डॉ. किशोर महाबळ
नियमितपणे अभ्यास आणि गृहपाठ न करणे, शैक्षणिक उपक्रमांमध्ये भाग घेण्यात उत्साह नसणे, शिक्षणाकडे दुर्लक्ष करणे, नेहमीच शाळेत तसेच वर्गात उशिरा पोचणे, परीक्षेच्या दिवशी शाळेत अनुपस्थित राहणे, परीक्षांमध्ये सातत्याने कमी गुण मिळणे किंवा नापास होणे, नियमित अभ्यास करून उत्तम गुण मिळविण्याऐवजी परीक्षेत गैरमार्गाने उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करणे, आपले हस्ताक्षर सुवाच्य असावे यासाठी कोणतेही प्रयत्न न करणे, वर्गात शक्यतो सर्वात शेवटच्या बाकांवरच बसायचे, शिक्षकांच्या शिकविण्याकडे दुर्लक्ष करायचे, वर्गात शिकण्याशिवाय अन्य जमेल ते सर्व करायचे, वर्गात मन लावून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करायचा, शिक्षकांचेही लक्ष विचलित व्हावे यासाठी मुद्दाम तसे वागायचे, शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात पुढाकार न घेणे, होता होईतो उत्तर देणे टाळणे, रोजच्या नियोजित तासिकेनुसार आवश्यक ती पुस्तके आणि वह्या घरून न नेणे, पुस्तकांची वह्यांची तसेच अन्य शैक्षणिक साहित्याची निगा न राखणे, शाळेत जाण्यापूर्वी आणि शाळेत गेल्यावर आपल्या वेळेचे आणि अभ्यासाचे नियोजन करण्याकडे लक्ष न देणे, न आवडणाऱ्या विषयांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून कोणत्यातरी आवडत्या विषयाचाच अभ्यास करीत राहणे, आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी स्वत:हून कोणतेही प्रयत्न न करणे, जे गुण मिळतील त्यात समाधान मानणे, विषयांची पाठ्यपुस्तके वाचण्याऐवजी गाईड्स वाचायची, परीक्षेपुरताच अभ्यास करायचा… असे वर्तन असलेले अनेक विद्यार्थी शाळेत दिसतात.
महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांच्या बाबतीतही चित्र फारसे वेगळे नाही. वार्षिक परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळविण्याचा एकमेव दृष्टिकोन ठेवून तसाच अभ्यास करायचा आणि उत्सुकतेने विषयाचा सखोल अभ्यास करण्यापेक्षा जेवढा आवश्यक असेल तेवढाच अभ्यास करणारे विद्यार्थी शाळेत मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत, असा अनेक शिक्षकांचा अनुभव आहे.
विद्यार्थ्यांच्या या अशा वर्तनामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर तसेच शैक्षणिक प्रगतीवर दूरगामी परिणाम होत आहे आणि ते आता अनुभवासही येऊ लागले आहेत. शाळेतील वर्गातील वाढत्या बेशिस्तीमुळे अध्यापन आणि अध्ययन हे दोन्ही प्रभावित होत आहेत. मोबाइलसारखे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना सहजगत्या उपलब्ध होऊ लागल्याने तर शाळेतील आणि वर्गातील वर्तनही प्रभावित होऊ लागले आहे. शालेय स्तरावरील परीक्षेत उत्तीर्ण होणे सोपे झाल्याने आणि नापास होण्याचे भय न राहिल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे.
हेही वाचा – कथालेखक आणि कथाकथनकारांचा शोध
वर नोंदविलेले वर्तनाचे सर्वच प्रकार हे कमीजास्त प्रमाणात विद्यार्थ्यांची मानसिकता दर्शवितात. काही वर्तनप्रकार हे तात्कालिक स्वरुपाचे, निरुपद्रवी आणि दुर्लक्ष करण्यासारखे वाटतील, पण सखोल विचार केल्यास काही वेगळीच बाब लक्षात येईल. वाईट संगत, बाह्य आकर्षणे, शरीरातील बदल, आवड- निवड, वाईट संगत, वाईट सवयी यामुळे विद्यार्थी वाईट मार्गाला लागलेले आपण बघतो. त्याबाबतीत ते विद्यार्थीच त्यांच्या वर्तनाला काही प्रमाणात जबाबदार असतात. मात्र त्यापेक्षाही सद्यस्थितीत समाज, कुटुंब, शाळा, वर्ग या माध्यमातून विद्यार्थ्यांची होणारी जडणघडण, त्यांच्यावर होणारे संस्कार, त्यांना वेळोवेळी पालक, शिक्षक आणि अन्य ज्येष्ठांकडून मिळणारे मार्गदर्शन, सल्ला आणि शिक्षकांचा तसेच पालकांचा शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन याचेच लक्षणीय प्रतिबिंब खरे तर या विद्यार्थ्यांच्या वर्तनातून दिसते आहे.
