रुपारेल कॉलेजच्या ॲन्युअल डेसाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या देशमुख मॅडमच्या हस्ते परत एकदा कॉलेज लेव्हलला माझा सत्कार झाला आणि तिथेच आमचे ऋणानुबंध जुळले असावेत.
त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून त्यांचं काम माध्यमांमधून कानावर पडत होतं, वाचनात येतं होतं. 2000 साली मॅडम कुलगुरू पदावरून निवृत्त होताना नवीन कुलगुरूंकडे पदभार सुपूर्द करणार होत्या. या कार्यक्रमाला ई टीव्ही मराठीची वृत्तप्रतिनिधी म्हणून मी देशमुख मॅडमची एक सविस्तर मुलाखत घेतली होती. त्यावेळी 1996 साली आपली पहिली भेट कशी आणि कुठे झाली होती, त्याची मी त्यांना आठवण सांगितली आणि मंदपणे हसत मॅडम म्हणाल्या, “तरीच तुझा चेहरा कुठेतरी बघितल्यासारखा वाटतोय.” त्यांनी अशी प्रतिक्रिया देणं माझ्यासाठी अनपेक्षित होतं.पुढे ई टीव्हीच्या मुख्य ठिकाणी म्हणजे हैद्राबादला माझी बदली झाली. त्यावेळी मी गरोदर होते. लोकसत्ता वृत्तपत्राच्या शनिवारच्या पुरवणीत देशमुख मॅडमचा गर्भसंस्कारांवर एक लेख छापून आला होता. माझ्या आईने ती पुरवणी कुरियरने हैद्राबादला पाठवली आणि सोबत त्या लेखात जे जे सांगितलं आहे, ते पाळण्याचा प्रयत्न कर असा निरोपही. नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या शिफ्ट ड्यूटीज् सांभाळून पुरवणीतल्या अनेक गोष्टी मी पाळण्याचा प्रयत्न करत होते. पण याचा काही फायदा आहे का? असा विचारही मधेच मनात यायचा. गर्भसंस्कारांचा नेमका काय परिणाम झाला हे मुलीच्या जन्मानंतर प्रकर्षाने जाणवायला लागलं आणि परत एकदा देशमुख मॅडमना भेटायची संधी मिळायला हवी, ही इच्छा उफाळून यायला लागली.
योगायोगाने हैद्राबाद सोडून मी झी (त्यावेळच्या अल्फा) मराठीच्या फोन इन प्रोग्रॅमची संशोधक, समन्वयक बनले आणि या कार्यक्रमात एकदा दोनदा नाही तर तीनवेळा डॉ. स्नेहलता देशमुख मॅडम मुख्य मार्गदर्शक म्हणून आल्या. नंतर त्यांच्या घरीही जाण्याचा योग आला. त्यांची स्पेशालिटी असणारं खस सरबत त्यांनी प्यायला तर दिलंच पण, आवडलं म्हणून ‘थोडासा नमुना घरी घेऊन जा,’ असं सांगत बाटलीतही भरलं. याच भेटीमध्ये बालगीते किंवा बडबड गीतांचा गर्भावर काय परिणाम होतो याबद्दलचा त्यांचा अभ्यास आणि सोनोग्राफी रिपोर्टही त्यांनी आम्हाला दाखवले होते. बालशल्यचिकित्सक असणाऱ्या डॉ. देशमुख मॅडमचा नुसता स्पर्श झाला तरी रडणारी बाळं कशी शांत होतात, याचा अनुभव याची देही याची डोळा घ्यायला मिळाला होता. नावात असणारा स्नेह त्यांच्या वागण्या-बोलण्यात सतत जाणवायचा.
