शनिवारची सकाळ. नेहेमीप्रमाणेच लताबाई आली घरकामाला. ती आली आणि केर काढू लागली की, माझी नुसती तारांबळ उडते. इथे बसू का तिथे बसू? या खोलीत जाऊ का त्या खोलीत जाऊ? असे यक्षप्रश्न ठाण मांडून माझ्यासमोर उभे ठाकतात आणि मी बापुडवणा, पाय पोटाशी धरून बसून राहतो सोफ्यावर, नाही तर खुर्चीवर! खाली उतरायची बंदी असते मला, ती पंधरा मिनिटं… केर काढत असताना उतरलो आणि पाणी प्यायला जरी गेलो तरी, ‘नाचू नको केरात!! कितीही वेळा सांगितलं तरी, लक्षात कसं येत नाही तुझ्या?’ अशी टकळी सुरू होते. लादी पुसताना उतरलो तर, ‘पाय उठतात रे लादीवर, का अंत बघतोस माझ्या सहनशक्तीचा? नसतोस घरी तेच बरं असतं…’ वगैरे ऐकून घ्यावं लागतं. संचारबंदीचा तो कालखंड, माझी परीक्षा घेणारा असतो आणि हे सगळं ऐकणारी आमची लताबाई मात्र गालातल्या गालात हसत असते, नेहमीच. आमचे हे संवाद, तिलाही आता अगदी तोंडपाठ झालेत!
परवाच्या शनिवारी, ती आली नेहेमीच्याच वेळेवर. केर काढायला सुरुवात केली आणि म्हणाली, “बाईसाहेब झाडू बदला आता, चिपाडावानी झालाय… कचरा निघंना झालाय त्यानं आता!”
“एवढा काही खराब नाहीये… मी तोच वापरते ना, तू दांड्या मारतेस तेव्हा? (टोमणा हाणायची संधी सोडेल तर ती बायको कसली?) आजचा दिवस चालव, आणते संध्याकाळी,” असं आश्वासन देऊन त्या दिवशीचे केरवारे पार पडले.
“चांगल्यातला आणा जरा, महागातला. नाहीतर, मागल्या येळेसारखा सस्त्यातला आणशाल आणि मग मलाच पाठवशाल बदली करून आणायला…” लताबाई सुद्धा तोडीस तोड!
मी दिलखुलास हसल्यावर, बायकोचा दात-ओठ खाल्लेला चेहेरा मात्र बघण्यालायक अन् माझा, न कर्त्याचा वार शनिवार सार्थकी लावणारा! त्या रागातच, कच्च्या पोळ्या आणि अळणी भाजी खाऊन मला दिवस कंठावा लागला. भोगली कर्माची फळं, दुसरं काय?
हेही वाचा – कुणीतरी आहे तिथे!
संध्याकाळी नेहमीप्रमाणे चक्कर मारायला बाहेर पडल्यावर मी साळसूदपणे आठवण करून दिली… “अगं, केरसुणी घ्यायची आहे ना?“
“तुला नको एवढी काळजी त्या भोचक भवानीची. घेऊ परत जाताना. फिरायला जाताना केरसुणी काय गदेसारखी, खांद्यावर मिरवत न्यायचीये का?” तिचा सडेतोड प्रश्न आणि मी गप्प, नेहेमीप्रमाणेच. पटलं तिचं म्हणणं मला!
घरी परत जाताना, नेहेमीच्या दुकानाबाहेरच, एका कोपऱ्यात केरसुण्या बघून मी तिला खूण केली आणि मोर्चा दुकानाकडे वळवला.
“केरसुण्या दाखवा!!”
दुकानातला, जाज्वल्य वगैरे मराठी बाणा जपणारा दुकानदार आतूनच खेकसला, “दाखवायच्यात काय? ठेवल्यात तिथे. बघा की तुम्हीच…”
एखादा मारवाडी असता, तर दुकानाबाहेर येऊन अगत्याने केरसुण्या दाखवल्या असत्या आणि एकाऐवजी दोन गळ्यात बांधल्या असत्या, नक्कीच! शेवटी, आमचं आडनाव मिरवणारे त्रयस्थच जास्त!! मी मग एकऐवजी दोन गदा खांद्यावर मिरवीत घरी गेलो असतो…
चार केरसुण्या बाहेर आल्या… “ही केवढ्याची?”
“दीडशे रुपये.”
“आणि ही?”
“दोनशे रुपये.”
मी ऐकल्या किमती आणि चाट पडलो. “दोनशे रुपयाला केरसुणी! कोकणात फुकट मिळते…” माझी मुक्ताफळं.
माझ्याकडे बघत म्हणाली, “जा आणि घेऊन ये हं, डझनभर. उगाच आपलं काहीही बोलायचं, तोंड दिलंय म्हणून… कुठली घेऊ सांग.” च्यायला, किती तो चोखंदळपणा. पैठणी घ्या किंवा केरसुणी, चिकित्सकपणा तेवढाच!
मला आपली दीडशेवाली छान वाटत होती. उगाच का 50 रुपये जास्त द्या? मुद्दामच म्हणालो, “ती दोनशेची छान आहे.” उलट होणार याची खात्रीच होती. उगीच का एवढी वर्षे संसार केलाय!
“नको बाई, उगाच कशाला? ही दीडशेचीच ठीक आहे…” गंगेत घोडं न्हालं असं वाटलं, आणि तेवढ्यात, “कुठली घेऊ? ही हिरव्या दांडयाची का गुलाबी?”
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ हे ठाऊक होतं, पण केरसुणीचाही? काय दिवस आलेत!
“ही गुलाबी बरी वाटतेय, तीच घेते…” मी मान डोलावली… हिरवी काय अन गुलाबी काय, केर तर काढायचाय, हे आपलं माझं तत्वज्ञान.
हेही वाचा – वेंधळेपणा, पुन्हा एकदा!
“भुस्सा पडणार नाही ना यातून?” माझा भुस्सा व्हायची घटिका आता समीप येत चालली होती… दुकानदाराच्या चेहेऱ्यावरचे त्रासिक भाव पाहून, मी तिला दंडाला ओढून बाजूला केलं आणि दीडशे रुपये G-pay करून मोकळा झालो. अशा रीतीने ती केरसुणी एकदाची सुस्थळी पडली.
दुसऱ्या दिवशी, म्हणजे रविवारी सकाळी, लताबाईने नवी केरसुणी पाहिली आणि हर्षवायू झाला तिला. मी म्हणालो, “घे वापरायला लगेच.”
माझ्याकडे दुर्लक्ष करून म्हणाली, “वहिनी कुयरी द्या. लक्ष्मी आलीय घरात.”
नव्या केरसुणीला हळदकुंकू वाहून, तिला मनोभावे नमस्कार करून आणि आम्हालाही करायला लावून मगच तिने ती केरसुणी वापरायला घेतली.
साधाच प्रसंग, पण टचकन् पाणी आणून गेला डोळ्यांत! अशिक्षित लताबाई, आम्हा तथाकथित सुशिक्षितांपेक्षा जास्त शिक्षित, अंजन घालून गेली, आमच्याही नकळत.