उपरोक्त वर्तनाकडे बघण्याचा शाळेचा, शिक्षकांचा दृष्टिकोन सहसा कसा असतो? शाळा आणि शिक्षक आपापल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे वर्तन आदर्श व्हावे, यासाठी प्रयत्न करतात. हे अशक्य आहे, असे वाटल्यास होता- होईतो विद्यार्थ्यांचे हे वर्तन त्यांच्या वर्गातील तसेच शाळेतील इतरांना कमीत कमी उपद्रवी ठरेल, याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांच्या अशा वर्तनाकडे दुर्लक्ष करतात किंवा संबंधित विद्यार्थ्याला शिक्षा करणे, रागावणे, पालकांकडे तक्रार करणे, लेखी तंबी देणे, त्याला शाळेतून काही दिवसांसाठी किंवा कायमचे काढून टाकणे, वर्गात आणि शाळेतील इतरांसमोर वाईट वर्तनाची वाच्यता करणे, एकच शब्द किंवा क्षमा मागणारे वाक्य शंभर किंवा हजार वेळा लिहायला सांगणे यासारखे विविध मार्ग अवलंबितात! या पद्धतींचा उपयोग होतो का? किती प्रमाणात होतो? हे सर्व मार्ग वापरणाऱ्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या वर्तनविषयक समस्या का आढळतात? शिस्तीवर भर देणाऱ्या आणि बेशिस्त वर्तन करणाऱ्यास कठोर शिक्षा देणाऱ्या सैनिकी शाळांमध्येही बेशिस्त वर्तन का आढळते? या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवी आहेत.
हेही वाचा – प्रत्येक शिक्षकाचे अध्यापन अव्वल दर्जाचे असावे
अयोग्य वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अवलंबिल्या जाणाऱ्या पारंपरिक पद्धतींपेक्षा काही नवीन मार्ग आणि पद्धती अवलंबिता येतील का, याचा विचार करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. आधुनिक जगातील सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय क्षेत्रातील अभूतपूर्व असे बदल, माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील क्रांती, माहितीचा आणि ज्ञानाचा स्फोट, जागतिकीकरणाचे असंख्य परिणाम भारतीय समाजावर दिसू लागले आहेत. दूरचित्रवाणीच्या असंख्य देशी आणि विदेशी वाहिन्या तसेच त्यावरील चांगले-वाईट गोष्टी दाखविणारे हजारो कार्यक्रम, योग्य-अयोग्यतेचा विवेक करण्यात पुरेशी सक्षम नसलेली लक्षावधी लहान मुले बघत असतात. या वाहिन्यांवरून होणारे भांडवलशाहीस, बाजारास तसेच चंगळवादास पोषक असे संस्कार या शालेय मुलामुलींवर होत आहेत. हे चांगल्या आणि वाईट अर्थाने अभूतपूर्व आहे. या बदलांतून निर्माण झालेली आव्हाने ही नवी आहेत. अधिक दूरगामी परिणाम करणारी आहेत. अत्यंत प्रभावी आहेत. जुन्या पद्धती, जुने मार्ग, जुने विचार आणि दृष्टिकोन हे म्हणूनच आजचे प्रश्न सोडविण्यासाठी फारसे उपयोगी पडणार नाहीत. आजची शैक्षणिक आव्हाने पेलण्यासाठी, नव्या समस्या सोडविण्यासाठी पूर्णतः नवे विचार, नवा दृष्टिकोन, नवे चिंतन, नव्या पद्धती, नवे मार्ग शोधावे लागणार. असा प्रयत्न जगभरातील शिक्षणतज्ज्ञ करू लागले आहेत. या नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी काय करता येऊ शकते, याचा विचार करूया.