पुढे झी मराठीतून मी बाहेर पडले, मीडियाही सोडलं… पण काही काळ मॅडमच्या टचमध्ये होते. हळूहळू कामाच्या व्यापात मनात असूनही मॅडमबरोबरचा संबंध कमी होत गेला. दिवाळी, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यापुरताच तो उरला. मीही BMMची सहाय्यक प्राध्यापिका म्हणून नवीन नोकरी सुरू केली. जवळपास 2007 ते 2016 या काळात देशमुख मॅडमशी संबंध कमी होत गेला. 2016च्या मार्च महिन्यातील जागतिक महिला दिनासाठी डॉ. स्नेहलता देशमुख मॅडम आपल्या महाविद्यालयात याव्यात, अशी इच्छा आमचे प्राचार्य डॉ. रविकिरण भगत सर आणि उपप्राचार्या डॉ. प्राजक्ता परांजपे मॅमनी व्यक्त केली. देशमुख मॅमशी फोनवर बोलण्याचं काम मला दिलं गेलं.
काहीशा धाकधुकीने देशमुख मॅडमना मोबाइलवर फोन लावला. दुसऱ्या रिंगला फोन उचलला गेला आणि “बोल गं आराधना कशी आहेस? किती वर्षांनी फोन करतेयस,” असा अत्यंत मृदू आवाज कानी पडला. मी तर तीनताड उडाले. जवळपास 9 वर्षं देशमुख मॅडमच्या मोबाइलमध्ये माझा नंबर सेव्ह होता. आनंदाच्या त्या क्षणी डोळ्यात टचकन पाणीच आलं. मॅडमनाही कदाचित माझी अवस्था लक्षात आली असावी. शेवटी मनाला आवर घालून, “महिला दिनाला तुम्ही आमच्याकडे येऊ शकाल का?” अशी विचारणा मी केली आणि जवळची डायरी चाळत “8 मार्चला मी येऊ शकेन, काहीच प्रश्न नाही मला,” असं सांगत मॅडमनी निमंत्रण स्वीकारलं.
कार्यक्रमाच्या दिवशी देशमुख मॅम कॉलेजच्या आवारात पोहोचल्या तेव्हा त्यांच्या स्वागताला मी पुढे झाले. हातात हात घेऊन, “कशी आहेस गं? इतक्या वर्षांनी या वास्तूत आपली परत भेट होणार होती बघ,” असं म्हणत आपला आनंद त्यांनी व्यक्त केला. कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर प्रशस्त आवार आणि पसारा बघून, “मला आधी बिल्डिंगमध्ये कुठे काय काय सोयी आहेत, वर्ग कुठे आहेत, लॅब्ज् कुठे आहेत ते सांग, मग आपण प्राचार्यांना भेटायला जाऊ,” असं म्हणत पुढची दहा मिनिटे त्या वास्तूचे निरीक्षण करत होत्या, माहिती घेत होत्या. त्यानंतरच त्या प्राचार्यांना भेटल्या.
कार्यक्रम संपल्यावरही, फोटो सेशनला उत्साहाने उभ्या राहिल्या. “कॉलेजमध्ये कायम तारुण्याचा वास असतो, त्याची लागण आपल्याही होते. म्हणून कॉलेजमध्ये पाहुणे म्हणून बोलावलं की मी आवर्जून जाते,” असं त्या म्हणाल्या. निरोप घेतानाही, “येऊन जा गं घरी एकदा, गप्पा मारू,” असं आग्रहाचं आमंत्रणही त्यांनी मला दिलं होतं. खरंतर वय, अनुभव, ज्ञान अशा सगळ्याच बाबतीत मी त्यांच्यापेक्षा खूपच लहान. पण तरीही त्यांनी ‘गप्पागोष्टींसाठी भेटू या’ असं म्हटलं होतं. अर्थात, नंतर प्रत्यक्ष भेटण्याचा योग काही जुळून आला नाही पण, फोनवर बोलणं मात्र होतं राहायचं. शाळेच्या शताब्दी वर्षानिमित्ताने ऑनलाइन झालेल्या कार्यक्रमात देशमुख मॅडमचं मनोगत ऐकायला मिळालं आणि त्यानंतर आमचं फोनवर झालेलं बोलणं शेवटचं ठरलं.
काही आठवणी मनाचा हळवा कोपरा बनतात, कोणत्यातरी क्षणी अचानक हा आठवणींचा पट उलगडत जातो अन् डोळे पाणवतात.
toyashara@gmail.com